Total Pageviews

Monday, 23 May 2011

DIRTY DISPLAY OF WEALTH BY MUKESH AMBANI

अँटिला आणि बापू कुटी- भांडवलाची मालकी एका पिढीपुरतीच मर्यादित असली पाहिजे - गांधीजी -सुरेश द्वादशीवार

 
गांधीजी म्हणत धनवंतांनी आपल्या संपत्तीकडे समाजाची ठेव म्हणून पाहिले पाहिजे. समाजाच्या मालमत्तेचे आपण केवळ विश्वस्त आहोत ही भावना त्यांनी मनात बाळगली पाहिजे.’ केवळ संस्कारांमधून अशी भावना रुजेल याविषयीची पुरेशी खात्री त्यांनाही नव्हती. त्यामुळे भांडवलाचा संचय एका पिढीपुरताच असावाअशी पुस्ती त्यांनी आपल्या विश्वस्त कल्पनेला जोडली होती. त्यांच्या मते वडिलांची संपत्ती त्यांच्या पश्चात वारसाहक्काने मुलांना मिळू नये. वडिलांच्या मागे तिच्यावर समाजाची मालकी यायला हवी. कसेल त्याची जमीन, घाम गाळील त्याला दाम या गांधीजींच्या श्रमनिष्ठेविषयीच्या सूत्रांशी हा विचार जुळणाराही होता. बापाने गाळलेल्या घामाचा दाम मुलाला मिळणे या सूत्रात बसत नाही आणि न केलेल्या श्रमाचा मोबदला कोणालाही मिळू नये हा श्रमप्रतिष्ठेचा विषयही त्यामुळे अधोरेखित होतो. एका पिढीपुरते मालमत्तेचे स्वामीत्व ही कल्पना भांडवलशाही हिंसेच्या मार्गाने नाहिशी करण्याच्या कृतीहून अधिक क्रांतिकारी आणि जास्तीची विधायक आहे. तीत हिंसा नाही. समाजाने, म्हणजे राज्याने केलेल्या कायद्याची ती साधी अंमलबजावणी आहे.. आहात तोवर विश्वस्त असा आणि नसाल तेव्हा ते विश्वस्तपण समाजाच्या स्वाधीन करा असा हा गांधीमंत्र आहे.
दुर्‍ख याचे की, गांधीजींच्या विश्वस्त कल्पनेचा नको तसा काथ्याकूट करणारी माणसे पुढे जाऊन त्यांच्या या क्रांती विचाराची चर्चा करताना फारशी कधी दिसली नाहीत. मालमत्तेच्या विश्वस्तपणावरच गांधी थांबले नाहीत. श्रम, बुद्धी, कला आणि प्रतिभा याही गोष्टी ते धारण करणार्‍यांच्या विश्वस्ततेच्याच बाबी आहेत व त्यांचाही वापर समाजासाठीच झाला पाहिजे असे ते म्हणत. गांधीजींची विश्वस्त कल्पना आणि एका पिढीपुरता संपत्तीच्या मालकीचा विचार देशाच्या नैसर्गिक संपत्तीच्या मालकीहक्कापुरता भारताच्याच नव्हे तर अमेरिकेच्याही सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. सरकार अशा संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहे हे त्यांनी मान्य केले. मात्र नैसर्गिक संपत्ती व तिच्याबाबतचे सरकारचे विश्वस्तपण या गोष्टी समजणे आणि स्वीकारणे वेगळे आणि वडिलोपार्जित संपत्तीवरील समाजाच्या मालकीहक्काचा क्रांतिकारी विचार स्वीकारणे वेगळे. हा विचार चर्चेत देखील येऊ न देण्याएवढा सार्‍यांनीच आजवर त्याज्य मानला. ही बाब समाजाच्या मालकीविषयक परंपरागत वृत्तीवर जसा प्रकाश टाकते तसा ती वृत्ती गांधीजींनीही तिच्या सगळ्य़ा परिमाणानिशी विचारात घेतली नसावी हेही दर्शविते.. गांधीजींसमोर सारेच आदर्श