चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपले अध्यक्षपद पुन्हा संपादन केले आहे आणि आता तर त्यांनी लालसेनेवरही हुकूमत प्रस्थापित केली आहे. त्यामुळे निदान चीनमध्ये त्यांना कोणी प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. त्याला अर्थातच त्यांच्या कारकिर्दीतील आर्थिक प्रगती हेच कारण मानले जात आहे; पण जी काही आर्थिक झेप जिनपिंग यांच्या काळात झाली, त्यातला मोठा हिस्सा अनेक देशांत गुंतवलेला असून, त्याचा मोठा पैसा शेजारी पाकिस्तानच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गुंतलेला आहे. त्याला चीन-पाकिस्तान व्यापारी महामार्ग म्हणून ओळखले जाते. त्यातला मोठा भाग म्हणजे बलुचिस्तानच्या किनार्यावर विकसित करण्यात येणारे ग्वादार बंदर होय. या बंदरामुळे चीनला दक्षिण चिनी सागराच्या किनार्यावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि पश्चिम आशिया व युरोपकडे होणार्या मालवाहतूक आदी बाबतीत चीनला खूप सुविधा मिळाव्यात ही अपेक्षा होती. किंबहुना, त्याच बंदर व महामार्गामुळे मध्य आशिया व रशियापर्यंतच्या देशांत थेट चिनी संपर्क साधला जाणार, अशी कल्पना डोक्यात घेऊन तो नवा खुश्कीचा मार्ग विकसित करण्यात आला होता. त्यातून आशिया, युरोप व आफ्रिकेत होणार्या व्यापारी वाहतुकीवर हुकूमत प्रस्थापित करण्याचे स्वप्न चीन बघत होता. मात्र, त्यांच्या अपेक्षेइतके त्याचे काम मार्गी लागलेले नाही. कारण, दुर्गम प्रदेश व पाकिस्तानी प्रदेशातील भागात माजलेला दहशतवादी जिहाद होय. मात्र, त्याच दरम्यान भारताने ग्वादारशेजारीच इराणी किनार्यावर होरमुझच्या खाडीचा आडोसा घेऊन चाबाहार बंदर विकसित केले आहे. ते बंदर इराणसाठी भारत विकसित करीत असून, त्या बंदरापासून थेट अफगाणिस्तानला जाणारा महामार्गही भारतानेच उभारून दिलेला आहे. साहजिकच, चाबाहार बंदरात जाणारा माल पुढे अफगाणिस्तान व मध्य आशियातील अनेक लहान-मोठ्या देशात थेट पोहोचू शकणार आहे. रशियालाही तोच मार्ग सोयीचा होणार आहे.
चाबाहार बंदराचा उपयोग आता सुरू झाला असून, भारताने आरंभ म्हणून गेल्या रविवारी 7 लाख टन गहू त्याच बंदर मार्गाने अफगाणिस्तानला पाठवलाही आहे. म्हणजेच जे स्वप्न चीन रंगवत बसला आहे, त्याची आरंभिक पूर्तता भारताने करून टाकलेली आहे. एकप्रकारे तो पाकिस्तानला शह आहे आणि परिणामी चिनी रणनीतीला दिलेला काटशहसुद्धा आहे. कारण, या मार्गे वाहतूक सुरू झाली आणि ती किफायतशीर ठरली; मग चीनच्या महामार्गाकडे कोण कशासाठी जाईल? भारताचा आतापासूनच मार्ग कार्यान्वित झाला. उलट, जिथे म्हणून चिनी महामार्गाचे काम चालू आहे, तिथे बांधकामाच्याच सुरक्षेसाठी चीनला आपले सैन्यबळ तैनात करावे लागलेले आहे. जिथे त्या बांधकामासाठी सुरक्षा पुरवावी लागते आहे, तिथून मालवाहतूक सुरक्षित कशी असू शकेल? म्हणजे चिनी-पाकिस्तानी महामार्गातली ती सर्वात मोठी अडचण असणार आहे. अजून तरी चीनला त्यावरचा उपाय सापडलेला नाही.
