Total Pageviews

Wednesday, 8 November 2017

त्रिपुरात डाव्यांचा दंगा महा एमटीबी 08-Nov-2017

त्रिपुरात उणीपुरी २४ वर्षे टिकाव धरून असलेली डाव्यांच्या सत्तेची गढी आता डळमळू लागली आहे. या जाणिवेने सत्ताधारी डाव्यांची झोप उडाली आहे. राज्याचे राजकीय तापमान कमालीचे तापू लागले आहे. रक्त सांडल्याशिवाय इथे सत्तांतर होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. डाव्यांचा रक्तरंजित वरवंटा फिरू लागला आहे. भाजप कार्यकर्त्यांचे बळी पडत असून छूटपुट हल्ले ही तर रोजची बाब झाली आहे.


लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले आणि त्रिपुरा राज्यात सुरू असलेली डावे पक्ष आणि कॉंग्रेसची लुटुपुटूची लढाई बंद झाली. केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाशी एक दशकभर सुरू असलेले डाव्यांचे सेटींग संपले. भाजपच्या नेत्यांनी - कार्यकर्त्यांनी गेली उणीपुरी तीन वर्षे इथे संघटना वाढण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांमुळे विरोधी पक्ष म्हणजे काय चीज असते याची माकपला बर्‍याच वर्षांनी जाणीव झाली. आता लढाई आरपारची आहे, हे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्याही चांगलेच लक्षात आले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या अस्त्रांचा वापर सुरू झाला आहे. अर्थातच, ही लोकशाहीत वापरण्यात येणारी वैधानिक अस्त्रे नसून डाव्या पक्षांची खास अस्त्रे आहेत. निवडणुकीच्या ठराविक काळाआधी ती डाव्यांच्या गढ्यांमध्ये म्यानातून काढली जातात. २०१६च्या अखेरच्या टप्प्यात गंडाछेरा येथे भाजप कार्यकर्ता चांदमोहन त्रिपुराची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी २०१८ च्या निवडणुकीत कोणाचे रक्त सांडणार याचा साधारणसा अंदाज आला होता. हा बळी पहिला असला तरी अखेरचा नाही, याची कल्पना भाजप नेतृत्वाला त्याच वेळी आली होती. २०१७ मध्ये हे बळीसत्र सुरू आहे. दहशतीच्या सावलीत संघटना वाढवण्याचे आव्हान भाजपचे कार्यकर्ते पेलत आहेत. कमलासागर विधानसभेतील कार्यकर्ता वीरूलाल सरकार (५५) यांची हत्या झाली. छावमनू येथील बुथप्रमुख निशिकांत चकमा (५०) यांची एका हाणामारीत हत्या करण्यात आली. छावमनू भागातील छयलेंगडा बाजारात माकपाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्यात चकमा यांचा बळी गेला. डाव्यांचाही एक कार्यकर्ता या धुमश्चक्रीत मारला गेला, पण अटक झाली भाजपच्या कार्यकर्त्यांनाच. डाव्यांचे आरोपी खुलेआमफिरताहेत. वीरूलाल आणि निशिकांत हे दोन्ही तळागाळातले कार्यकर्ते. चेहरा नसलेले, अज्ञात, परंतु त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. इतरांनी घराबाहेर पडू नये. सरकारविरोधात ओरड करू नये, लोकांत मिसळू नये, त्यांना जागृत करू नये, यासाठी काही जणांना धडा शिकवणे डाव्यांसाठी गरजेचे झाले होते. त्यांना संपविण्यात आले. मतदानाच्या दिवशी घराघरात जाऊन संपर्क करणारा कार्यकर्ताच माकपच्या सरकारला मात देणार, हे उघड आहे. त्यामुळे ती शेवटची साखळी गारद करता आली तर पाहावे नाही तर किमान त्यांच्यातल्या काही लोकांची हत्या करून दहशत माजवावी, अशी रणनीती या हत्यांमागे दिसते. मारहाण करून मरणासन्न अवस्थेत सोडून दिल्याची उदाहरणे तर कैक आहेत. गेल्या काही महिन्यातल्या या घटना पाहा! दक्षिण त्रिपुरातील बिलोनिया येथे भाजपच्या बुथ प्रमुखांची मिटींग सुरू होती. माकपचे गुंड घटनास्थळी पोहोचले. बैठक बंद करण्यासाठी दमदाटी केली. भाजप कार्यकर्त्यांनी दाद न दिल्यामुळे हाणामारी सुरू झाली. भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यांची वाहने जाळण्यात आली. शांती बाजार भागात भाजपचे झेंडे लावून फिरणार्‍या कार्यकर्त्यांचा टेम्पो जाळण्यात आला. प्रत्येक विधानसभेत हे प्रकार रोज सुरू आहेत. अशा घटनांमध्ये डाव्या पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची नावे तपासात पुढे येत आहेत परंतु त्यांना हात लावण्याचे धाडस पोलिसांत नाही.


