राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असतानाच दुसरीकडे बंद पडणाऱ्या उद्योगांची संख्याही वाढत आहे. पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यातही सरकारला अपयश आले असून त्यामुळे नव्याने उभ्या राहणाऱ्या उद्योगांचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा परिणाम रोजगारनिर्मितीवर झाला असून शासनाच्याच आकडेवारीनुसार आज राज्यातील बेरोजगारांची संख्या ९० लाखांच्या घरात पोहोचली आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे. कोटय़वधी रुपयांचे उद्योग महाराष्ट्रात येत असून त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याच्या घोषणा राज्यातील आघाडी सरकारच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्या तरी वास्तवातील चित्र वेगळे आहे. एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असून दारिद्रय़रेषेखालील लोकांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. दारिद्रय़रेषेखालील लोकांची संख्या १२ लाखांनी वाढली असून बेरोजगारांची संख्या ९० लाखाच्या घरात गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये राज्याच्या ‘रोजगार व स्वयंरोजगार केंद्रा’मध्ये नोंदणी केलेल्यांची संख्या ३८ लाख आहे. राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य अशा विविध महाविद्यालयांमधून दरवर्षी लाखोंच्या संख्येने पदवीधर बाहेर पडत असतात. त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवी घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कारखाने बंद पडण्याबरोबरच शेतीला वीज व पाण्याचा तुटवडा असल्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रा’त डिसेंबर २००८ पर्यंत ३०,०७,३३६ व्यक्तींची नोंद केली गेली. यामध्ये महिलांची संख्या ७,४३,३६२ आहे. नोंद केलेल्यांपैकी ४, ८२,००० लोकांनी शालान्त शिक्षणही पूर्ण केलेले नाही, असे या विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यात पदवीधर उमेदवारांची संख्या चार लाख १३ हजार तर पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेल्यांची संख्या ४० हजारांहून अधिक आहे. गेल्या तीन वर्षांत या संख्येत आठ लाखांनी वाढ झाली असून यातील बहुतेकांना नोकरी देणे शक्य नसल्याचे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले. एकूण लोकसंख्येपैकी ३८.१ टक्के लोक म्हणजे सुमारे पावणेचार कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली आहेत. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील दारिद्रय़रेषेखालील लोकांचे प्रमाण ३.२ टक्क्यांनी जास्त असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे. २००६ ते ०९ या काळात ५९ हजार ७९६ लघुउद्योग बंद पडल्यामुळे तीन लाख ३९ हजार कामगार बेरोजगार झाले, तर याच कालावधीत १ हजार २९३ मोठे व मध्यम उद्योग बंद पडल्यामुळे दोन लाख १४ हजार लोक बेकार झाले. शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद के ल्यानुसार मार्च २०१० पर्यंत बंद पडलेल्या लघुउद्योगांची संख्या ३१ हजार ९१० एवढी असून एक लाख ६० हजारांहून अधिक कामगारांच्या नोकऱ्या यात गेल्या, तर मध्यम व मोठे ४१८ उद्योग बंद पडल्यामुळे ५८,४०८ लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे
No comments:
Post a Comment