Total Pageviews

Friday 17 November 2017

सैन्यदलाची रचना- विवेक मराठी 13-Nov-2017


आपल्या देशाची सुरक्षा भूदल, नौदल आणि वायुदल यांच्यावर अवलंबून आहे. आज आपल्या सीमा असुरक्षित आहेत. एकीकडे पाकिस्तानची, तर दुसरीकडे चीनची डोकेदुखी असते. त्यामुळे सीमा सुरक्षेचा अभ्यास करत असताना सैन्यदलाची रचना कशी असते, हे समजून घेणे आवश्यक आहे.
भारताच्या सीमांची एकूण लांबी सुमारे 22000 कि.मी. आहे, हे आपण मागे पहिलेच आहे. यापैकी जमिनीवर असलेल्या सीमेची लांबी 15000 (अधिक अचूकपणे 15,106.7 कि.मी.) आहे. ही सीमा एकूण 7 देशांबरोबर आहे. पाकिस्तान - 3,323 कि.मी., चीन - 3,488 कि.मी., बांगला देश - 4,096.7 किमी., नेपाळ - 1,751 कि.मी., म्यानमार - 1,643 कि.मी., भूतान - 699 कि.मी., अफगाणिस्तान - 106 कि.मी. यापैकी अफगाणिस्तानबरोबरची सीमा आज तरी फक्त कागदावरच आहे. आजच्या क्षणाला पाकव्याप्त काश्मीरमुळे अफगाणिस्तानबरोबर सामायिक सीमा नाही. जर काश्मीर पूर्ण आपल्या ताब्यात असता आणि अफगाणिस्तानबरोबर ही 106 कि.मी.ची सीमा प्रत्यक्षात असती, तर भारत, चीन, पाकिस्तान यांच्या आणि खरे तर सर्व जगाच्या वर्तमानात काय आणि किती फरक पडला असता, हा भूराजकीय अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे.
इतक्या विस्तृत सीमेच्या रक्षणासाठी, प्रत्यक्ष युध्दासाठी तिन्ही दले (लष्कर, नौसेना आणि वायुसेना) मिळून 14,27,258 इतके सैन्य आणि 11,86,000 इतके राखीव सैन्य आहे. ह्यात अर्थातच मोठा वाटा (12,20,000, आणि 9,91,000 राखीव) हा लष्कराचा आहे, आणि भू सीमेच्या विचार करता तो योग्यही आहे. स्वातंत्र्यानंतर लढलेली सर्व युध्दे ही जमिनीवरच लढली गेली आहेत, आणि अन्य दोन्ही दलांची साहाय्यक भूमिका राहिली आहे.
लष्कराचा दोन प्रकारे विचार करता येतो. भौगोलिक रचना आणि कामाप्रमाणे रचना. प्रथम भौगोलिक रचना बघू या. भारतीय लष्कराची विभागणी एकूण सात विभागात केली आहे. त्यापैकी सहा विभाग भौगोलिक आधारावर आहेत, तर सातवा प्रशिक्षण विभाग आहे. हे सहा विभाग आणि त्यांची मुख्यालये पुढीलप्रमाणे - 1) पूर्व क्षेत्र - कोलकाता, 2) उत्तर क्षेत्र - उधमपूर, 3) उत्तर पश्चिम क्षेत्र - जयपूर, 4) पश्चिम क्षेत्र - चंदीगढ, 5) दक्षिण क्षेत्र - पुणे, 6) मध्य क्षेत्र - लखनौ. ह्याशिवाय प्रशिक्षण विभागाचे मुख्यालय सिमला येथे आहे, आणि सैन्य मुख्यालय अर्थात दिल्ली येथे आहे.
