याबाबत आपणास मुळीच शंका वाटत नसल्याचेही म्हटले आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा जो निर्णय घेतला त्याची प्रशंसाही केली. ज्यांना अर्थकारणाचे उत्तमज्ञान आहे, असे तज्ज्ञ भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करतात तर आपल्याच देशातील नेते सरकारच्या निर्णयावर वाटेल तशी टीका करतात. याला काय म्हणायचे? जागतिक बँकेच्या अहवालात तसेच त्या बँकेच्या पदाधिकार्यांकडून भारताचे जे कौतुक झाले त्याबद्दल खरे म्हणजे सर्वांना आनंद व्हायला हवा. पण सदैव राजकारणात लडबडलेल्या आणि भारतीय जनता पक्षाला पाण्यात पाहणार्या नेत्यांकडून अशी अपेक्षा कशी करायची?
सध्या हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमधील निवडणुकांवरून राजकारण ढवळून निघाले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीने आणि आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापत चालल्याचे चित्र दिसत आहे. हिमाचल प्रदेशात परवा म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या राज्यात भाजप सत्तेवर येणार की कॉंग्रेस, याचा निर्णय त्या दिवशी मतपेटीत बंद होईल. तेथील प्रचाराचा धुरळा खाली बसला असला तरी गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला प्रचार आगामी काही काळात शिगेला पोहोचणार आहे. या निमित्ताने विरोधक भाजपला कसे खिंडीत गाठता येईल, याचा प्रयत्न करीत असले, वाटेल तसा अपप्रचार करून मतदारांसमोर भाजपची बदनामी करीत असले, तरी त्यात विरोधकांच्या हाती फारसे काही लागल्याचे दिसत नाही. गुजरातच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा त्या पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी सांभाळत आहेत. राहुल गांधी ज्या प्रकारे प्रचार (की अपप्रचार?) करीत आहेत ते पाहून माध्यमांतील काहींना, राहुल गांधी यांचे नेतृत्व नव्याने बहरत असल्याचा साक्षात्कार झाला, तर कोणाला भारतीय राजकीय क्षितिजावर आता एक परिपक्व नेतृत्व उदयास येत असल्याचे वाटू लागले आहे. असे चित्र रंगविले जात असतानाच असा प्रचार करणारी मंडळी मात्र कॉंग्रेसला सत्ता मिळेल, असा कौल ठामपणे देण्यास मात्र तयार नाहीत. गुजरातमध्ये भाजपच सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज त्यांच्याकडूनच व्यक्त केला जात आहे.
आगामी काळात होणार्या काही राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि २०१९ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता कॉंग्रेसचा हा भावी अध्यक्ष पक्षाचा तारणहार बनेल, असे काहींना वाटत आहे. राहुल गांधी यांच्यातील ‘अनन्यसाधारण‘ गुणांचे दर्शन या जाणकारांना आतापर्यंत का झाले नाही, या न उलगडणार्या कोड्याचे उत्तर मात्र तीच मंडळी जाणोत.
भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून अगदी आतापर्यंत विशेष असे काहीच केले नसल्याचे विरोधी पक्षातील राजकारण्यांना वाटत आहे. अन्य काही हातात सापडत नसल्याने भाजप सरकारने २०१६ आणि २०१७ मध्ये जे दोन निर्णय घेतले, त्यावरून रान पेटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे चित्र रंगविले जात आहे. सरकारने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला जो निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या निषेधार्थ उद्या, ८ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिवस‘ पाळण्याचे विरोधकांनी ठरविले आहे, तर हा दिवस ‘काळा पैसाविरोधी दिन‘ म्हणून पाळण्यात यावा, असे आवाहन भाजपने केले आहे. भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांवरून विरोधक जनतेला भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांकडे, भाजपला विरोध करणे हाच एककलमी कार्यक्रमअसल्याने त्या सरकारने देशाच्या हिताचा विचार करून जे निर्णय घेतले त्याबाबत थंड डोक्याने विचार करण्यासही विरोधक तयार नाहीत. भाजपविरोधात सतत आदळाआपट करीत राहण्यापलीकडे त्यांना काही सुचत नाही.
