या सर्व हिंसाचाराची सुरुवात झाली १९५०मध्ये संघबंदी उठल्यानंतर, जेव्हा थिरुवनंतपुरम येथे पू. श्रीगुरुजी यांची सभा झाली, तेव्हा ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्नाने. संघाची तेव्हा ताकद कमी असल्याने दंडाने कम्युनिस्टांना पिटाळून लावण्यापर्यंत सर्व सीमित राहिले. १९६५मध्ये मल्लपुरम भागात सुब्रह्मण्यम या १६ वर्षाच्या मुलाची हत्या झाली. पुढे १९६७ साली कम्युनिस्टांनी संघाचा गणवेश शिवणार्या रामकृष्ण टेलर याची हत्या केली. त्याचा गुन्हा एवढाच होता की ते संघाचा गणवेश शिवायचा! त्यानंतर कन्नूरच्या एका शाखेचा मुख्य शिक्षक चंद्रन ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर संघस्थानावरच तलवारीचे सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली. चंद्रनच्या मुखी प्राण सोडण्याआधीचे शेवटचे शब्द होते संघप्रार्थनेतील शेवटची ओळ – ‘भारत माता की जय’. खर्या अर्थाने तो हुतात्मा झाला! स्वातंत्र्यापूर्वी अनेक तरुण असेच भारतमातेचा जयजयकार करत मृत्यूला सामोरे जात असत. चंद्रनचा ही दोष हाच होता कम्युनिस्टांच्या लेखी.
१९९५पर्यंत ४५ संघस्वयंसेवकांची अशा प्रकारे हत्या करण्यात आली. १९९५मध्ये श्री नायनार यांचे सरकार आल्यानंतर चारच दिवसात कन्नूरमध्ये निवडणुकीला उभे राहणार्या भाजपा उमेदवाराची हत्या करण्यात आली. मार्क्सवाद्यांचे सरकार आल्यानंतर हे अपेक्षितच होते. केरळात जेव्हा जेव्हा यांचे सरकार आले आहे, तेव्हा संघकार्यकर्त्यांवर हल्ले, अत्याचार वाढले आहेत. शिवाय हे नायनारसुद्धा कन्नूरचेच! वैचारिक विरोधकांच्या हत्या आणि कम्युनिस्ट हे समीकरणच बनले आहे. केवळ संघाचे नाही, तर CPI यांच्या कार्यकर्त्यांच्यासुद्धा हत्या करण्यात आल्या आहेत.
भाजपा जिल्हा सचिवाच्या हत्येनंतर कन्नूरमध्ये हिंसाचाराचे थैमान सुरू झाले. प्रकरण अंगाशी आल्यावर मुख्यमंत्र्यांनी शांतता समितीची स्थापना केली. संघाच्या प्रांत प्रचारक श्री सेतुमाधवन यांनाही या समितीच्या बैठकीस बोलविण्यात आले. त्या बैठकीत त्यांना असे आवाहन करण्यात आले की संघाने आपल्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा सूड घेऊ नये व मोठ्या मनाने शांततेचे आवाहन करावे. त्यावर श्री सेतुमाधवन यांनी संघाला शाखा लावू देण्यास आडकाठी करू नये असे सरकारच्या अपीलात लिहायला लावले. पण या अपीलाची शाई वाळत नाही, तोच १९९७मध्ये मनोज या संघाच्या एका शाखेच्या मुख्य शिक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली. नोव्हेंबर १९९९मध्ये मार्क्सवादी नेता पी. जयराज याने भर सभेत भाजयुमो राज्य अध्यक्ष के.टी. जयकृष्णन यांना किडा म्हणून संबोधले व या किड्याला अग्निकुंडात टाकले पाहिजे अशी जाहीर धमकी दिली. त्यानंतर एका महिन्यातच जयकृष्णन मास्टर त्यांच्या शाळेत ६वीच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असतानाच सर्व विद्यार्थ्यांसमोर तलवारने व चॉपरने त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले! त्यानंतर आणखी दोन संघस्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. यशोदा, कौशल्या, अमुअम्मा या महिलांनाही, केवळ त्या त्यांच्या विचारांच्या समर्थक नाहीत किंवा त्यांच्या परिवारातील कुणी संघस्वयंसेवक आहेत या कारणास्तव मारण्यात आले. भाजपाचे मंडल कोषाध्यक्ष बालन, करयत्ताचे संघाचे मंडल कार्यवाह शशी यांचीही हत्या करण्यात आली. हरींद्र यांच्यावर असाच एक राक्षसी हल्ला करण्यात आला. त्याच्यावर चॉपरने ५२ वार करण्यात आले!. आश्चर्य वा हरींद्रची जिद्द म्हणा, पण २४२ टाके पडून तो जिवंत राहिला कम्युनिस्टांच्या क्रूरतेचे साक्षीदार म्हणून! १९९६मध्ये पंबा नदीत विद्यार्थी परिषदेच्या ३ कार्यकर्त्यांना कम्युनिस्टांकडून दगडांचा मारा करून पाण्यात बुडवून मारण्यात आले.
