Total Pageviews

Friday, 3 November 2017

ब्रह्मपुत्रेवर दरोडा!

ब्रह्मपुत्रा नदीवरील हजार किलोमीटरचे भुयारी धरण’ हिंदुस्थानसाठी कायमची कटकट होऊन बसेलकावेबाज चीन ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा शस्त्राप्रमाणेच वापर करीत आहेभविष्यात युद्धाचा भडकाउडालाच तर चीनचे लालभाई हिंदुस्थानला रोखण्यासाठीही या धरणाचा वापर करू शकतातधूर्त आणिपाताळयंत्री चीनचे मनसुबे ओळखून आपल्या राज्यकर्त्यांनीही सर्वशक्तीनिशी ब्रह्मपुत्रेवरील चिनी दरोडारोखायलाच हवा!

चीन आणि पाकिस्तानसारखे देश ‘शेजारी’ म्हणून लाभावेत हे हिंदुस्थानचे खरोखरच दुर्दैव म्हणावे लागेल. सतत काही ना काही कटकारस्थाने करून हिंदुस्थानपुढे नवी डोकेदुखी कशी निर्माण करता येईल याचेच डावपेच पाकडे आणि चिनी माकडे सदैव आखत असतात. आताही तसेच घडले आहे. डोकलामच्या मुद्दय़ावरून युद्धाच्या भडक्यापर्यंत उडालेला संघर्ष अजून म्हणावा तसा शांत झालेला नसतानाच चिन्यांनी आता ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी पेटविण्याची नवीनच आफत निर्माण केली आहे. चीनमधून हिंदुस्थानात वाहत येणाऱया ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडविण्याचे भयंकर षड्यंत्र चीनने रचले आहे. हिंदुस्थानी हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी ब्रह्मपुत्रा नदी तिबेटवरच अडवायची आणि तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचे  सुरुंग खोदून भुयारी मार्गाने ब्रह्मपुत्रेचे पाणी चीनच्या शिनजियांग या अत्यंत दुष्काळी भागाकडे पळवायचे, असा डाव चिनी राज्यकर्त्यांनी रचला आहे. या सुरुंगाशिवाय असंख्य लहान-मोठय़ा कालव्यांच्या माध्यमातून आपल्याच देशातील इतर भागांकडे हे पाणी वळविण्याची तयारी चीनने चालविली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच तब्बल दीडशे अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम खर्च करून ही महत्त्वाकांक्षी योजना तडीस नेण्यासाठी चीन सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या हाँगकाँग शहरातील ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकानेच हा वृत्तांत प्रसिद्ध केला. त्यावरून हिंदुस्थान, बांगलादेश आणि एकूणच
आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद
उमटू लागताच चीनने ही बातमी खोटी असल्याचे खुलासे आता सुरू केले आहेत. मुळात चीनमधून कुठलीच बातमी कधीही बाहेर येत नाही. जे काही करायचे, ते जगापासून लपून-छपून आणि गुपचूप हाच चीनचा आजवर खाक्या राहिला आहे. मात्र, चुकून का होईना ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखणाऱया प्रकल्पाची इत्थंभूत माहिती चिनी मीडियानेच प्रसिद्ध केली. ती बातमीही खोटी ठरविणाऱया चीनवर आता विश्वास कोण ठेवेल? ब्रह्मपुत्रेचा प्रवाह रोखून तो आपल्याच देशात वळविण्याच्या चिनी काव्याचे भयंकर दुष्परिणाम हिंदुस्थानला भोगावे लागतील. त्यामुळे आपल्या राज्यकर्त्यांनी वेळीच सावध होऊन कुठल्याही परिस्थितीत ही योजना हाणूनच पाडली पाहिजे. चिन्यांनी ठरविल्याप्रमाणे हा एक हजार किलोमीटर लांबीचा बांध दुर्दैवाने तयार झालाच तर हिंदुस्थानच्या अरुणाचल प्रदेश, आसाम या निसर्गसंपन्न राज्यांचे थेट वाळवंटातच रूपांतर होण्याचा धोका आहे. आसामातून पुढे ब्रह्मपुत्रा नदी बंगालच्या खाडीत मिसळते. तथापि, या धरणामुळे हिंदुस्थानप्रमाणेच बांगलादेशला मिळणारे पाणीही बंद होईल किंवा चीनच्या दुष्काळी भागाची गरज भागवून उरलेले २५ ते ३० टक्के पाणीच बंगालच्या खाडीपर्यंत पोहचेल. म्हणजेच ब्रह्मपुत्रेवर दरोडा घालण्याचा चीनचा डाव हिंदुस्थानबरोबरच बांगलादेशसाठीही धोक्याची घंटा ठरू शकतो. हिंदू धर्मीयांचे अत्यंत पवित्र ठिकाण असलेले कैलास मानसरोवर हे क्षेत्र चीनच्याच ताब्यात आहे. याच कैलास पर्वतावर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. तेथून तिबेट, अरुणाचलमार्गे वेगाने दौडत येणारी ही
नदी आसामात आल्यावर
अजस्त्र रूप धारण करते. आसामात अनेक ठिकाणी या नदीच्या पात्राची रुंदी दहा किलोमीटरहून अधिक आहे. आसामची राजधानी गोहाटी, तेजपूर ही शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावरच आहेत. आसामच्या जगप्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याचा मुख्य जलस्रोतही ब्रह्मपुत्राच आहे. मात्र ब्रह्मपुत्रेचा प्रवाह बदलून या सगळ्य़ाच भूप्रदेशातील जनजीवन आणि एकूणच निसर्गाच्या नरडीलाच नख लावण्याचे काम चीनने सुरू केले आहे. तब्बल ३ हजार ८४८ किलोमीटर लांबीची ही आशिया खंडातील सर्वात मोठी नदी केवळ चीनमध्ये उगम पावते म्हणून चीनने जी दांडगाई चालविली आहे, त्याला लगाम घालण्यासाठी हिंदुस्थान आणि बांगलादेशने एकत्रितपणे व्यूहरचना आखायला हवी. पावसाळ्य़ात अतिवृष्टी होते, तेव्हा चीनमध्ये मोठा महापूर येतो. असे पुराचे संकट उद्भवेल, त्यावेळी एक हजार किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून चीनने मनमानी पद्धतीने महापुराचा लोंढा हिंदुस्थानात घुसवला तर काय हाहाकार उडेल, याची कल्पनाही न केलेलीच बरी. सुरक्षेच्या दृष्टीनेही ब्रह्मपुत्रा नदीवरील हजार किलोमीटरचे ‘भुयारी धरण’ हिंदुस्थानसाठी कायमची कटकट होऊन बसेल. कावेबाज चीन ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा शस्त्राप्रमाणेच वापर करीत आहे. भविष्यात युद्धाचा भडका उडालाच तर चीनचे लालभाई हिंदुस्थानला रोखण्यासाठीही या धरणाचा वापर करू शकतात. धूर्त आणि पाताळयंत्री चीनचे मनसुबे ओळखून आपल्या राज्यकर्त्यांनीही सर्वशक्तीनिशी ब्रह्मपुत्रेवरील चिनी दरोडा रोखायलाच हवा

No comments:

Post a Comment