Total Pageviews

Monday 23 May 2011

AVOID ACCIDENTS

कहाणी वऱ्हाडाच्या प्रवासाची
ऐक्य समूह
Tuesday, May 24, 2011 AT 01:43 AM (IST)

राज्यात लग्नसराईच्या हंगामात ग्रामीण भागात वऱ्हाडाच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण पुरेशी काळजी न घेतल्यामुळे वऱ्हाडी मंडळींना अपघाताला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडतात. अशा अपघातांच्या वाढत्या संख्येमागील विविध कारणांचा घेतलेला वेध.
उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटनाचे बेत हमखास आखले जातात. या दिवसात लग्नसराई तसेच अन्य कार्यक्रम  जोरात असतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवास करणे भाग पडते. त्यात ऐन मे महिन्यातील कडक ऊन, गाड्यांना असणारी प्रचंड गर्दी,  यात प्रवास करायचा म्हणजे दिव्यच असते. पण हे दिव्यही हसतमुखाने स्वीकारले जाते. कारण लग्नाच्या उत्साहात प्रवासाची दगदग फारशी जाणवत नाही. त्यातही लग्नकार्य त्या शहरात किंवा गावात असेल तर ठीक अन्यथा पुन्हा सगळ्या वऱ्हाडाबरोबर प्रवास करणे भाग पडते.एकूण काय वऱ्हाड आणि प्रवास असे जणू समीकरणच जुळले आहे. पण हाच प्रवास सुखाचा व्हावा यासाठी कितपत काळजी घेतली जाते हा प्रश्नच आहे. कारण थोडासा निष्काळजीपणाही वऱ्हाडाच्या वाहनांच्या अपघाताला जबाबदार ठरू शकतो. अलिकडे अशा अपघातांची संख्या बरीच वाढली आहे.
गेल्या वर्षभरात राज्यातील विविध महामार्गांवर झालेल्या छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या 63 हजार इतकी असून त्यात वऱ्हाडाच्या वाहनांना झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यापुढील काळात हे अपघात कसे टाळता येतील याचा प्राधान्याने विचार करावा लागणार आहे. खरे तर प्रवासासाठी सुरक्षित वाहन म्हणून एस. टी. ला प्राधान्य दिले जाते. एस. टी. महामंडळानेही वऱ्हाडासाठी स्वतंत्र बसची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. पण ती परवडत नसल्याचे कारण सांगत अन्य खासगी वाहनांना पसंती दिली जाते. त्यातल्या त्यात शहरी भागात वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी एस. टी. बस किंवा खासगी बसेसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ग्रामीण भागात मात्र असा वापर तुलनेने बराच कमी आहे.
मालमोटारींचा वापर
ग्रामीण भागात वऱ्हाडाची ने-आण करण्यासाठी सर्रास ट्रक, मेटॅडोर, टेम्पो आदी मालवाहू वाहनांचा वापर केला जातो. लग्न धुमधडाक्यात पार पडावे अशी तर साऱ्यांचीच इच्छा असते. पण या समारंभासाठी जास्तीत जास्त व्यक्ती  हजर रहाव्यात असा अट्टाहास असतो. त्यामुळे झाडून साऱ्यांना निमंत्रणे दिली जातात. आता इतक्या संख्येने वऱ्हाडी आल्यानंतर त्यांना लग्नाच्या  ठिकाणी नेण्यासाठी काय व्यवस्था करायची हा प्रश्न असतो. माणसे वाढली म्हणून वाहनांची संख्या वाढवणेही आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. अशा वेळी ठराविक संख्येने असलेल्या वाहनातच साऱ्या मंडळींची व्यवस्था केली जाते. साहजिकच त्या वाहनातून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक व्यक्ती  प्रवास करतात. हीच क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी ठरते. आणखी एक बाब म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने वऱ्हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही अधिक असते.
वाहनाची योग्य देखभाल नसणे, वेगाची नशा तसेच मद्यप्राशन करुन वाहन चालवणे या कारणांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्याही मोठी आहे. विशेषत: ग्रामीण भागात प्रशिक्षित चालकांची वानवा असते. कसे का होईना वाहन चालवता येणे एवढेच प्रशस्तीपत्र महत्त्वाचे ठरते.  त्यामुळे प्रशिक्षण न घेतलेले, परवाना वा अन्य आवश्यक कागदपत्रे नसलेले अनेकजण बिनधास्तपणे वाहन चालवताना दिसतात. वाढत्या अपघातामागे हेही एक कारण आहे. वास्तविक आपण ताब्यात घेत असलेल्या वाहनाची स्थिती कशी आहे, त्याचा चालक प्रशिक्षित आहे का, त्याच्याकडे परवाना तसेच योग्य ती कागदपत्रे आहेत का याची आधीच चौकशी केली जाणे भाग आहे. ही थोडीशी काळजी घेतली तर वऱ्हाडाच्या वाहनांच्या अपघातांची संख्या बरीच कमी करता येईल. कमी भाड्यात वाहन मिळते म्हणून या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करणे केव्हाही परवडण्यासारखे नाही हे लक्षात घ्यायला हवे. वाहनांच्या वाढत्या अपघातामागे वेगाची नशा तितकीच कारणीभूत असते. वऱ्हाडी मंडळींना  लग्नाचा मुहूर्त साधता यावा यासाठी वाहन कमालीच्या वेगात चालवले जाते. विशेष म्हणजे बहुतांश वेळा अशा पध्दतीने वाहन चालवावे यासाठी वऱ्हाडी मंडळींकडूनच चालकावर दबाव येत असतो. हा आग्रह किती महागात पडू शकतो याची कल्पना संबंधितांना असायला हवी. वेगाने वाहन चालवताना चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