नुकतेच हे मार्क्सवादी परत सत्तेत आले व पिनारयी विजयन - जे कन्नूरचेच आहेत - मुख्यमंत्री झाले आणि ही हत्यांची शृंखला पुन्हा सुरू झाली. विजयन यांचे सरकार आल्यापासून आतापर्यंत संघ-भाजपाच्या १३ कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. टी.जे. जोसेफ ह्यांची हत्या करणारे PFI, तामिनाडूमध्ये ११ स्वयंसेवकांची हत्या करणारी अल-उम्मा यासारख्या आतंकी संघटनांनाही अभय हे कम्युनिस्ट सरकार देत असल्याने हिंसेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोपला कांडातील जिहादींना हे कम्युनिस्ट स्वातंत्र्यसेनानी म्हणतात, यापेक्षा यांच्या विकृत मानसिकतेचा काय पुरावा पाहिजे? सुभाषचंद्र बोस यांचा अपमान करणे, चीनच्या आक्रमणाच्या वेळी त्यांच्या बाजूने उभे राहणे हा यांचा इतिहास राहिलेला आहे.
सर्व शासकीय यंत्रणा, पोलीस यांना हाताशी धरून खोट्या अटका दाखविल्या जातात, जे नंतर कुठलाही पुरावा नसल्याने सुटतात व उलट स्वयंसेवकांवरच खोटे खटले दाखले केले जातात. इतकेच काय, स्वयंसेवकांची केस कुणी घेऊ नये म्हणून वकिलांवरसुद्धा दबाव आणण्यात येतो. स्वाभाविक आहे हे, कारण कन्नूरमध्ये तर कम्युनिस्टांच्या ’देशाभिमानी’ या मुखपत्राशिवाय अन्य कुठले वृत्तपत्रही विकण्यास मनाई आहे, तिथे इतर गोष्टींचे काय! सर्व सरकारी संस्था, ट्रस्ट, बँका, शाळा येथे कम्युनिस्ट समर्थकांची वर्णी लागते, ही आहे कम्युनिस्टांची लोकशाही!
केला जरी पोत बळेचि खाले| ज्वाळा तरी ते वरती उफाळे|
आजपर्यंत २३२ संघस्वयंसेवकांची हत्या करण्यात आली आहे, ४०हून अधिक कायमचे अपंग करण्यात आले आहेत व हजारो स्वयंसेवकांवर अनेक खोटे खटले दाखल करण्यात आले आहेत. केवळ पैशाच्या जिवावर आणखी किती काळ कम्युनिस्ट राज्य करू शकतील, हिंसाचार करू शकतील? कारण कम्युनिझमला कंटाळून मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते, बुद्धिजीवी लोक, सामान्य जनता आता संघ-भाजपाकडे वळत आहे आणि त्याचाच त्यांना जास्त राग आहे. हिंदीत म्हणतात की ‘सत्य को परेशान किया जा सकता है लेकिन पराजित नहीं’, त्याप्रमाणेच संघस्वयंसेवकांच्या असीम धैर्याच्या बळावर आज देशातील सर्वाधिक प्रभावी संघशाखांचे काम केरळमध्ये उभे राहिले आहे. तिथल्या स्वयंसेवकांची जिद्द, देशभक्ती, चिकाटी, साहस याला आपल्या सर्वांच्या सहवेदनेची जोड देण्याची आज आवश्यकता आहे. देशाचा इतिहास असा राहिला आहे की सर्व आंदोलने ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी केली आहेत. त्याच शृंखलेतील ‘चलो केरळ’ हे आंदोलन एक ऐतिहासिक आंदोलन आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या. चला, आपण या ’रेड व्हेल’चा, लाल आतंकाचा पर्दाफाश करू या, चलो केरळ... ११ नोव्हेंबर २०१७! या देशात आपण केलेल्या प्रत्येक आंदोलनाने प्रत्येक वेळेला देशाला एक नवीन ऊर्जा व योग्य दिशा दिली आहे. १९७७च्या अणीबाणीविरोधातील देशव्यापी आंदोलन व नंतर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून सत्तांधांना धडा शिकविणे असो किंवा मीनाक्षीपुरमच्य़ा सामूहिक धर्मांतरानंतर केलेले राष्ट्रव्यापी गंगामाता, भारतमाता यात्रा व पुढे राममंदिर आंदोलन. तसेच काश्मीर, बांगला देशी घुसखोर आरक्षण, भ्रष्टाचार अशा अनेक विषयांवर अभाविपने केलेल्या आंदोलनातून देशातील तरुणांना राष्ट्रवादी विचारांनी भारून त्यांच्यातील सज्जनशक्ती सक्रिय केली आहे. आता पुन्हा आपल्याला आपल्या सहभागाने असाच इतिहास रचायचा आहे. चला तर मग, इतिहास घडवू या.. चलो केरळ... ११ नोव्हेंबर २०१७!!
No comments:
Post a Comment