अमरपूर विधानसभा नूतन बजार तीन महिन्यांपूर्वीच भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. माकप आमदाराचे नाव पोलिसांच्या एफआयआरमध्ये आहे, परंतु त्याला अटक होत नाही. खैरपूर येथे मोटार सायकलवरून जाणार्‍या भाजपच्या १०-१२ कार्यकर्त्यांना रोखून त्यांना जबर मारहाण झाली. मोटारसायकल सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले. त्यांच्या वाहनांची होळी करण्यात आली.


गेली अनेक वर्षे डाव्यांनी वापरलेली ही यशस्वी रणनीती आहे. अकार्यक्षमआणि भ्रष्ट कारभार, राज्यातील ६८ टक्के जनता दारिद्य्ररेषेखाली, बाद झालेली कायदा - सुव्यवस्थेची स्थिती असे दारूण चित्र कायमअसूनही धाकदपटशा आणि रक्तपाताच्या जीवावर सत्तेचा पट कायम राखण्याची ही रणनीती यशस्वी ठरली, पण आता रक्तपात करून सत्तांतर टाळणे माकपला शक्य होणार नाही, असे वातावरण राज्यात निर्माण झाले आहे.


गेल्या काही दशकांत डाव्यांनी सत्ता आणि संघटनेचा वापर करून त्रिपुराच्या तळागाळात शिरकाव केला. मतदार यादीतल्या प्रत्येक व्यक्तीचा तपशील त्यांच्याकडे आहे. राज्याची दुर्गमता, अविकास आणि डाव्यांची संघटनात्मक बांधणी या घटकांमुळे त्रिपुराचा किल्ला भाजपसाठी अभेद्य आहे, अशा गैरसमजात डावे नेते होते, पण पन्नाप्रमुख पातळीपर्यंत यंत्रणा उभी करून दाखवत राज्यातल्या भाजपच्या टीमने डाव्यांचे हे मोहजाल तोडले. संघटनेच्या गणितात पन्नाप्रमुख ही नवी भानगड आहे. कालपर्यंत संघटनेची रचना हजार बाराशे मतदार असलेल्या बुथपर्यंत होती, पण मतदार यादीतल्या एकापाठोपाठ पानावर नावे असलेल्या मतदारांचा एक प्रमुख ही कल्पना भाजपने राबवायला सुरुवात केल्यापासून डाव्यांना घेरी आली. आता यांना रोखणे कठीण आहे, याची जाणीव आणखी गडद झाली. त्यातून डाव्या नेत्यांना आलेली निराशा भाजप कार्यकर्त्यांसाठी जीवघेणी ठरते आहे. भ्रष्टाचारातून आलेला पैसा आणि पोसलेल्या गुंडांची फौज हाताशी घेऊन रोज राज्यात कुठे ना कुठे पंगे, राडे आणि हाणामार्‍या सुरू आहेत. माणिक सरकार यांच्या चेहर्‍यावरचा साळसूदपणाचा मुखवटा या घटनाक्रमामुळे गळून पडू लागला आहे, परंतु तूर्तास डाव्यांना त्याची तेवढी चिंता नाही. कारण, मुळात डाव्या पक्षांत असे मुखवटे सत्ता टिकवण्यासाठी बनवले जात होते. हा उद्देश पूर्ण होत नसेल तर मुखवट्यांचे ओझे बाळगून माकपला तरी काय उपयोग ?



हाणामारीत जीव गमावणार्‍या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन नातेवाईकांचे अश्रू पुसणे कधीच सोपे नसते. त्यामुळे भाजप नेत्यांसमोर कडवे आव्हान आहे. एका बाजूला कार्यकर्त्याचे अश्रू पुसताना या लढाईत तो डगमगणार नाही, अशी दुहेरी जबाबदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. त्रिपुराची लढाई सोपी नाही, सरळ नाही, जीवघेणी आहे.

No comments:

Post a Comment