प्रत्येक क्षेत्रात दोन किंवा तीन कोअर इतके सैन्य असते आणि प्रत्येक कोअरमध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार डिव्हिजन सैन्य असते. ही संख्यात्मक रचना पुढीलप्रमाणे असते. सगळयात छोटा गट हा सेक्शन ह्या नावाने ओळखतात, ज्यात 10 सैनिक आणि नाईक स्तरावरचा एक प्रमुख असतो. यापुढे प्लॅटून, कंपनी आणि बटालियन अशी रचना असते. बटालियनची संख्या साधारणत: 900 असते आणि कर्नल पदावरील अधिकारी हिचा प्रमुख असतो. बटालियन ही मूलभूत लढाऊ  रचना असते. यापुढे तीन बटालियन आणि अधिक साहाय्यक आणि सेवा विभागाच्या आवश्यकतेप्रमाणे तुकडया अशी मिळून ब्रिगेड बनते, जी युध्दासाठी मूलभूत आणि स्वयंपूर्ण (गरजेप्रमाणे सर्व विभागांचा समावेश असलेली) रचना मानली जाते आणि तिचा मुख्याधिकारी ब्रिगेडियर असतो. अशा साधारणत: 3 ते 4 ब्रिगेड मिळून डिव्हिजन बनते आणि तिचा मुख्याधिकारी मेजर जनरल असतो, अशी रचना असते. एका डिव्हिजनमध्ये 12,000 ते 15,000 सैनिक असतात. एक डिव्हिजन ही स्वयंपूर्ण रचना असते, ज्यामध्ये युध्दाला लागणारे सर्व साहाय्यक विभाग आणि सेवा विभाग यांच्या आवश्यकतेनुसार तुकडया समाविष्ट असतात आणि त्या डिव्हिजनचा प्रमुख त्यांचा आवश्यक तसा उपयोग करण्याचे निर्णय घेतो.
याशिवाय प्रत्येक कमांडची विभागणी एरिया आणि सब-एरिया अशी केलेली असते, पण यांची कामे साधारणत: प्रशासकीय स्वरूपाची असतात.
कामाच्या स्वरूपावर अवलंबून अशी विभागणी मुख्यत: दोन प्रकारात होते. पहिला लढाऊ  आणि दुसरा सेवा. मात्र दुसरा विभाग सक्षम नसेल, तर पहिल्या - म्हणजे लढाऊ  विभागाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतो.
लढाऊ  विभागातही दोन प्रकार पडतात. पहिला पायदळ, ज्याला इन्फंट्री म्हणून ओळखले जाते. हा विभाग म्हणजेच प्रत्यक्ष सीमेवर लढणारा, शत्रुसैन्याला समोरासमोर उभे राहून मारणारा आणि वेळप्रसंगी स्वत:ची आहुती देऊन देशाचे संरक्षण करणारा, शत्रुप्रदेश काबीज करून त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणारा विभाग. या विभागातील सैनिकांकडे त्यांची स्वत:ची हत्यारे असतात, तसेच काही मोठी शस्त्रे - उदा., हलक्या आणि जड मशीन गन्स, उखळी तोफा, रॉकेट लाँचर्सही असतात.
मेकनाइज्ड इन्फंट्री हा विभाग म्हणजे हलक्या कवचधारी वाहनातून जलद हालचाली करणारे पायदळ. अशा हलक्या कवचधारी वाहनातून एका वेळी साधारणत: 10 ते 12 (म्हणजे एक सेक्शन) सैनिक त्याच्या आवश्यक सामग्रीसह जलदगतीने शत्रूच्या प्रदेशात मुसंडी मारू शकतात. परंतु अशा वाहनांना स्वत:ची अशी विध्वंसक ताकद नसते. हलक्या शस्त्रांपासून सैनिकांचा बचाव होईल इतकेच ह्या वाहनांचे कवच असते. साधारणत: इन्फंट्री विभागातून सैन्याच्या कमांडो आणि छत्रीधारी विभागांसाठी निवड केली जाते.
कमांडोज छोटया छोटया गटात शत्रूच्या पिछाडीवर उतरून घातपाती हालचाली करून शत्रूचे दळणवळण उद्ध्वस्त करणे, मोक्याच्या ठिकाणावर हल्ला करून गोंधळ माजवणे, पिछाडीवरील महत्त्वाची माहिती गोळा करणे इत्यादी कामे करतात. ह्यासाठी छोटे गट, छुप्या किंवा चोरटया हालचाली, अचानक आणि प्रभावी पण अत्यंत छोटया कालावधीचा हल्ला करणे अशी कामे करतात.
पॅराशूट रेजिमेंट - छत्रीधारी तुकडया विमानाच्या साहाय्याने शत्रुप्रदेशात उतरून त्याची कोंडी करणे, माघारीचे मार्ग बंद करून प्रचंड नुकसान करणे, अनपेक्षित दिशेने हल्ला करणे इत्यादी कामे करतात. कामाच्या गरजेप्रमाणे छोटया किंवा मोठया तुकडया वापरल्या जातात. एक छत्रीधारी ब्रिगेड म्हणजे स्वयंपूर्ण लढाऊ  ब्रिगेड, जिचे प्रत्येक अंग - म्हणजे साहाय्यक आणि सेवा विभागाच्या तुकडयासुध्दा विमानातून हवाई छत्रीच्या साहाय्याने उतरून युध्द करण्यात पारंगत असतात.
