Total Pageviews

Wednesday, 8 November 2017

सुरक्षा हा विषय फक्त सैन्य, पोलीस, हेरखाते, कायदा व्यवस्थेशी संबंधित सरकारी कर्मचारी यांच्यापुरता विषय आहे, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही -VIVEK

ह्या भ्रमात असणाऱ्या समाजाला थोडी मूलभूत माहिती देऊन हा गैरसमज दूर करावा आणि आपल्यावर असलेल्या जबाबदारीची थोडीशी जाणीव व्हावी, यासाठी 'आयाम राष्ट्रीय सुरक्षेचे' हे नवे सदर सुरू करत आहोत.
जागतिक इतिहासात आजपर्यंत अनेक राष्ट्रे जन्माला आली, फोफावली आणि नष्ट झाली. ही राष्ट्रे नष्ट होण्याचे कारण रुडयार्ड किप्लिंगने फक्त चार ओळीत स्पष्ट केले आहे. ते लिहितात -
Nations have passed away and left no traces, and History gives the naked cause of it,
One single simple reason in all the cases, they fell because their peoples were not fit.
लुप्त जाहली राष्ट्रे कितीक, इतिहास सांगतो का कोसळली,
एकच त्याचे मूळ सामाईक, जनतेची योग्यता हरपली

