काही मंडळी अशी असतात की, त्यांना चांगले कधी दिसतच नाही. आपण जे बोलतो, लिहितो तेच ’ब्रह्मवाक्य’ असे त्यांना वाटत असते. आपणच खरे पुरोगामी, इतिहासाचे आपणच जाणकार अशा थाटात स्वत:ला ‘बुद्धिवादी’ म्हणवणारी ही मंडळी वावरत असतात. अशा कंपूमध्ये काही राजकारणी नेत्यांचाही समावेश असतो. या कंपूमधील काहींनी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यावर टीका करून त्यांची बदनामी करण्याची मोहीमउघडली आहे की काय, असे वाटू लागले आहे. खरे म्हणजे, भारतीय लष्कर व लष्करप्रमुख यांना कोणत्याही वादात ओढले जाता कामा नये, पण या महाभागांना सांगणार कोण? उचलली जीभ अन् लावली टाळ्याला, असे त्यांचे वर्तन असते. आपण जे बोलतो त्याचे काय परिणामहोतील, याची चिंता अन्य पुरोगाम्यांप्रमाणे त्यांनाही नसते! रामचंद्र गुहा नावाचा बुद्धिवादी त्यापैकी एक.
रामचंद्र गुहा यांनी, ’’लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे अति बोलतात, जे त्यांनी बोलण्याची आवश्यकता नाही, अशी वक्तव्येही ते करतात,’’ असा आरोप करून त्यांच्यावर एका इंग्रजी दैनिकात अलीकडेच लेख लिहिला आहे. त्या लेखाचे शीर्षकच ‘द जनरल स्पीक्स टू मच‘ असे असून त्यात जनरल बिपीन रावत एखाद्या विषयाबाबत जाहीर भाष्य करून आपल्या पदाची प्रतिष्ठा कशी कमी करीत आहेत, याकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे. ’’सातत्याने जाहीर वक्तव्ये करून जनरल बिपीन रावत हे लष्कर प्रमुखपद आणि लष्कर यांच्या विश्वासार्हतेस हानी पोहोचवित आहेत,’’ असा गुहा यांनी आरोप केला आहे.
असा आरोप करण्यास एक निमित्त झाले. कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यातील गोनिकोप्पल येथे फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना, जनरल बिपीन रावत यांनी, फिल्ड मार्शल करिअप्पा यांना ‘भारतरत्न‘ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात यावे, अशी मागणी केली. यासाठी आपण सरकारकडे प्राधान्याने पाठपुरावा करू, असेही सांगितले. फिल्ड मार्शल करिअप्पा हे भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख. १९४७ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान जम्मू -काश्मीर वाचविण्यासाठी, तसेच ’हैदराबाद ऍक्शन’च्यावेळी त्यांनी बजावलेली कामगिरी यामुळे या महान सेनानीचे कर्तृत्व सिद्ध झाले होते. पुढे त्यांना ‘फिल्ड मार्शल‘ या पदाने गौरविण्यात आले. फिल्ड मार्शल करिअप्पा यांचे लष्करातील योगदान लक्षात घेऊन जनरल बिपीन रावत यांनी त्यांना ‘भारतरत्न‘ देण्यात यावे, अशी मागणी केली होती.
जनरल रावत यांच्या या मागणीत गुहा यांना अधिकार मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. तसेच २०१८ साली कर्नाटकात होणार्या विधानसभा निवडणुकांचे स्मरण झाले. विशिष्ट पक्षाला वातावरण अनुकूल व्हावे म्हणून जनरल रावत यांनी असे वक्तव्य केले, असा बादरायणी संबंधही त्यांनी जोडला. जनरल थिमय्या, एअर चिफ मार्शल अर्जनसिंह हे अधिकारी ‘भारतरत्न‘ बहुमानास पात्र असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जनरल रावत यांनी त्या कार्यक्रमात समायोचित भाषण करून फिल्ड मार्शल करिअप्पा यांचा ‘भारतरत्न‘ ने गौरव करावा, असे म्हटले होते. त्यात अन्य कोणास कमी लेखण्याचा मुद्दाच नव्हता, पण गुहा यांनी आपल्या लेखात ही माहिती देऊन ती मंडळीही या बहुमानास पात्र असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. गुहा यांनी आपल्या लेखात जे तारे तोडले त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. लष्करातील माजी उच्च अधिकार्यांनी तसेच अन्य राष्ट्रप्रेमींनी या प्रकारचा निषेध केला. जनरल रावत यांनी जाहीरपणे असे वक्तव्य न करता खासगी पत्राद्वारे राष्ट्रपतींना विनंती करायला हवी होती, असे गुहा यांचे म्हणणे. या सर्वांवरून केवढा गहजब. केवढे आकांडतांडव! पण असे बोलल्याशिवाय आपण जाणकार आहोत हे सिद्ध कसे होणार? खरे म्हणजे, ज्याला लष्करासंदर्भात र...ट...फ कळत नाही, त्याने यात नाक खुपसण्याची काही गरजच नव्हती. पण ‘द जनरल स्पीक्स टू मच‘ असे म्हणून त्यांनी एकप्रकारे लष्करप्रमुखपदाचा अवमानच केला आहे. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याबद्दल अशी भाषा वापरणारे ते काही एकटेच नाहीत. या आधीही अशी उदाहरणे घडली आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आझमखान, शीला दीक्षित यांचे पुत्र आणि दिल्लीचे खासदार संदीप दीक्षित, साम्यवादी नेते प्रकाश करात, केरळचे कोडीयेरी बालकृष्णन आणि पार्थ चटर्जी आदींचाही यात समावेश आहे. जुलै २०१७ मध्ये समाजवादी नेते आझमखान यांनी लष्कराबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या कथित विधानाबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही नोंदविण्यात आला होता. आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी भलताच अर्थ लावला, अशी सारवासारव करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा नतद्रष्टपणा त्यांनी दाखविला. ‘‘माझ्यामुळे लष्कराचे नीतिधैर्य कशाला खचेल? मी असा कोण आहे? पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिल्याने लष्कराचे नीतिधैर्य खचले,’’ असे तारे त्यांनी तोडले!
आझमखान यांच्याप्रमाणे कॉंग्रेसचे खासदार संदीप दीक्षित यांनी तर जनरल रावत यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत विधान केले होते. ‘‘जनरल रावत हे ‘रस्त्यावरील गुंडासारखे‘ वागत आहेत,’’ अशी कोणाही राष्ट्रप्रेमी व्यक्तीस संताप येईल, अशी भाषा त्यांनी वापरली होती. लष्करप्रमुख ‘रस्त्यावरील गुंडासारखे‘ आदेश देत सुटले आहेत, असे जून २०१७ मध्ये ते म्हणाले होते. आपल्या या वक्तव्याबद्दल संदीप दीक्षित यांना उपरती झाली की नाही, ते मात्र समजले नाही.
मार्क्सवादी नेते प्रकाश करात यांनीही जनरल बिपीन रावत यांनी काश्मीरसंदर्भात जी भूमिका घेतली त्यावर टीका केली होती, जनरल रावत हे मोदी सरकारच्या काश्मिरी जनतेचा आवाज दडपून टाकण्याच्या धोरणाची री ओढत असल्याचा आरोप त्यांनी केला होता, तर दुसरे एक मार्क्सवादी नेते कोडीयेरी बालकृष्णन यांनी, ’’जेथे ‘सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा‘ लागू करण्यात आला आहे, अशा जम्मू -काश्मीर, नागालँडसारख्या राज्यात लष्कराकडून अल्पसंख्याक महिलांवर अत्याचार होत आहेत,’’ असा आरोप केला होता. पार्थ चॅटर्जी यांनी तर या सर्वांवर कडी केली. काश्मीरमध्ये मानवी ढाल म्हणून एका दंगेखोरास जीपला बांधण्याची जी कृती मेजर गोगोई यांनी केली होती, त्याबद्दल जनरल बिपीन रावत यांनी मेजर गोगोई यांचे कौतुक केले होते. त्यावरून चॅटर्जी यांनी जनरल रावत यांची तुलना १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमध्ये जालियानवाला बागेत जमलेल्या निरपराध लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश देणार्या जनरल डायर याच्याशी केली. या कथित पुरोगामी मंडळींची डोकी कशी तिरकी चालतात याची कल्पना या विविध उदाहरणांवरून आली असेल. रामचंद्र गुहा यांनी अलीकडे लिहिलेल्या लेखावरून या घटनांचे पुन्हा स्मरण झाले इतकेच! देशाचे हित करण्याऐवजी अहित कसे होईल, यातच रस असलेल्यांना ‘कपाळकरंटे’ याखेरीज अन्य काय म्हणणार?
-
No comments:
Post a Comment