त्रिपुरात शंतनू भौमिक या पत्रकाराची हत्या झाल्यानंतर ठीक दोन महिन्यांनी सुदीप भौमिक या पत्रकाराची हत्या झाली. ही हत्या सरकार पुरस्कृत आहे, असे म्हणायला पूर्ण वाव आहे. सत्तेचा माज काय असतो हे पाहायचे असेल तर त्रिपुरातल्या डाव्या आघाडीच्या कारभाराकडे पाहाता येईल. त्रिपुरात सरकारी इन्टॉलरन्स टीपेला पोहोचला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड करणारे डावे-पुरोगामी विचारवंत माणिक सरकार पुरस्कृत या हत्यांबाबत मात्र मिठाची गुळणी करून बसले आहेत.
त्रिपुरातील 'चंदन पत्रिका’ या आघाडीच्या दैनिकाने त्रिपुरा स्टेट्स रायफलमधील (टीएसआर) भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणारी मालिका प्रसिद्ध केली. सुदीप भौमिक या युवा पत्रकाराने लावून धरलेला हा विषय म्हणजे शोधपत्रकारितेचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. धमक्यांना भीक न घालता त्यांनी हा विषय लावून धरला.
हा भ्रष्टाचार समजून घेण्याआधी टीएसआर ही काय भानगड आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने स्थापन केलेले हे निमलष्करी दल. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. टीएसआरकडे सध्या १५ बटालियनचे संख्याबळ आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले हे दल डाव्यांनी दहशत पसरविण्याचे साधन म्हणून वापरण्यात आले. डाव्यांची रेड आर्मी म्हणूनच त्रिपुरामध्ये हे दल ओळखण्यात येते. गुंडांची फौज म्हणा हवी तर. डाव्या नेत्यांच्या शिफारसीशिवाय त्रिपुरामध्ये सरकारी नोकरी मिळत नाही. टीएसआरमध्ये शिफारसींचा हा नियम कठोरपणे अमलात आणला जातो. विरोधी विचारसरणीच्या व्यक्तीला नोकरी मिळणे अशक्य. जे विचारसरणीला बांधील नाहीत त्यांना नोकरी देताना भरपूर पैसा वसूल केला जातो. हे दल म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या माणिक सरकार यांच्या कृपाछत्राखाली हा भ्रष्टाचार फळतो फुलतो आहे. विरोधकांना चेपण्याचे काम टीएसआरमार्फत केले जाते. विरोधकांना संपवणे, बडवणे, बेपत्ता करणे, बोगस एन्काऊंटर अशी सर्व कामे टीएसआरचे जवान करत असतात. भ्रष्टाचारातही डाव्या संघटनेतील नेते आणि मंत्र्यांच्या हातात हात घालून टीएसआर कार्यरत आहे. त्रिपुरात नशेसाठी वापरण्यात येणार्या कफ सिरपचे मोठे रॅकेट आहे. बांगलादेशात याची तस्करी केली जाते. हा काळा धंदा कोट्यवधींचा आहे. बंदी घातलेल्या कफ सिरपच्या बाटल्या लादलेले शेकडो ट्रक राज्यात ये-जा करतात पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. टीएसआरचे जवान या ट्रककडे ढुंकूनही पाहात नाहीत. कारवाई झालीच तर ती सीमा सुरक्षा दलाकडून केली जाते. कारण सरकारमध्ये सामील असलेले अनेक बडे नेते या धंद्यात वाटेकरी असून टीएसआरचे या धंद्याला आशीर्वाद आहेत. ड्रग तस्करीतही हेच रॅकेट काम करते. गोवंशांची बांगलादेशात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. ही रेड आर्मी या धंद्यातही लाभार्थी आहे.
चंदन पत्रिकेने टीएसआरच्या भ्रष्टाचाराची लक्तरे चव्हाट्यावर आणली. डावे नेते आणि त्यांच्या रेड आर्मीतले बडेही यामुळे खदखदत होते. येनकेनप्रकारेण हे रोखण्याचा मनसुबा त्यांनी रचला, त्यातूनच सुदीपची हत्या झाली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. टीएसआरचे कमांडंट तपन देबबर्मा यांनी मंगळवारी ११.३० वा. त्यांना दक्षिण त्रिपुरातील बोधजंग नगरमध्ये आपल्या निवासस्थानी बोलावले. पॉईंट ब्लॅक अंतरावरून गोळी झाडून त्यांना ठार करण्यात आले. सुदीप यांचा मृतदेह घटनास्थळापासून ६०० मीटर अंतरावर सापडला. त्यांनी सोबत आणलेली वृत्तमालिकेची कात्रणे बंगल्याच्या मागे जाळलेली पोलिसांना आढळली. सुदीप यांचे पेन देबबर्मा यांच्या ऑफीसमध्ये सापडले. देबबर्मा यांच्या बंगल्यातून सुदीप यांचा मृतदेह खेचत बाहेर आणल्याचे पुरावेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहेत. सुदीप यांचा मोबाईल मात्र गायब आहे. सर्व घटनाक्रम आणि पुरावे हत्या कोणी केली याकडे स्पष्टपणे अंगुलीनिर्देश करतो आहे. सुबल डे हे चंदन पत्रिकाचे संपादक. हा माणूस त्रिपुरातला ज्येष्ठ पत्रकार. त्यांनीच ही माहिती उघड केली आहे. तपन देबबर्मा यांचे माणिक सरकार यांच्याशी असलेले मधुर संबंध सर्वश्रुत आहेत. त्यांना राज्यात माणिक सरकार यांचा माणूस म्हणूनच ओळखले जाते. देबबर्मा यांचा बॉडीगार्ड नंदू रियांग या घटनेनंतर गायब झाला आहे. विरोधी पक्ष याप्रकरणी राज्यात रान पेटवेलच पण माणिक सरकारही डाव्या परंपरेनुसार गृहमंत्री म्हणून सरकार समर्थक आरोपीला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावतील, अशी दाट शक्यता आहे. नक्षली विचारधारेच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची ओरड करत त्रिपुरामध्ये मोठा मार्च काढण्यात आला. माणिक सरकारही यात सामील झाले होते. शांतनू भौमिकच्या हत्येनंतर मात्र लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का लागला नसावा, कारण डाव्यांनी निषेध मार्च वगैरे काढला नाही. ही हत्या लंकेश यांच्या हत्येएवढी गंभीर वाटली नसल्यामुळे कदाचित माणिक सरकार यांनी सीबीआय चौकशीसाठी शांतनूच्या पित्याने केलेली विनंतीही मान्य केली नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केल्याचे त्यांनी जाहीर केले. थोडक्यात हा विषय थंड्या बस्त्यात जाईल याची व्यवस्था केली. सुदीप यांच्या हत्येनंतर राज्य सरकार वेगळे काही करेल याची अपेक्षा नाही. सुदीप हे केवळ चंदन पत्रिकेशी संबंधित नव्हते. त्रिपुरात नंबर वन मानल्या जाणार्या दैनिक ’संबाद’ या दैनिकाचे संपादक प्रदीप दत्त यांचे ते पुतणे होत. ही दोन्ही दैनिके डाव्या विचारसरणीची बटीक नाहीत. राष्ट्रवादी विचार निर्भीडपणे मांडणारी आणि वेळप्रसंगी सरकारविरोधात भूमिका मांडणारी वृत्तपत्रे अशी त्यांची ओळख आहे. त्रिपुरात सरकारचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्यामुळे डावे अस्वस्थ आहेत. सत्ता हातून गेली तर तुरुंगात जावे लागेल, अशी भीती हत्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेल्या अनेकांना वाटते आहे. सरकारविरोधात लेखणी चालवाल तर तुमचा सुदीप भौमिक होईल, हा इशारा देण्यासाठी ही हत्या करण्यात आली आहे. डाव्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची डबल ढोलकी त्रिपुरामध्ये कानठळ्या वाजवणारे आवाज करीत फुटली आहे
No comments:
Post a Comment