होते. आदर्शाच्या पातळीखाली येणे त्यांना जमणारेही नव्हते. (मार्क्‍सला मानणार्‍या माणसांनाही गांधीजींचा एका पिढीच्या मालकीहक्कासंबंधीचा संपत्तीविषयक विचार कधी गांभीर्याने घ्यावा असे वाटले नसेल तर तो त्यांच्याही झापडबंद वृत्तीचा पुरावा ठरावा.).. गांधीजींच्या पातळीवर जाणे कॉंग्रेसला जमले नाही आणि दुसर्‍या कोणत्या पक्षालाही ते साधण्याची शक्यता फारशी नव्हती. गरीब व शोषितांच्या म्हणविणार्‍या पक्षांना आणि संघटनांनाही वडिलोपार्जित संपत्तीवरचा मुलांचा हक्क संपविण्याचा विचार कधी शिवला नाही हेही याच संदर्भात नमूद करण्याजोगे.
प्रस्तुत लेखकापुढचा आताचा विषय विश्वस्ततेचा किंवा वडिलोपार्जित संपत्ती समाजजमा करण्याएवढा क्रांतिकारी वा गंभीर नाही. असलेल्या संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करण्याच्या सध्याच्या सवंग वृत्तीचा आहे. वडिलांनी मागे ठेवलेल्या संपत्तीच्या जोरावर श्रमा-घामावाचून नवी मालमत्ता उभी करायची आणि तसे करणे जमू न शकलेल्या वंचितांच्या वर्गासमोर तिचे बेशरम देखावे उभे करायचे या असंवेदनशील वृत्तीचा सामना आपण कसा करणार हा खरा प्रश्न आहे. टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे देशातील अग्रगण्य व सन्माननीय उद्योगपती आहेत. कोरस आणि जाग्वार हे इंग्लंडातील प्रकल्प विकत घेतल्यानंतर ते त्या देशातलेही सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे संचालक-मालक बनले आहेत. एका छोटय़ाशा फ्लॅटमध्ये राहणार्‍या आणि आपल्या संपत्तीचा मोठा वाटा देशकार्याला देणार्‍या रतन टाटांनी 90 अब्ज रुपये खर्च करून मुकेश अंबानी यांनी बांधलेल्या अँटिला या निवासस्थानाकडे देशाचे लक्ष वेधले आहे. अशा आलिशान इमारतीत राहणारी माणसे आपल्या अवतीभवतीच्या दारिद्रय़ाकडे व गरिबांकडे कधी लक्ष देतात काय असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
टाटा हे गांधी नाहीत. अंबानींच्या मालमत्तेचे सामाजीकरण करा असे ते म्हणत नाहीत. फक्त आपल्या संपत्तीचे धनवंतांनी गरिबांना डिवचणारे अभद्र प्रदर्शन करू नये एवढेच त्यांचे सांगणे आहे. आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला तीनशे कोटींचे विमान घेऊन त्याची जाहिरात भारतासारख्या गरीब देशात कोणी करीत असेल तर त्याच्यार्पयत गांधीजींचा विचार न पोहचला तरी एकवार चालेल. मात्र अशा माणसांनी किमान रतन टाटांचा विचार अवश्य केला पाहिजे. अ‍ॅरिस्टॉटल म्हणाला, संपत्ती ही मिळवणार्‍याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची बाब ठरते. मात्र असा विकास अविकसितांना दाखवून डिवचणे हा शहाणपणाचा आणि सामाजिक स्वास्थ्याचा भाग नव्हे. टाटांच्या शिकवणीतून येथील निबरांना काही शिकता आले तर ते देशहिताचे होईल.

-
सुरेश द्वादशीवार

No comments:

Post a Comment