लढाऊ सैन्यातील दुसरा विभाग म्हणजे साहाय्यक सैन्य विभाग. ह्या प्रकारात आर्मर्ड (रणगाडा दल), आर्टिलरी (तोफखाना), इंजीनियर्स (अभियंता दल), सिग्नल्स (संपर्क विभाग) आणि आर्मी एव्हिएशन (लष्करी हवाई विभाग). आर्मर्ड विभागात भक्कम कवच असलेल्या परंतु हलक्या किंवा जड रणगाडयांचा समावेश असतो. त्यावरील तोफ आणि कवच यामुळे हा फरक असतो. भक्कम कवच, चाकांच्या जागी अखंड लोखंडी पट्टयांची योजना, शक्तिशाली तोफ इत्यादींमुळे शत्रूच्या भक्कम सुरक्षा फळीचा विध्वंस करून लढाऊ सैनिकांचा मार्ग मोकळा करणे, तसेच गरज पडल्यास संरक्षण फळी उभी करणे यासाठी या दलाचा वापर केला जातो. एका रणगाडयात 4 सैनिक असतात आणि एका तुकडीत (ज्याला रेजिमेंट असे म्हणतात) साधारणत: 45 रणगाडे असतात.
आर्टिलरी विभागाचा उपयोग शत्रूची ठाणी, तटबंदी, दळणवळण मार्ग आणि अन्य महत्त्वाच्या जागा उद्ध्वस्त करणे, प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वी शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करून त्याचे मनोधैर्य उद्ध्वस्त करणे आणि शत्रूचा तोफखाना बंद पाडणे यासाठी होतो. तोफेचा आकार आणि वापरले जाणारे गोळे यात विविध प्रकार असतात. साधारणत: तोफेच्या नळीच्या व्यासावरून तिचा पल्ला ठरतो, पण एकाच तोफेतून विविध प्रकारचे वेगवेगळी कामे करणारे गोळे वापरले जाऊ शकतात. तोफखान्याचा तोफेच्या प्रकाराप्रमाणे पल्ला साधारणत: 7 ते 40 कि.मी.पर्यंत असू शकतो. तसेच अतिविध्वंसक, प्रकाशदायी, धूर करणारे, कवचभेदी इत्यादी वेगवेगळया प्रकारचे गोळे गरजेप्रमाणे एकाच तोफेत वापरता येतात. तोफखान्याचा मारा अचूक व्हावा आणि त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवण्यासाठी, एक अधिकारी लक्ष्य नजरेच्या टप्प्यात येईल अशा ठिकाणी थांबून सूचना देत प्रत्यक्ष मारा नियंत्रित करतो, त्यांना 'ऑब्झर्व्हेशन पोस्ट' असे म्हणतात. हे काम जमिनीवरून किंवा विमानातून केले जाते. एका आर्टिलरी रेजिमेंटमध्ये साधारणत: 18 तोफा असतात.
इंजीनियर्स दलाचे काम म्हणजे सर्व प्रकारची स्थापत्य अभियांत्रिकीची कामे करणे (उभारणे आणि गरज पडल्यास उद्ध्वस्त करणेही). यामध्ये रस्ते, पूल, तात्पुरत्या किंवा कायम धावपट्टया तयार करणे, सुरुंग पेरणे किंवा शत्रूने लावलेले सुरुंग काढणे, थोडक्यात आपल्या सैन्याची हालचाल गतिमान होण्यासाठी आणि शत्रूची हालचाल रोखण्यासाठी जे करावे लागेल ते करणे ह्या कामात हे दल वाकबगार असते.
सिग्नल्स ह्या विभागातील सैनिकांकडे सगळयात छोटया सैन्य तुकडीपासून (स्थिर किंवा गतिमान) ते संरक्षण मुख्यालयापर्यंत सर्व पातळयांवर संदेशांची देवाणघेवाण व्यवस्थित ठेवणे हे काम असते. संदेशांची देवाणघेवाण हे कोणत्याही सैन्याची मज्जातंतू व्यवस्था असते, आणि त्याची परिणामकारकता ह्या दलावर अवलंबून असते. मानवी संदेश वाहकापासून ते अद्ययावत उपग्रह तंत्रज्ञानापर्यंत सर्व उपलब्ध तंत्रे वापरून ही यंत्रणा व्यवस्थित ठेवली जाते.