चिनी-पाकिस्तानी महामार्गाचा मोठा पट्टा डोंगराळ व बर्फाळ प्रदेशातून जाणारा दुर्गम आहे. खेरीज जो दक्षिणेचा भाग आहे, तो बलुचिस्तानातून जात असल्याने स्थानिक जनतेच्या कडव्या विरोधाने त्यात सातत्याने बाधा आणली जात असते. ती बाधा कमी म्हणून की काय, पाकिस्तानात फोफावलेल्या जिहादी टोळ्याही त्याच बलुचिस्तानी वाळवंटी ओसाड प्रदेशात आपापले तंबू टाकून बसलेल्या आहेत. स्थानिक टोळ्या व जिहादी यांच्यातही हाणामारी थांबवणे पाकिस्तानला शक्य होत नाही. म्हणून आपली गुंतवणूक सुरक्षित राखण्यासाठी चीनला तिथे लालसेनेच्या तुकड्या तैनात कराव्या लागत आहेत. खेरीज अधूनमधून तिथे काम करणार्या चिनी अभियंते व कर्मचारी यांच्या अपहरणाचेही नाट्य रंगत असते. अशा मार्गावरून आशिया वा अन्य कुठले देश किती मालवाहतूक करू शकतील? मालवाहतुकीला सुरक्षेची नव्हे तर सुरक्षिततेची गरज असते. प्रत्येक वाहन वा वाहनांच्या तांड्यांना सुरक्षा पथके पुरवून भागत नाही. कारण, जिहादी बाधा झालेल्या भागात लुटारू नसतात, तर तिथे घातपाताचे सापळे जागोजागी लावलेले असतात. म्हणजेच हाताशी सैनिकी पथकांची मदत असून काही उपयोग नसतो.
ने-आण करणारा चालक आपला जीव मुठीत धरूनच ये-जा करू शकतो. किंवा जीव धोक्यात घालूनच तिथून वाहने हाकावी लागतील. शिवाय ये-जा करणार्या मालाचे घातपातात होणारे नुकसान वेगळेच! अशी स्थिती अनुभवास येणार असेल, तर ग्वादारपेक्षा चाबाहार बंदर अधिक सुरक्षित ठरते. कारण, तिथून निघणारा अफगाणिस्तानचा रस्ता बहुतांश इराणच्या हद्दीतून जाणारा असून, त्याला जिहादी हिंसेची बाधा झालेली नाही. पुन्हा अफगाण हद्द पार केली, मग थेट कझाकस्तान वा मध्य आशियातील देशांचा मार्ग खुला होतो. एकदा तशी वाहतूक सुरू झाली, मग ग्वादार बंदर व त्याला जोडणारा महामार्ग कितीसा आकर्षक राहील? अजून तो पूर्ण झालेला नाही आणि भारत-इराण व अफगाणिस्तानने तर चाबाहारचा उपयोगही सुरू केला आहे. याचा एकत्रित परिणाम असा होतो, की चीन व पाकिस्तान यांच्यासाठीच ग्वादार बंदर वा त्याला जोडणारा महामार्ग उपयुक्त राहू शकेल. अर्थातच जितका तो पाकिस्तानसाठी सुरक्षित असेल, तितका चीनसाठीही सुरक्षित मानता येत नाही. कारण, आधीच त्या महामार्गाच्या आजूबाजूला स्थानिकांनी गनिमी युद्ध पुकारलेले आहे. साहजिकच, या प्रकल्पात चीनने केलेली अफाट गुंतवणूक ही अनुत्पादक ठरण्याचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तसा धोका बीजिंगच्या अनेक जाणत्या लोकांनी चीन सरकारला मागल्या दोन वर्षांपासून सांगितलेला होता; पण भारताला शह देण्याच्या हव्यासापायी चिनी अध्यक्ष व त्यांच्या सरकारने नको तितकी पाकिस्तानात गुंतवणूक केली आणि आता तोच आर्थिक गळफास बनण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment