Total Pageviews

Monday, 20 November 2017

यंदाच्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत सुमारे १९० अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात ११० हे विदेशी, प्रामुख्याने पाकिस्तानी होते, तर ८० हे स्थानिक अतिरेकी होते.

जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत सहा कुख्यात अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले. एकाच कारवाईत सहा दहशतवादी मारले जाणे, हे आतापर्यंतचे मोठे यश आहे. या कारवाईत आमच्या वायुसेनेचा गरुड कमांडो शहीद झाला. या व्यापक कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा नेता जकी उर रहमान लखवी याचा पुतण्याही मारला गेल्याचे सुरक्षा दलांनी म्हटले आहे. मागे हाफीज सईद याच्या भाच्यालाही यमसदनी पाठविण्यात आले होते. अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया आणि सुरक्षा दलांवरील तुफान दगडफेक थांबविण्यासाठी गतवर्षी ‘ऑपरेशन वॉश आऊट’ राबविण्याचा निर्णय घेण्यात येऊन २५४ अतिरेक्यांची यादी तयार करण्यात आली होती. त्या मोहिमेला गेल्या दोन वर्षांत चांगलेच यश मिळाले आहे.

लेफ्टनंट जनरल जे. एस. संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत सुमारे १९० अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात ११० हे विदेशी, प्रामुख्याने पाकिस्तानी होते, तर ८० हे स्थानिक अतिरेकी होते. यात घुसखोरी करणार्‍या ६६ पाकिस्तानीअतिरेक्यांचाही समावेश आहे. बांदीपुरातील हाजीन भाग हा अतिरेक्यांचा लपण्यासाठी अड्डाच बनला होता. त्यामुळे या भागात प्रामुख्याने अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. त्यात आम्हाला चांगले यश आले आहे. या संयुक्त कारवाईत लष्कराचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलिस, केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची संपूर्ण बटालियन, राष्ट्रीय रायफल्स आणि वायुसेनचे कमांडो अशा विविध सुरक्षा घटकांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला. आमच्या गुप्तवार्ता विभागाचाही यात मोठा सहभाग आहे. जो भाग अतिरेक्यांनी लपण्यासाठी निवडला आहे, त्या भागात दैनंदिन शोधमोहिमा हाती घेणे ही आमची योजना आहे. शनिवारच्या घटनेत आम्हाला अगदी अचूक माहिती मिळाली आणि आम्ही हाचीनला त्रिस्तरीय वेढा घातला. त्यामुळे अतिरेक्यांना पळून जाणे शक्यच झाले नाही. या अतिरेक्यांनी मग सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला आणि मग सारी सुरक्षा दले अतिरेक्यांवर तुटून पडली. गोळ्यांचा अक्षरश: पाऊस पडला. हे सहाही अतिरेकी या वेढ्यात सापडले आणि त्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कराच्या संयुक्त मोहिमेमुळे स्थानिक लोकांना बराच दिलासा मिळाला आहे. अतिरेक्यांची ही अचूक माहिती कशी मिळाली, याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी देताना म्हटले आहे की, बांदीपुरा भागात अतिरेक्यांनी गेल्या काही दिवसात उच्छाद मांडला होता. कुणाच्याही घरात घुसणे, त्यांना दमदाटी करणे आणि धमक्या देणे यामुळे लोक हैराण झाले होते. काही दिवसांपूर्वी अतिरेक्यांनी एका इसमाला, तो पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या संयशावरून त्याचे डोके छाटून टाकले होते. दुसर्‍या घटनेत एकाच कुटुंबातील दोन लोकांची यांनी हत्या केली होती. आता लोकच आम्हाला सूचना देत आहेत. पण, काही लोक हे अजूनही अतिरेक्यांना संरक्षण देत आहेत. बांदीपुराच्या घटनेत लष्कराने चांदरगीर खेड्यात संयुक्त कारवाई सुरू केली, तेव्हा काही लोकांनी दगडफेक सुरू केली. पण, तिहेरी वेढा असल्याने त्यांची दगडफेक तत्काण निष्प्रभ करण्यात आली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लोकांकडून सुरक्षा दलांना होणारी मदत. त्यासाठी लष्कराने एक योजना तयार केली आहे. या योजनेनुसार स्थानिक लोकांना भयमुक्त करणे, त्यांना दिलासा देणे, त्यांचे समुपदेशन करणे, युवकांसाठी विविध योजना आखणे, त्यांना लष्करात, पोलिसांत जाण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेणे, सामूहिक कार्यक्रम आखणे आदी बाबींचा यात समावेश आहे.