अलीकडेच जागतिक बँकेने केलेल्या एका सर्वेक्षणात व्यवसाय सुलभतेचा विचार करता भारताने एकदम१३० क्रमांकावरून १००व्या क्रमांकावर झेप घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. ही माहिती बाहेर येताच त्याचा सकारात्मक परिणामलगेचच दिसून आला, पण विरोधकांना जागतिक बँकेच्या अहवालातही काही काळेबेरे असल्याचा संशय आला. हा अहवाल ‘फिक्स‘ केला असावा, असा संशय या मंडळीना आला. कॉंग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जागतिक बँकेत महत्त्वाच्या पदांवर कामकेले असल्याने त्या अहवालाबाबत शंका उपस्थित करणार्यांची तोंडे खरे तर त्यांनीच बंद करायला पाहिजे होती. पण, ज्या मनमोहन सिंग यांनी मौन पाळण्यातच आपली सर्व कारकीर्द घालविली त्यांच्याकडून अशी अपेक्षा तरी कशी करणार? मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीत जे घोटाळे झाले त्याबाबत ‘अळीमिळी गुपचिळी‘ बाळगली होती. त्यांच्याकडून किमान चांगल्या गोष्टींना तरी ‘चांगले’ कसे म्हटले जाणार? जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभतेसंदर्भातील अहवालावर टीका करणार्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टोला हाणला आहे. देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी या मंडळींनी काहीही केले नाही आणि जे करीत आहेत, त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. ‘‘तुमच्या सत्ताकाळात कायदे बदलून आर्थिक सुधारणा केल्या असत्या तर हे सौभाग्य आपणास लाभले नसते का?’’ असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना केला आहे. राहुल गांधी हे नजीकच्या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होऊ घातले आहेत. सर्व काही तयारी ठरल्याप्रमाणे चालू आहे. आता केवळ उपचार बाकी आहेत. हा मुद्दा लक्षात घेऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कॉंग्रेसवर बोचरी टीका केली आहे. त्यात चुकीचेही काही नाही. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी गेल्या अनेक वर्षांपासून विराजमान आहेत. पक्षांतर्गत निवडणुकांचे केवळ तोंडदेखले सोपस्कार पार पाडले जाऊन त्यांची पक्षाध्यक्षपदी वर्णी लावली जात आहे. आता या पुढील काळात राहुल गांधी यांच्याबाबत असाच प्रकार घडणार आहे. कॉंग्रेसची ही पक्षांतर्गत निवडणुकांची ‘परंपरा‘ पाहूनच अरुण जेटली यांनी केवळ कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत ‘फिक्सिंग‘ होऊ शकते, असे भाष्य करून जागतिक बँकेच्या अहवालावर जी फिक्सिंगची टीका केली गेली त्यातील हवा काढून टाकली आहे. जागतिक बँकेच्या उपाध्यक्ष (दक्षिण आशिया) ऍनेट डिक्सन यांनीही भारताने १३०व्या स्थानावरून १००व्या स्थानावर येण्याची जी कामगिरी केली आहे, त्याचे कौतुक केले आहे. आगामी काळात भारत आणखी चांगली प्रगती करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण आशियाई क्षेत्र आणि संपूर्ण जगाचा विचार करता, भारताने ही जी प्रगती केली आहे, ती अत्यंत स्पृहणीय असल्याचेही डिक्सन यांनी म्हटले आहे. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रीस्तलिना जिओर्जीवा यांनीही भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आहे. ’’एका वर्षात एकदमएवढी झेप घेणे दुर्मीळच. क्रिकेटमध्ये शतकाला जेवढे महत्त्व असते, तशी महत्त्वाची अशी भारताची ही कामगिरी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे प्रयत्न करण्यात आले, त्यामुळे हे शक्य झाले,’’ अशा शब्दांत त्यांनी मोदी यांची प्रशंसाही केली आहे. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या क्रीस्तलिना जिओर्जीवा यांनी, भारतीय स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात म्हणजे २०४७ मध्ये भारत हा उच्च - मध्यमउत्पन्न असलेला देश बनेल, याबाबत आपणास मुळीच शंका वाटत नसल्याचेही म्हटले आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा जो निर्णय घेतला त्याची प्रशंसाही केली. ज्यांना अर्थकारणाचे उत्तमज्ञान आहे, असे तज्ज्ञ भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करतात तर आपल्याच देशातील नेते सरकारच्या निर्णयावर वाटेल तशी टीका करतात. याला काय म्हणायचे? जागतिक बँकेच्या अहवालात तसेच त्या बँकेच्या पदाधिकार्यांकडून भारताचे जे कौतुक झाले त्याबद्दल खरे म्हणजे सर्वांना आनंद व्हायला हवा. पण सदैव राजकारणात लडबडलेल्या आणि भारतीय जनता पक्षाला पाण्यात पाहणार्या नेत्यांकडून अशी अपेक्षा कशी करायची?
२०२२ सालापर्यंत भारतातून गरिबीचे उच्चाटन होईल, देश भ्रष्टाचारमुक्त होईल, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच भारताने ८ टक्के दराने विकास केल्यास २०४७ पर्यंत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होऊ शकतो, असे म्हटले आहे. या सर्व घडामोडींकडे विरोधक आपला काळा चष्मा बाजूला ठेऊन कधी पाहणार? सरकारने देशहिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक करायचे सोडून काळा दिवस कसला पाळताय? जरा कौतुक करायलाही शिका ना!
-दत्ता पंचवाघ
No comments:
Post a Comment