Total Pageviews

Monday 16 May 2011

SAVE OUR GIRL CHILD

काही प्रश्न सनातन असतात का? नांदेडातील एका मुलीला हरियाणात विकण्यात आल्याची घटना बघून हा प्रश्न मनात तरळून गेला. ‘कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नावे॥असे तुकारामांचे एक वचन आहे. मुलगी, गाय आणि कथा (कीर्तन-प्रवचन) यांची विक्री करू नये, असे तुकाराम म्हणतात. आज या तिन्ही गोष्टी पाळल्या जात नाहीत, असे दिसून येते. मुलींकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन प्राचीन काळापासून कलुषितच राहिला आहे. मुलींना सन्मानाची वागणूक कधी मिळालीच नाही. म्हणूनच मुली विकू नका, असे तुकारामांना लिहून ठेवावे लागले. तुकारामांनी वारकरी पंथाचा कळसाध्याय लिहिला. वारकरी पंथाच्या आद्य संतांपैकी एक असलेले नामदेव मराठवाडय़ाचेच. नरसी नामदेव इथला त्यांचा जन्म. हे ठिकाण नांदेडपासून फार दूर नाही. नामदेवांनी भक्तिपंथाची ध्वजा पंजाबर्पयत नेली. आज इथल्या मुली हरियाणार्पयत विक्रीसाठी पाठविल्या जात आहेत. किती हा दैवदुर्विलास. मुलींबाबत आपल्या समाजाचा दुय्यम दृष्टिकोन हे जसे या विकृतीमागील एक कारण आहे, तसेच गरिबी हेही एक कारण आहे. खरे म्हणजे गरिबांच्या घरी मुलींनी जन्मच घेऊ नये. पाच-दहा रुपयांसाठीही अंग मोडून मेहनत करावी लागणा:या कुटुंबांसाठी पाच-पन्नास हजारांची किंमत किती मोठी असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. हरियाणात विक्री झालेली ही मुलगी नांदेडच्या गांधीनगर भागातील आहे. तिची आई मोलकरीण आहे. सुमनबाई सोनटक्के आणि भगवान दिगंबर चव्हाण यांनी तिला हरियाणात नेऊन विकल्याचे उघडकीस आले आहे. मुलीच्या आईला 50 हजार रुपये देण्याचे या जोडगोळीने कबूल केले होते. मात्र, त्यांनी आपले वचन पाळले नाही. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. मुलीच्या आईला 50 हजार रुपये मिळाले असते, तर कदाचित हे प्रकरण उघडकीस आलेच नसते. नांदेड म्हणजे आदिवासीबहुल जिल्हा. अठराविश्वे दारिद्रय़. जोडीला अज्ञान आणि अडाणीपण. बाईची किंमत ती किती! असा सामाजिक दृष्टिकोन. अशा प्रकारे कारणांचा समुच्चयच येथे दिसून येतो. त्यामुळे मुलींच्या विक्रीच्या घटना येथे वारंवार घडताना दिसतात. गेल्या दशकभरापासून हे प्रकार सुरू आहेत. पोलीस दप्तरांतील नोंदीनुसार, या भागातून विकण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुली मुंबईच्या रेड लाईट एरियात सापडल्या. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांचा एड्सने मृत्यू झाला. काही मुली दिल्लीच्या रेड लाईट एरियात सापडल्याच्या नोंदी आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटकातही येथून मुली पुरविल्या जातात. उत्तर भारतात विकल्या जाणा:या मुली लगAाच्या आमिषाने फसविल्या जातात, तर आंध्र-कर्नाटकात उत्तम नोकरीच्या आमिषाने मुली पाठविल्या जातात. या धंद्यात कोटय़वधी रुपयांचा व्यवहार होतो, असे सांगितले जाते. या घटनांत पोलीस फारसे गंभीर नसतात, असा अनुभव आहे. हरियाणात मुलींची संख्या कमालीची घटली आहे. लगAासाठी मुलींची उणीव भासत आहे. त्यामुळे नांदेडसारख्या भागातून मुली पळविल्या जातात, अशी वदंता आहे. गेल्या वर्षी हरियाणातील 10-12 जणांची एक टोळी मुलींच्या शोधात नांदेड जिल्ह्यात आली होती. देगलूरमध्ये एका लॉजमध्ये उतरून हे लोक मुलींचा शोध घेत होते. याबाबत पोलीस ठाण्यांत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. हे प्रकार रोखण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था काम करीत आहेत. 15 संस्थांनी एकत्र येऊन 8 तालुक्यांत सेव्ह अवर सिस्टर्सहा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, त्यांची ताकद तोकडी पडत आहे. हा प्रश्न सामाजिक, तसाच आर्थिकही आहे. दोन्ही पातळ्यांवर हाताळला गेला तरच या सनातन प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल.

-
चक्रधर दळवी

(
लेखक लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)

No comments:

Post a Comment