ह्या चार ओळींत वर्णन केलेले वास्तव खूप महत्त्वाचे आहे. इतिहासकाळी वर्चस्व प्रस्थापित करण्याची एकच पध्दत प्रचलित होती. समोरासमोरच्या लढाईत दुसऱ्याला हरवून प्रदेश जिंकायचा.
सध्याच्या वैज्ञानिक सुधारणांच्या युगात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या पध्दतीतसुध्दा सुधारणा झाली आहे.
आज जीवनाचा एकही पैलू असा नाही की अन्य देश तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत नाहीत. धार्मिक वर्चस्व हा तर ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांचा मूळ स्वभाव आहे. याकरता साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग वापरण्यास ते तयार असतात. आणि जो देश किंवा समाज हे उघड किंवा छुपे आक्रमण ओळखून त्याचा समर्थ प्रतिकार करत नाही, ते वर सांगितल्याप्रमाणे लुप्त होतात. इस्रायलच्या उदाहरणावरून हा मुद्दा स्पष्ट होईल. ज्या वेळी ज्यूंचे सामर्थ्य कमी पडले, तेव्हा ते राष्ट्र संपले असा सगळया जगाने समज करून घेतला. गेल्या काही वर्षांत ज्यू समाजाने ती योग्यता प्राप्त परत करून घेतली आणि आपले राष्ट्र परत प्रस्थापित केले.
आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात पहिल्यासारखी उघड आक्रमणे अशक्य नसली, तरी अवघड आहेत. आज जीवनाच्या प्रत्येक पैलूबाबत असे आक्रमण किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होऊ  शकतो. आणि म्हणूनच अशा प्रयत्नांचे प्रमुख पैलू, त्याबाबतची माहिती, त्याचा प्रतिकार आणि घेण्याची काळजी हे सर्व नागरिकांना माहीत हवे. कारण त्यांच्या योग्यतेवरच हा समाज आणि राष्ट्र प्रगती करणार का लुप्त होणार हे ठरते, आणि इतिहास ह्याला साक्षी आहे.
मुळात एखादे राष्ट्र सुरक्षित आहे का हे ठरवण्याचा आधार काय? कोणत्या परिस्थितीत राष्ट्र सुरक्षित आहे असे म्हणता येऊ  शकते? हे ठरवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय हे माहीत हवे. ऐतिहासिक काळाप्रमाणे प्रचंड शक्तिशाली सैन्य असले की राष्ट्र सुरक्षित असते हे म्हणणे आता कालबाह्य झाले आहे. आता प्रत्यक्ष बलप्रयोगाने  राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यापेक्षा आर्थिक, धार्मिक, सामाजिक, तंत्रज्ञान किंवा शैक्षणिक वर्चस्व प्रस्थापित करणे अधिक सोपे आणि स्वीकारार्ह आहे.
प्रत्येक समाजाचा, राष्ट्राचा विशिष्ट स्वभाव, गुण असतो, आणि त्याला अनुसरून काही मर्मे, मानबिंदू असतात. अशा मानबिंदूंचे रक्षण करण्यास समाज किंवा राष्ट्र समर्थ असेल, तरच ते राष्ट्र सुरक्षित राहते, अन्यथा योग्यता हरवल्यामुळे राष्ट्र आणि समाज नष्ट होण्यास वेळ लागत नाही.
* सार्वभौमत्व
* भौगोलिक सुरक्षा
* अंतर्गत आणि बहिर्गत निर्णय स्वातंत्र्य
* आर्थिक आणि सामाजिक निर्णय स्वातंत्र्य
ह्या चार मुद्दयांवर राष्ट्र किती सुरक्षित आहे, सामर्थ्यवान आहे ते ठरते. अशा मानबिंदूंचे रक्षण करण्याचा हक्क प्रत्येक राष्ट्राला असतो. मुळात एखादे राष्ट्र - विशेषत: भारतासारखे खरोखरीच सामर्थ्यवान राष्ट्र - ह्या मानबिंदूंचे राखण करण्यासाठी सर्व उपलब्ध पर्याय (आणि अस्तित्वाचा प्रश्न असेल, तर प्रथम उपयोग करण्याचा आण्विक पर्यायही) वापरेल हा विश्वास किंवा भीती हाच त्या राष्ट्राचा सुरक्षेचा मुख्य आधार असतो.
सुरक्षा हा विषय फक्त सैन्य, पोलीस, हेरखाते, कायदा व्यवस्थेशी संबंधित सरकारी कर्मचारी यांच्यापुरता विषय आहे, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही ह्या भ्रमात असणाऱ्या समाजाला थोडी मूलभूत माहिती देऊन हा गैरसमज दूर करावा आणि आपल्यावर असलेल्या जबाबदारीची थोडीशी जाणीव व्हावी, म्हणून हा प्रयत्न.
हा विषय पाच मुख्य मुद्दयांमध्ये विभागाला आहे.
1.     भौगोलिक सुरक्षा - आपल्या सीमा, त्यांच्या सुरक्षा समस्या, सीमा सुरक्षा यंत्रणा, त्यांची रचना, कार्यपध्दती, तिन्ही दलांची मूलभूत माहिती, साहाय्यक संघटना (निमलष्करी दले), अन्य संबंधित संघटना, उदा. DRDO, Ordinance Factories इत्यादी.
2.     आर्थिक सुरक्षा - परदेशी गुंतवणूक, त्याचे परिणाम, स्वावलंबन, उत्पादन आणि प्राथमिकता, औद्योगिक परिस्थिती, विज्ञान-तंत्रज्ञान, शेती, आयात-निर्यात धोरणे, पर्यावरण, ऊर्जा, संपत्तीचे न्याय्य वितरण इत्यादी.
3.     राजकीय सुरक्षा - घटनादत्त राजकीय व्यवस्था आणि त्यांना असणारे धोके, राज्ये, त्यांचे अधिकार, त्यांचा दुरुपयोग आणि त्याबद्दल उपाय, सत्ताधारी आणि विरोधक यांचे संबंध, कायदा आणि सुव्यवस्था, अंतर्गत माहिती आणि तपास यंत्रणा, इत्यादी.
4.     सांस्कृतिक सुरक्षा - समाजव्यवस्था आणि त्यापुढील आव्हाने, भारतीय दृष्टीकोन, कुटुंबव्यवस्था आणि आज त्याचे औचित्य, शिक्षण आणि अभ्यासक्रम, चुकीचा इतिहास आणि पसरवलेले भ्रम, त्यांचे परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्याची गरज, समाजजीवनात झालेले बदल आणि सर्वसमावेशकता इत्यादी.
5.     माहिती आणि संगणकीय सुरक्षा - विविध स्रोतांमधून जमा झालेली माहिती, त्याचा उपयोग आणि दुरुपयोग, माहितीची चोरी, आणि सुरक्षा, घेण्याची काळजी, ह्या यत्रणेवर होऊ शकणारे हल्ले, इत्यादी.

वरील मुद्दयांवर विवेचन करून किमान माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment