- रस्त्यावर छोटामोठा अपघात झाला नाही, असा एकही दिवस सध्या जात नाही. शहरात व ग्रामीण भागातही अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. याला सर्वच जबाबदार आहेत. यातील काही वाहनचालक नशापान करूनही वाहने चालवून निरपराध नागरिकांचे बळी घेतात व काहींना शारीरिक इजा होऊन कायमचे अपंगत्वात राहतात. तरी अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करायला हवी. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कडक कायद्याचा अभाव. आजकाल ऊठसूट कोणीही गाडी घेतो आणि विनापरवाना गाडी चालवत असतो. पोलिसांनी अशा वाहकांना पकडले की काही वाहतूक पोलीस १००-२०० रुपयांसाठी त्यांना सोडून देतात. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांचीही संख्या वाढत चालली आहे. त्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कडक कायदा केला पाहिजे. यापुढे अपघात टाळायचे असतील तर गाडी चालविणाऱ्यांनी नियमानुसार चालविली पाहिजे आणि पोलिसांनीही चुकीच्या चालकांना कडक शिक्षा केली पाहिजे.
महामार्गावर होत असलेल्या अपघातात सतत वाढ होत आहे. त्याचप्रमाणात मुंबईकरांनाही रस्ते अपघातांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. कार, बाईकस्वार हे कोणतेही नियम न पाळता बेदरकारपणे वाहने चालवीत असतात. त्यातच वाहतूक पोलीस जागेवर नसतात, त्यामुळे सिग्नल आहे-नाही सारखेच. सध्या सिग्लनची कोणीही पर्वा करीत नाही. बाईकस्वार स्वतःच्या मस्तीतच गाडी चालवीत असतात. जिथून जागा मिळतील तिथून, खड्ड्यातून, रस्त्याने चालणाऱ्या प्रवाशांना दाखविण्यासाठी गाडी अति वेगाने, वाकडी-तिकडी करून पुढे जात असतात. रस्त्यावर वाहनांची संख्या सतत वाढत आहे. दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. बऱ्याच जणांना तर ‘घेतल्या’शिवाय गाडी चालविताच येत नाही आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईच्या उपनगरात जवळ जवळ दोन हजारांवर रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे आणि यावर नियंत्रण न ठेवल्यास हे प्रमाण वाढतच जाण्याची शक्यता आहे. मुंबईत वाहनचालक शिस्त पाळताना दिसत नाही. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील वाढते अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी यामुळे वाहतूक सुरक्षेच्या प्रश्नाचे गांभीर्य प्रकर्षाने समोर आले आहे. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती केली जाते. जागोजागी फलक उभारले जातात. मात्र भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांचे या फलकांकडे लक्ष नसते. अपघातानंतर उपाययोजनांची चर्चा होते. जनजागृती होते, पण कार्यवाही मात्र लालफितीत अडकून राहाते, हा आजवरचा अनुभव आहे. अरुंद रस्ता, धोक्याची वळणे, कोसळणाऱ्या दरडी, त्यात नियमांचे पालन न करता वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक ठेवणे, वाहनांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे या बाबीही अपघातांसाठी कारणीभूत ठरतात. नियम मोडणारा आणि नियम मोडले जाऊ नयेत यासाठी नेमलेला सरकारी माणूस यांच्यातच समेट होत असेल तर कायदा करून हा प्रश्न सुटणार नाही. अपघातांच्या घटनांपासून शासन-प्रशासन आणि वाहनचालक बोध घेत नाहीत तोपर्यंत अपघातांची संख्या कमी होणार नाही.
राज्यात सोडा देशभरात बहुतेक सर्वच ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडण्याची कारणं केवळ भ्रष्टाचार नव्हे, तर स्वयंशिस्तीचा अभावही आहे. वाट्टेल तशी वाहने हाकायच्या सवयीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची वाढती संख्याही तितकीच कारणीभूत आहे. वाहनविक्री अनिर्बंध वाढतेय, मात्र रस्ते आणि वाहतुकीचा दर्जा मात्र खालावतोय, याकडे कोणाचंच लक्ष नाही. केवळ मुंबईच्या वाहतुकीचा विचार केला तर वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांची संख्या (लेन कटिंग, सिग्नल न पाळणे, वन-वेतून उलट्या दिशेने गाडी हाकणे इ.) दिवसागणिक वाढतेय. जर मुंबईत एखाद्या सिग्नलवर सर्व्हे केला आणि वाहतुकीच्या नियमांबद्दल वाहनचालकांची परीक्षा घेतली तर ते ९० टक्के नापास होतील, याची खात्री आहे.
हे सर्व पाहता, येत्या काळात वाहतूक शिस्त लावण्याबरोबरच अनेक गोष्टींवर कठोरपणे अंमलबजावणी करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. केंद्र सरकार कदाचित विधेयक पारित करून कायदे बनवेलही, मात्र त्यांची अंमलबजावणी रस्त्यांवर होईल का, हा प्रश्न आहे. एका बाजूला चांगल्या कायद्यांची अंमलबजावणी न करण्याकडे कल असलेली भ्रष्ट यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचे अधिकारही माहीत नसलेले बेशिस्त नागरिक यांच्या मध्ये हे नियम अडकून पडले नाही, म्हणजे मिळवलं!
रस्ते रुंद झाले. आधुनिक वाहने रस्त्यावर आली. त्यामुळे या वाहनांचा वेगही कमालीचा वाढला. या वाढत्या वेगाच्या धुंदीने अनेकांचे बळी जात आहेत. पूर्वी वाहनांची संख्यांही कमी होती. त्यात आता कमालीची वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याची मुख्य जबाबदारी आता वाहनचालकांवर आहे. सुरक्षित अंतर, सुरक्षित वेग आणि सुरक्षित प्रवास ही त्रिसूत्री अमलात आणली पाहिजे. वाहनांतील ब्रेकपेक्षा मनाचा ब्रेक हा अपघात टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे तरच हे अपघात रोखता येईल
No comments:
Post a Comment