Total Pageviews

Thursday, 23 November 2017

भारत ही सौंदर्याची खाण आहे- भारतीय मुलगी विश्वसुंदरी ठरते, ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकतेरयाणात मुुलींच्या जन्माचा दर ९५० इतका झाला आहे. त्याचमुळे हरयाणाची कन्या असलेली मानुषी छिल्लर ही जागतिक सौंदर्यवती झालेली आहे.

भारत ही सौंदर्याची खाण आहे. भारतीय सौंदर्यवतींच्या सौंदर्याची अगदी पुराणकाळापासून चर्चा होत राहिली आहे. अगदी द्रौपदीपासून राणी पद्मावतीपर्यंत... आता राणी पद्मावतीवर बेतलेल्या चित्रपटावरून देशात आगडोंब उसळला असताना, एक भारतीय मुलगी विश्वसुंदरी ठरते, ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकते अन् सौंदर्यवतीच्या इतिहासावरून उठलेल्या आगडोंबाने सुरू झालेली काहिली काही प्रमाणात शांत होते... हा निव्वळ योगायोग समजायचा का ?
२००० साली प्रियांका चोप्राने हा सन्मान मिळविला होता. त्या काळात जागतिक पातळीवरच्या या दोन्ही स्पर्धांत भारतीय मुलींना स्पृहणीय असे यश मिळाले होते. त्या वेळी समीक्षकांनी अचानक भारतीय मुलींना जागतिक सौंदर्यवतींच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळण्याचा वेगळा अर्थ उलगडून दाखविला होता. सौंदर्यप्रसाधने आणि फॅशनच्या जगताला भारतीय बाजारपेठ हवी होती. औद्योगिकीकरणात आघाडी घेतलेल्या पाश्चात्त्य देशांना भारताची बाजारपेठ खुणावत होती. नेमके त्याच काळात जागतिकीकरण, उदारीकरण आणि बाजारीकरण या ‘खाऊजा’ धोरणाचा स्वीकार भारताने केला होता. नरसिंह राव यांच्या काळात भारताची बाजारपेठ खुली झाली होती आणि नंतर भारतीय सौंदर्यवतींना स्पर्धांच्या निमित्ताने अशी प्रभावळ देणे सुरू झाले. त्याचा परिणामही दिसला. म्हणजे ही समीक्षणं अनाठायी नव्हती. भारतात सौंदर्यप्रसाधनांची विक्री अगदी खेड्यांपर्यंत पोहोचली. अगदी सामान्य घरांतील मुलीही जागतिक पातळीवर आपल्या सौंदर्याचा डंका पिटत असताना, नंतर मात्र त्या अमका साबण वापरला तर त्वचेवर सोन्याची झळाळी येते, असे जाहिरातीत सांगू लागल्या. त्याचा परिणाम हाच झाला की, अगदी १०० रुपये रोजाने कापूस वेचणार्‍या खेड्यातल्या मुलीचेही सौंदर्यभान वाढले! उन्हाने त्वचा टॅन होते, हे कधी नव्हे ते तिलाही कळू लागले आहे आणि मग तिला परवडेल अशा पाऊचमध्ये, त्वचा गोरी करणारे मलम तिच्यापर्यंत पोहोचू लागलेत. केसांत कोंडा होऊ नये म्हणून विविध प्रकारचे शॅम्पू आलेत अन् तेही पाऊचद्वारे ग्रामीण भागात पोहोचले. स्थानिक प्रसाधने नव्हती असेही नाही, परंपरागत प्रसाधनांची साधनेही नव्हती असेही नाही, अगदी मुलतानी मातीसारखी मातीही सौंदर्यवर्धन अन् रक्षण करीत होतीच. नदीच्या काठावरील जलगाळही केस धुण्यासाठी सक्षम होता, रिठ्याचाही वापर केला जात होताच...आता १०० रुपये रोजाने मजुरी करणारी खेड्यातली तरुणीही ३ हजार रुपये किलोच्या वर भाव जाणारे, त्वचेचे सौंदर्य वाढविणारे मलम पाऊचमध्ये वापरू लागली आहे. ती ४०० रुपये किलोचे तूप नाही खात, पण ३२०० रुपये किलोची सौंदर्यप्रसाधने मात्र वापरते. दात स्वच्छ आणि मजबूतही ठेवण्यासाठी कधीकाळी बाभळीची किंवा कडुनिंबाची काडी आम्हाला पुरेशी होती. आता मात्र विविध प्रकारच्या पेस्ट आल्या, ब्रश आले आणि दातांची झळाळी वाढविल्याचा ‘अहसास’ आम्हाला देऊ लागली. यात पैसा मात्र आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तिजोरीत जमा होऊ लागला... सौंदर्य स्पर्धांमध्ये जिंकलेल्या या तरुणी रुपेरी पडद्यावर रोजच आपल्या या जागतिक सौंदर्याचे प्रदर्शन करू लागल्यात आणि मग बाजार वाढला... त्या पृष्ठभूमीवर मानुषी छिल्लर या पोरीने १७ वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकली आहे. मधल्या काळात बाजाराच्या नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला. चीननेही बाजार व्यापला. भारतीय बाजारपेठ तर चिनी मालाने तुडुंब झाली आहे. जागतिक बाजारपेठ काबीज करण्यावरून अमेरिका, फ्रान्स, जपानसारख्या देशांशी चीनची जुगलबंदी सुरू झालेली आहे. ही स्पर्धा पराकोटीच्या पातळीवर पोहोचली आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारण वेगळ्या पातळीवर पोहोचले आहे. अशा वातावरणात मानुषीने चीनमध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेत मुकुट पटकाविला आहे. आता चीनदेखील कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारात जोराने दाखल होत आहे. कपड्यांच्या बाबत तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मुसंडी मारली आहे, याचे कारण त्यांना स्वस्त मजूर मिळतात. त्या पृष्ठभूमीवर मानुषीचे यश तपासून पाहिले पाहिजे.

