कनिमोझी जाळ्यात टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा खरा सूत्रधार ए. राजा नव्हे, तर करुणानिधींच्या तिसर्या पत्नीची धाकटी कन्या कनिमोझी हीच आहे, इथवर सीबीआयने आता मजल मारली आहे. अर्थात, सुरवातीला राजा यांची पाठराखण करणार्या केंद्रातील सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीने आता राजा, कनिमोझी किंवा द्रमुकची चिंता करण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा सावरण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असावे. अन्यथा, हा महाघोटाळा उघडकीस आला तेव्हा सुरवातीच्या काळात ए. राजा यांची अगदी शेवटच्या मर्यादेपर्यंत पाठराखण करणार्या केंद्र सरकारने या घोटाळ्याचे धागेदोरे कनिमोझीपर्यंत पोहोचूच दिले नसते. ज्या तामीळनाडूतील विधानसभा निवडणुकीमुळे द्रमुकशी संबंध बिघडू नयेत याची पुरेपूर काळजी कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली, ती निवडणूक प्रक्रिया आता आटोपली आहे. द्रमुकचा सफाया झाल्याने ‘गरज सरो, वैद्य मरो’ या नीतीने टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सीबीआयला मुक्तहस्त देण्यात आला आहे राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श घोटाळा आणि टूजी स्पेक्ट्रम घोटाळा या तिन्ही घोटाळ्यांनी पुरत्या बदनाम झालेल्या डॉ. मनमोहनसिंग राजवटीची ही स्वतःची प्रतिमा सावरण्याची केविलवाणी धडपड आहे यात शंका नाही. कनिमोझी हिची टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील भूमिका मान्य करण्यास मात्र द्रमुक तयार नाही. राजा की कनिमोझी असा प्रश्न निघाला तर बळी दिला जाईल तो ए. राजा यांचाच. शेवटी काही झाले तरी कनिमोझी करुणानिधींची लाडकी कन्यका आहे. शिवाय त्यांच्याप्रमाणे तीही कवयित्री आणि तिचा लळा द्रमुकच्या या सर्वेसर्वाला खूप आहे हे गेल्या काही दिवसांतील घडामोडींतून स्पष्ट झालेच आहे. राजा यांना द्रमुकनेही जसे वार्यावर सोडले, तसे कनिमोझीच्या बाबतीत नक्कीच होणार नाही. कनिमोझी हा द्रमुकचा दिल्लीतला चेहरा आहे. राज्यसभेच्या खासदारकीद्वारे चार वर्षांपूर्वी तिला राष्ट्रीय पातळीवर प्रस्तुत केले गेले, तेव्हापासून तिची एक तरुण, तडफदार नेता अशी प्रतिमा निर्माण होण्याकडे द्रमुकने लक्ष पुरवले होते.ती सारी प्रतिष्ठा टूजी लाच प्रकरणात आता धुळीस मिळण्याची वेळ आली असली, तरी कनिमोझी कशी निरपराधी आहे आणि तिचे आणि राजा यांची जणू ओळखपाळखच नव्हती, इथपर्यंतचे युक्तिवाद करण्यासाठी राम जेठमलानींसारख्या निष्णात विधिज्ञाला पाचारण करून तिला या प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी करुणानिधी आणि त्यांचा पक्ष जंग जंग पछाडू लागले आहेत. कॉंग्रेसने कनिमोझीला निशाणा करताना सापही मरावा आणि लाठीही तुटू नये अशी तयारी अर्थातच केली आहे. टूजी स्पेक्ट्रम प्रकरणी स्वान टेलिकॉमने २१४ कोटींची लाच ज्या टीव्ही वाहिनीला पुरवली, त्या कलैनगर टीव्हीमध्ये कनिमोझीपेक्षा करुणानिधींची दुसरी पत्नी दयालुअम्मल हिचे भागभांडवल अधिक म्हणजे जवळजवळ साठ टक्के असतानाही तिचे नाव आरोपाच्या कक्षेबाहेर ठेवून कॉंग्रेसने दयालुअम्मलचे दोन पुत्र अझागिरी आणि स्टालिन यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. राजथीअम्मलची कन्या कनिमोझी आणि दयालुअम्मलचे दोन्ही पुत्र यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वविदित आहे. त्याचाच फायदा कॉंग्रेस उठवू पाहात आहे. शिवाय तामीळनाडूतील पराभवामुळे द्रमुक आधीच गोत्यात आलेली आहे. त्यामुळे हे सारे राजकीय हिशेब समोर ठेवून कनिमोझीवर कॉंग्रेसने घाव घातला आहे.तमीळनाडूत पानीपत झालेच आहे, कॉंग्रेसला आता संपूर्ण देशामध्ये स्वतःची घसरती प्रतिमा सावरायची आहे. मग त्यात राजा काय किंवा कनिमोझी काय, त्यांचा बळी गेला तरी त्यांना त्याची फिकीर करायचे काही कारण नाही. राजा आणि कनिमोझी यांची पापे त्यांच्याच गळ्यात बांधण्याचे राजकीय शहाणपण केंद्रातील कॉंग्रेसप्रणित सरकारने दाखवलेले आहे एवढे खरे. येत्या शनिवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात कनिमोझीचे भवितव्य ठरणार आहे. राजा यांच्या जोडीने त्यांनाही तिहार तुरुंगाची हवा खावी लागू शकते, कारण माथ्यावरचे राजकीय छत्र हरपले आहे.
No comments:
Post a Comment