चालकांचा निष्काळजीपणा
ग्रामीण भागात ठराविक दिवशी आणि ठराविक मुहूर्तावर अनेक विवाह समारंभ पार पडत असतात. साहजिकच या समारंभांशी संबंधित वऱ्हाडी मंडळींच्या प्रवासासाठी वाहनांची कमतरता भासते. अशा वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी वेगवेगळ्या वऱ्हाडासाठी एकच वाहन ठरवले जाते. मग या साऱ्यांचा मेळ घालताना वाहन चालकाला बरीच कसरत करावी लागते. साहजिकच वाहन वेगात चालवणे, चालकाला पुरेशी विश्रांती घेण्यास वेळ न मिळणे या समस्या निर्माण होतात. त्यातूनच अपघाताची शक्यता वाढते. लग्नसराईच्या हंगामात जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने वाहन रात्रं-दिवस सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण याच प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागात अल्पवयीन चालकांची संख्याही अधिक आहे. वास्तविक अशा मुलांच्या हातात वाहन देणे चुकीचे ठरते. पण त्याला अटकाव घालण्याऐवजी तो लहान वयात वाहन कसे चालवतो याचेच कौतुक केले जाते. त्यातून ही लहान वयाची मुले उत्साहाने आणि कमालीच्या वेगाने वाहन चालवत राहतात. ऐन लग्नसराईच्या हंगामात प्रशिक्षित चालक मिळत नसल्यास अशा मुलांकडे वाहनाची जबाबदारी सोपवली जाते. एकतर अशा चालकांना वाहतुकीचे नियम माहीत नसतात, वाहन चालवण्याचा फारसा अनुभव नसतो, शिवाय या मंडळींना वेगाची नशा लवकर चढते. ही सारी कारणे अपघातासाठी कारणीभूत ठरतात. तरीही वऱ्हाडी मंडळीही त्याच्यावर विश्वास ठेवून वाहनातून प्रवास करण्यास तयार होतात. पण अशा चालकावरील विश्वास अनाठायी ठरतो हे लक्षात घ्यायला हवे. चालक कमी वयाचा किंवा प्रशिक्षित नसेल तर त्या वाहनातून प्रवास करण्यास नकार द्यावा हे उत्तम. असे सततचे नकार वाहनांच्या किंवा खासगी वाहतूक कंपन्यांच्या मालकांना योग्य तो धडा शिकवण्यास पुरेसे ठरतील  असा विश्वास आहे.
वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत आहेत का नाही हे पाहण्याची तसेच वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी पोलीस दलातील वाहतूक शाखेची असते. त्यामुळे जागोजागी वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली असते. मात्र, हे पोलीस आपले कर्तव्य कितपत प्रामाणिकपणे बजावतात हाही प्रश्नच आहे. उलट ही मंडळी आर्थिक तडजोडी करण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र सर्रास पहायला मिळते. वऱ्हाडी मंडळींनी खचाखच भरून वाहणारी, भरधाव वेगात जाणारी वाहने एकतर अडवली जात नाहीत किंवा अडवलीच तर त्यांच्यावर कितपत कारवाई होते हाही प्रश्नच आहे. बहुतेक वेळा इथेही आर्थिक तडजोडीने प्रकरण मिटवण्याकडेच कल दिसून येतो. वाहतूक पोलिसांचे असे दुर्लक्षही वऱ्हाडाच्या वाहनांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरते. या साऱ्या बाबी लक्षात घेता मानवी चुकांमुळे होणारे वाहनांचे अपघात टाळणे फारसे अवघड नाही हेच स्पष्ट होते. गरज आहे ती काही गोष्टींचे भान राखण्याची आणि सुरक्षित वाहतुकीचा मार्ग निश्चित करण्याची.
 अपघातांच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप
राज्यातील विविध मार्गांवरील अपघातांची संख्या तसेच त्यातील जखमी आणि मृतांची संख्या पाहिली म्हणजे या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. गेल्या वर्षभरात मुंबईत झालेल्या अपघातांची संख्या होती 23 हजार 499. या अपघातांमध्ये 549 जणांना प्राण गमवावे लागले तर यात 4 हजार 896 जण जखमी झाले. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या अपघातांची संख्या 1 हजार 54 इतकी असून त्यात 262 प्रवासी ठार झाले तर एक हजार 77 प्रवासी गंभीर जखमी झाले. पुणे विभागात गेल्या वर्षभरात 1 हजार 920 अपघात झाले असून त्यात तब्बल 2150 व्यक्तींना प्राण गमवावे लागले. यावरुन अपघाताची समस्या किती गंभीर आहे याची कल्पना येते. 
                     - अभय देशपांडे

No comments:

Post a Comment