Total Pageviews

Tuesday, 7 November 2017

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल यांनी नुकताच भारताचा चार दिवसीय दौरा


दृढ विश्वासाची भेट
 महा एमटीबी  07-Nov-2017
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल यांनी नुकताच भारताचा चार दिवसीय दौरा केला. यावेळी राजकुमार जिग्मे नामग्याल सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या छोटुकल्या राजकुमाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह सर्वांच्याच नजरा आपल्याकडे वळवल्या. भूतानचे राजकुमार जिग्मे नामग्याल यांनी बलाढ्य भारतापुढे जोडलेले चिमुकले हात कौतुकाचा विषय तर ठरलेच, पण ते दोन्ही देशांतील दृढ संबंधांचे, मैत्रीचे प्रतीक असल्याचे जगाला दिसले. भारत आणि चीनमध्ये गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये डोकलाममुद्द्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिग्मे खेसर यांची ही भेट महत्त्वाची होती. राजे जिग्मे खेसर यांच्या या भारतभेटीवेळी दोन्ही देशांत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा झाली. जगाचा आर्थिक, राजकीय आणि सामरिकदृष्ट्या आकर्षणबिंदू जसजसा युरोप-अमेरिकेकडून आशिया खंडाकडे सरकू लागला, तसतसा जगाचा संघर्षबिंदूही इकडेच स्थिरावण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारत आणि चीन ही या मुद्द्यांवर आजघडीला जगाच्या केंद्रस्थानी असलेली राष्ट्रे. आपल्या मालाला जगभरात पोहोचविण्याच्या उद्देशाने चीन वन बेल्ट वन रोडच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याची इच्छा बाळगतोय, तर भारताचा या प्रकल्पात सामील होण्यास विरोध आहे. भूतानही या प्रकरणी भारतासोबत आहे. चीनमध्ये यावर्षी आयोजित केलेल्या ओबोरपरिषदेवर भारताव्यतिरिक्त फक्त भूताननेच बहिष्कार टाकला होता. त्यामुळे भूतान आकाराने चिमुकला असला तरी मैत्रीसंबंध, विश्वास, बौद्ध-हिंदू संस्कृती अशा सर्वच दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाचा देश आहे.

चीनने डोकलामप्रकरणी वेळोवेळी आक्रस्ताळी भूमिका घेत भारताला धमकाविण्याचे प्रयत्न केले. काश्मीरप्रश्नी आम्ही हस्तक्षेप करू, अशी दर्पोक्तीही केली, पण भारत बधला नाही. तिबेट गिळंकृत केल्यानंतर चीनला आपल्या शेजारच्या छोट्या राष्ट्रांचा घास घेण्याची सुप्त इच्छा आहेच, पण भारताने डोकलामप्रश्नी चीनच्या धमक्यांना भीक न घालता भूतानला साथ दिली. भारताने या प्रकरणात संयत, समजूतदार भूमिका घेत मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना दाखवला आणि भूतानच्या मनात मित्र मदतीला धावून आलाचा विश्वास दृढ केला. त्याचबरोबर यामुळे भारत हा जशास तसे उत्तर देऊ शकतो, हा संदेशही जगभर गेला.

भारत आणि भूतानदरम्यान १९४९ साली द्विपक्षीय संरक्षण करार करण्यात आला. २००७ साली हा करार अद्ययावत केला गेला. या करारानुसार दोन्ही देश मित्रराष्ट्र असून दोघांपैकी कोणत्याही राष्ट्राने एकमेकांच्या भूमीचा वापर तिसर्‍या कोणत्याही राष्ट्राला मित्राच्या विरोधात करू द्यायचा नाही, अशी तरतूद आहे. या कराराचा फेरआढावा घेण्यासाठी भूतानचे राजे जिग्मे खेसर यांनी यावेळच्या भारतभेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत चर्चा केली. गेल्याच महिन्यात चिनी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात विद्यमान चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आणि माओ, डेंग जियापाओ यांच्या समकक्ष त्यांचे स्थान निर्माण झाले. चीन भूतानला आपल्या बाजूने खेचण्यासाठी नेहमीच दबाव टाकत असतो. या पार्श्वभूमीवरही जिग्मे खेसर नामग्याल यांची भारतभेट महत्त्वपूर्ण ठरते. डोकलामचा मुद्दा उपस्थित करण्यामागे चीनचा उद्देश भारत आणि भूतानमधील संरक्षण सहकार्यात पाचर मारून ठेवण्याचा होता, तो जिग्मे खेसर यांच्या या दौर्‍यामुळे सध्यातरी तडीस न गेल्याचेच स्पष्टपणे दिसते.