आर्मी एव्हिएशन विभागात साधारणत: हेलिकॉप्टर आणि छोटी विमाने वापरतात, ज्यायोगे अधिकाऱ्यांची तातडीची हालचाल, तोफाखान्यावर नियंत्रण, टेहळणी, जखमी सैनिकांची वाहतूक, शत्रुप्रदेशात सैन्य उतरवणे इत्यादी केली जाते. यामुळे प्रत्येक छोटया कामासाठी हवाई दलावर अवलंबून राहणे टळते.
वर उल्लेख केलेल्या प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकी विभागांशिवाय अन्य साहाय्यक दले सैन्यात समाविष्ट असतात.
आर्मी सर्व्हिस कोअर - सैन्य पोटावर चालतात ही म्हण खरी आहे, आणि ह्या कामाची म्हणजे सर्व सैन्याला रसद पुरवठा तसेच काही प्रमाणात वाहतूक आणि इंधन पुरवठा ही ह्या विभागाची जबाबदारी असते. यासाठी विविध क्षमतेचे ट्रक्स, डोंगराळ भागात आणि जिथे ट्रक जाऊ शकणार नाहीत अशा आघाडीच्या ठिकाणांवर खेचारांच्या साहाय्याने रसद पुरवठा हे ह्या विभागाचे कार्यक्षेत्र आहे.
आर्मी ऑॅर्डनन्स कोअर हा विभाग मुख्यत: सर्व शस्त्रास्त्रे, दारूगोळा, विशेष प्रकारचे कपडे, अन्य युध्दोपयोगी साहित्य - थोडक्यात, सर्व्हिस कोअर ज्या गोष्टींचा पुरवठा करत नाही त्या सर्व आपल्या कारखान्यांतून उत्पादन करणे, आयात करणे, खरेदी करणे इत्यादी मार्गाने उपलब्ध करून सैन्याच्या गरजा भागवत असतो.
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजीनियर्स - सैन्याकडे असणाऱ्या सर्व प्रकारच्या उपकरणांची दुरुस्ती करून ती सदैव उपयोगासाठी उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी ह्या विभागाची असते.
रिमाउंट आणि व्हेटर्नरी कोअर हा विभाग सैन्यात गरजेच्या असणाऱ्या जनावरांची (उदा., वाहतुकीसाठी खेचरे, कुत्रे, घोडे इत्यादी सर्व) खरेदी, पैदास आणि देखरेख ह्याकडे लक्ष देतो.
आर्मी पोस्टल कोअर हा विभाग सर्व प्रकारच्या टपालसेवेची जबाबदारी सांभाळतो, विशेषत: आघाडीवरील सैनिक आणि त्याचे घरी असणारे कुटुंबीय यांना ह्या कामाचे महत्त्व समजू शकेल.
आर्मी मेडिकल कोअर - अत्यंत खडतर परिस्थितीत संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सैनिकांच्या आरोग्य रक्षणाची सर्व जबाबदारी ह्या दलावर असते. प्रत्यक्ष आघाडीवर युध्द चालू असताना जखमींची देखरेख आणि उपचार, अपंग सैनिकांचे पुनर्वसन, त्या सर्व सैनिकांच्या कुटुंबीयांवरील आणि निवृत्त सैनिकांवरील उपचार ही प्रचंड मोठी, महत्त्वाची जबाबदारी हे दल सांभाळत असते. ह्या दलात काम करणाऱ्या डॉक्टर्सचे कौशल्य आणि कमीत कमी साहित्यात काम करण्याची क्षमता ह्याबद्दल एक प्रसंग प्रसिध्दच आहे. दुसऱ्या महायुध्दात पोटात गोळया लागून जखमी झाल्यावर सर्वांनी आशा सोडलेल्या एका अधिकाऱ्यावर उघडया जागेत कोणत्याही विशेष साहित्याविना केलेल्या शल्यक्रियेमुळे आपल्याला फील्ड मार्शल माणेकशा यांच्यासारखा अधिकारी लाभला.
कोअर आणि रेजिमेंट हे शब्द दोन प्रकारे वापरले जातात. कोअर म्हणजे दोन किंवा तीन डिव्हिजन गट, तसेच वर उल्लेख केलेल्या सर्व तुकडया, आणि रेजिमेंट म्हणजे मुख्य तुकडयांचे गट - उदा., मराठा रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट इत्यादी, तसेच विविध कोअर्सच्या छोटया तुकडया - उदा., आर्टिलरी रेजिमेंट. ह्याशिवाय काही अर्ध सैनिक दले सैन्याच्या मदतीला असतात, त्यांची माहिती नंतर घेऊ


No comments:

Post a Comment