आता अशा कार्यक्रमात स्थानिक जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित राहात आहे, ही समाधानाची बाब आहे. हे यश मिळण्यामागे महत्त्वाचे कारण, स्थानिक जनतेने दिलेल्या सूचना हेही आहे. अतिरेकी प्रभावित क्षेत्रात गुप्तवार्तांचे मोठे जाळेही पसरविण्यात आले आहे. असे सर्व घटक एकत्र आल्याने अतिरेक्यांचा मोठ्या संख्येत खात्मा होण्यात आम्हाला दिवसेंदिवस यश प्राप्त होत आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा खोर्‍यात एकही अतिरेकी असेल. काश्मीर खोर्‍यात अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया आणि दगडफेकीच्या घटनांमुळे तेथील पर्यटनाच्या रोजगारासह सर्वच छोट्या-मोठ्या उद्योगांवर परिणाम झाला आहे. कारण, एखाद्या भागात हाताबाहेर स्थिती गेली की, तेथे कर्फ्यू लावला जायचा. यामुळे स्थानिक लोकही खूपच कंटाळले होते. एकदाची ही समस्या सुटावी आणि पुन्हा काश्मीरमध्ये पर्यटनाचा व्यवसाय फुलावा, असे सर्वांनाच मनोमन वाटत आहे. सुरक्षा दलांच्या या संयुक्त कारवाईमुळे पाकिस्तान बावचळला आहे. फारुख अब्दुल्लासारख्यांना आता पाकिस्तानचा कळवळा येऊ लागला आहे. बांदीपुराच्या घटनेनंतर लगेच पाकिस्तानने डीजीएमओ (मिलिटरी ऑपरेशन्स महासंचालक) स्तरीय वार्तेचा संदेश पाठविला. ती बैठक झालीही. पण, भारताला चांगले उमजले आहे की, अशा बैठकींनी काहीही साध्य होण्यासारखे नाही. त्यामुळे संयुक्त कारवाई सुरूच आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना तर पाठवितो, पण ते कारवाईत मारले गेले तर त्यांचे मृतदेह नेत नाही. कारण असे केेले तर आधीच झालेल्या जागतिक बदनामीत भर पडेल. त्यामुळे या प्रेतांना जाळून टाकण्याची एक कल्पना मागे समोर आली होती. पण, त्यावर अद्याप अंमल व्हायचा आहे. एकूणच खोर्‍यातील अतिरेक्यांना वॉश आऊट करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले असेच म्हणावे लागेल. पण, यासोबतच दुसरा मोठा धोका समोर ठाकला आहे. तो आहे, इसिसचा! बांदीपुराची घटना घडण्याच्या एक दिवस आधी श्रीनगरमधील चाकूरा पोलिस ठाण्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात एक अतिरेकी मारला गेला व एक उपनिरीक्षक शहीद झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे. सुरक्षा दलांनी इसिसवर खास लक्ष ठेवण्यासाठी आपल्या सर्व यंत्रणा कार्यरत करून इसिस आणि अतिरेक्यांचे फोन टॅप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागे दगडफेक करणार्‍यांमध्ये काही युवक हे इसिसचा झेंडा फडकावीत होते, हे आपण पाहिलेच. आता त्यांनीही प्रत्यक्ष हल्ले करायला सुरुवात केली आहे. इसिसने काही अतिरेकी संघटनांना हाती घेतले आहे व त्यामार्फत आपली उपस्थिती इसिस सध्या दर्शवीत आहे. सध्या हे प्रमाण अल्प असले तरी पुढे वाढणारच नाही, हे सांगणे कठीण आहे. आतापासूनच आमच्या सुरक्षा दलांना सतर्क राहावे लागणार आहे. एकीकडे सातत्याने पाकिस्तान सीमेवर युद्धबंदी नियमांचे सर्रास उल्लंघन करून गोळीबार करीत आहे. त्यालाही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी मोहीम राबविली जात आहे. तिसरा धोका इसिसचा आहे. त्यामुळे सुरक्षा दलांवर आगामी काळात मोठी जबाबदारी आहे. तूर्त, बांदीपुरातील यशासाठी आमच्या समस्त सुरक्षा दलांचे अभिनंदन! 

No comments:

Post a Comment