 भारताच्या दृष्टीने भूतानचे आगळे महत्त्व आहे. भारत आणि चीन या बलाढ्य राष्ट्रात असलेल्या छोट्या देशांना बफर स्टेटम्हणतात. नेपाळ आणि भूतानचा यात समावेश होतो. यदाकदाचित भारत आणि चीनमध्ये युद्ध झालेच, तर अशावेळी हे बफर स्टेटमहत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. या दृष्टीने भूतानचे सामरिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोकलामप्रश्नी भारताने चिनी बेटकुळ्यांना झुगारून देण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉर. भारताच्या ईशान्य भागाला मुख्य भूमीशी जोडणारा हा २७ किलोमीटरचा अतिशय महत्त्वाचा भाग. या भागाला चिकन्स नेकअसेही म्हणतात. कोंबडीच्या डोक्याचा भाग उर्वरित शरीराला धरून राहतो तो मानेमुळे. मुख्य शरीराच्या तुलनेत मानेची रचना जरी सडपातळ असली तरी तीच सर्वाधिक महत्त्वाची असते. अशी रचना भारताची मुख्य भूमी आणि ईशान्य भारताची आहे. त्यामुळे एकदा का या चिकन्स नेकवर ताबा मिळवला, तर भारताचा ईशान्य भागाशी संपर्क कायमचा तुटू शकतो. त्यामुळे डोकलामक्षेत्रावर चीनने ताबा मिळवला असता तर चीनला भारताची थेट गळचेपी करता आली असती. परंतु, भारताने दाखवलेल्या खमक्या भूमिकेमुळे चीनचे मनसुबे फलदूप झाले नाहीत.

 भारत भूतानच्या विकासासाठी मदत करत असून दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत होत आहेत. याचमुळे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथमभूतानचा दौरा केला. यावेळी त्यांनी भारताच्या मदतीने उभारलेल्या भूतानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तर केलेच, पण भूतानमधील होलांगचू हायड्रो पॉवर प्रकल्पाची पायाभरणीही केली. भूतानच्या ११व्या पंचवार्षिक योजनेलाही भारताने ४,५०० कोटींची मदत देऊ केली आहे. तसेच भारताच्या साहाय्याने भूतानमध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूतानमधील आरोग्य, शेती आणि मनुष्यबळ विकासयोजनांनाही भारताने मदत केली आहे.

 भूतान हा पूर्णपणे डोंगराळ देश असल्याने तेथे उंचावरून कोसळणार्‍या अनेक छोट्यामोठ्या नद्या उगमपावतात. असे उंचावरून कोसळणारे पाणी जलविद्युत निर्मितीसाठी अनुकूल मानले जाते. जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी वीज तर स्वस्त असतेच, पण त्यातून प्रदूषणाचीही शक्यता नसते. भारताची ऊर्जेची गरज मोठी असून त्याची पूर्तता करण्यासाठी भारत नवनवीन ऊर्जास्रोतांच्या शोधात असतो. परिणामी, भूतानमधील नद्यांमध्ये जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारल्यास त्याचा फायदा भारताला होऊ शकतो. भूतानमध्ये निर्माण केलेली वीज भारताने विकत घेतल्यास त्या देशाचे उत्पन्नही वाढू शकते, त्यातून भूतानचा तर विकास होईलच, पण भारताची ऊर्जेची गरजही भागवली जाऊ शकते. या दृष्टीनेही भारताच्या दृष्टीने भूतान महत्त्वपूर्ण आहे. आपल्या शेजारी देशांत भूतान हा असा एकमेव देश आहे, ज्याने आपल्याला कधी उपद्रव दिलेला नाही. त्यामुळे जिग्मे खेसर नामग्याल यांच्या भेटीला एक वलय प्राप्त झाले.


No comments:

Post a Comment