मानुषीच्या यशाला दुसराही कंगोरा आहे. तो स्थानिक आहे, देशी आहे आणि त्याला एक वेगळे पर्यावरण लाभले आहे. मानुषी ही जाट समुदायाची आहे. हरयाणातली आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’च्या निमित्ताने उद्योग, व्यापार यांच्या संदर्भात देशांतर्गत आर्थिक आणि मूलभूत सेवाक्षेत्रात जी कामे केलीत, जे बदल केलेत त्याची दखल ‘मूडीज’सारख्या मानांकन संस्थांनी घेतली आहे. भारतात उद्योग सुरू करण्यास, भांडवली गुंतवणूक करण्यास चांगले वातावरण आहे, असा आंतरराष्ट्रीय समुदायाचा होरा होतो आहे. अशा वातावरणात मानुषीचे जागतिक सौंदर्यवती होणे हे वेगळे संकेत आहेत. त्यातही मोदींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या मोहिमेचा दोन वर्षांपूर्वी हरयाणाच्या पानिपत येथूनच प्रारंभ केला होता. त्या वेळी मुुलींच्या जन्माचा राष्ट्रीय दर १००० मुलांमागे ९१८ मुली असा होता. हरयाणाचा हाच दर ८६० होता. अर्थात, ही आकडेवारी अधिकृत होती. अनधिकृत आकडेवारी त्याही खाली होती. हरयाणात एका घरी चार मुले असतील, तर एकाचेच लग्न होऊ शकत होते. बाकीच्यांना अविवाहित राहावे लागत होते. मुलगी होऊच नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. मुलगी झालीच तर तिला दुधाच्या घंगाळात बुचकाळून मारण्याची अत्यंत क्रूर आणि घृणास्पद अशी प्रथा होती. (आताही आहेच.) ‘अगली बार बेटाही दिजो’ म्हणत नवजात मुलीला दुधाच्या भल्याथोरल्या घंगाळात मरायला सोडून दिले जात होते. मुलींच्या लग्नाला हुंडा द्यावा लागतो, मुलींच्या बापाला सतत मान खाली घालूनच राहावे लागते अन् लग्नासाठी आयुष्याची सारी कमाई लावावी लागायची म्हणून मुली नकोच असायच्या. त्याचा परिणाम हा झाला की, विवाहासाठी मुली मिळणे अशक्य झाले. विवाहासाठी आता मुलांना हुंडा द्यावा लागू लागला. बाहेरच्या राज्यातून मुली आणून त्यांच्याशी विवाह लावले जाऊ लागले. अर्थातच, अत्यंत विपरीत स्थिती असलेल्या गरीब घरच्या मुलीच या वाटेने यायच्या. २०१३ मध्ये भाजपाच्याच ओ. पी. धनकड या नेत्याने मतदारांना ‘‘तुमच्यासाठी बिहारमधून मुली आणू,’’ असे आश्वासन दिल्यावरून वादळ उठले होते. नंतर अर्थातच त्यांनी यू टर्न घेतला. ते खरे असो वा खोटे, पण त्यातून हरयाणात मुलांना विवाहासाठीही मुली मिळत नाहीत, हे वास्तव मात्र अधोरेखित झाले होते. मोदींनी ‘बेटी बचाव’चा नारा दिल्यावर हरयाणात भाजपाची सत्ताही आली अन् याच वर्षी एप्रिलमध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी ट्विट केले की, हरयाणात मुुलींच्या जन्माचा दर ९५० इतका झाला आहे. त्याचमुळे हरयाणाची कन्या असलेली मानुषी छिल्लर ही जागतिक सौंदर्यवती झालेली आहे. या वर्षीच्या २५ जून रोजी मानुषी ‘फेमिना मिस इंडिया’ ठरली होती. हरयाणातील जाट समाजात एका उच्चभू्र घरात तिचा जन्म झाला. तिचे वडील डॉ. मित्रा बसू छिल्लर हे डीआरडीओमध्ये वैज्ञानिक आहेत, तर आई डॉ. नीलम छिल्लर या इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेविअर अ‍ॅण्ड अप्लाईड सायन्सेसच्या न्यूरोकेमेस्ट्री विभागाच्या प्रमुख आणि सहायक प्राध्यापक आहेत. नवी दिल्लीतील सेंट थॉमस स्कूलमध्ये मानुषीचे शिक्षण झाल्यानंतर, तिने सोनीपत येथील भगत फूल सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज फॉर वुमेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला. मानुषी कुचीपुडी नृत्यातही निष्णात आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्येही तिने शिक्षण घेतले आहे... जिथे मुलींना जन्मच नाकारला जातो तिथली एक कन्या उच्च शिक्षण घेत जागतिक स्तरावर पोहोचते... हे वेगळे यश आहे!

No comments:

Post a Comment