आरोपी मारहाणप्रकरणी पाच पोलिस निलंबित
-
Sunday, May 29, 2011 AT 05:00 AM (IST)
पुणे - पोलिस आरोपीला अमानुष मारहाण करीत असल्याची शुक्रवारी प्रसिद्ध झालेली चित्रफीत पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यातील असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, दोघा पोलिस निरीक्षकांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. एका फौजदारासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.
एका गुन्ह्यातील आरोपीकडून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी पोलिस त्याला मारहाण करतानाचे दृष्य असल्याची चित्रफीत यू ट्यूबवर लोड झाली होती. त्याआधारे वृत्तवाहिन्यांवर बातम्या प्रसिद्ध झाल्या. 'ई- सकाळ'वरही याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीत हे दृष्य गेल्या वर्षीचे असल्याचे आढळून आले. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिस त्याला मारहाण करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याचे सांगण्यात आले. या आरोपीविरुद्ध खून, मारामाऱ्या व घरफोडीचेही गुन्हे दाखल आहेत. त्याला झालेल्या मारहाणीला जबाबदार धरीत पोलिस निरीक्षक मोतीचंद राठोड व सुभाष निकम यांची मुख्यालयात बदली करण्यात आली. तर एका फौजदारासह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले. या सर्वांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे.
दरम्यान, या घटनेबद्दल पोलिस व नागरिकांमधून विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ही घटना जुनी आहे. शिवाय चित्रीकरण करणाराही पोलिसच असल्याचा संशय आहे. आरोपीला हात न लावता गुन्हे कबूल करून घेणे व तपास करणे अवघड आहे, त्याशिवाय पोलिसांचा वचक राहणार नाही, अशा प्रतिक्रिया पोलिस आणि अनेक नागरिकांनीही व्यक्त केल्या. तर मानवी हक्क क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
शास्त्रीय पुराव्यांवर भर - आर. आर. याप्रकरणी गृहमंत्री आर. आर. पाटील मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'यापुढील काळात शास्त्रीय पद्धतीने पुरावे संकलित करण्यावर भर दिला जाईल. मारून मुटकून उभे केलेले पुरावे न्यायालयात टिकत नाहीत. पुण्यात घडलेली घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली, याची चौकशी करून पुढील भूमिका घेतली जाईल.''
No comments:
Post a Comment