श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व
२८ एप्रिल रोजी बाजीराव
पेशवे यांची जयंती
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची
देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी
त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. अशा
प्रकारचे कर्तृत्त्व गाजवणारे ते एकमेव सेनापती आहेत. त्यामुळेच मराठा साम्राज्य
विस्तारुन मध्य प्रदेश पार करुन राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहोचले होते.
आजच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासकांना त्यांच्या लढायांचे सुत्र अभ्यासण्यासारखे
आहे. २८ एप्रिल रोजी बाजीराव पेशवे यांची जयंती आहे.
आपण मराठ्यांच्या इतिहासाचा
अभ्यास करतो, त्यावेळेस दिसून येते की, छत्रपती शिवाजी
महाराजांच्या काळात गनिमी कावा या रणनीतीचा उपयोग झाला. मात्र, बाजीराव पेशवे राज्याचे प्रमुख बनले, त्यावेळेस
त्यांनी चपळ घोडदळाचा प्रामुख्याने उपयोग केला. यामागचे कारण म्हणजे, कुठलीही रणनीती निर्माण करण्यासाठी तीन गोष्टींचा विचार करावा लागतो. एक
म्हणजे आपला शत्रू आणि त्याची ताकद, दुसरे आपल्याकडे असलेले
सैन्य आणि तिसरे म्हणजे ज्या रणभूमीवर आपण लढत आहोत, तिची
रचना. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्यावेळेस त्यांना
मोगल, आदिलशाह, कुतूबशहा आणि अनेक
अंतर्गत शत्रूंचा सामना करावा लागला. बाजीराव पेशवे राजे बनले, तेव्हा इतर राजेशाहीचा अस्त झाला होता आणि मोगल हेच प्रमुख आव्हान होते. मात्र, दोन्ही वेळेस मोगल सैन्याची संख्या ही मराठ्यांपेक्षा खूप जास्त होती. म्हणूनच छत्रपती शिवाजी
महाराजांनी सह्याद्री डोंगराचा वापर करुन मोगलांच्या सैन्याला सह्याद्रीच्या
दर्याखोर्यात येण्यास भाग पाडले आणि त्यांच्यावर गनिमी काव्याने हल्ला करुन
त्यांना नामोहरम केले.
युद्धाचे डावपेच परंपरेला
सोडून
बाजीराव पेशव्यांच्यावेळी
परिस्थिती बदलली होती. फक्त मोगल हेच शत्रु राहिला होता.
स्वराज्याच्या सीमा वाढल्यामुळे सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या
सपाट भागापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे या भागात गनिमी कावा वापरणे कठीण होते.
म्हणून बाजीराव पेशवांनी तेथे घोडदळाचा वापर करुन शत्रूला पराभूत केले. बाजीराव
पेशवे हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. ते परंपरेला सोडून युद्धाचे डावपेच वापरत
होते. व्यक्तींमधील गुण हेरण्याचे कौशल्य त्याच्याकडे भरपूर होते. म्हणूनच त्यांनी
आपल्या हाताखाली शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले आणि इतर अनेक सरदारांना तयार केले. बाजीरावांनी युद्धाचे पहिले
प्रशिक्षण वडिल बाळाजी विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. अगदी लहानपणापासून
त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला आणि युद्धभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
युद्धकाळात ते सैनिकांबरोबरच उघड्यावर रहायचे. त्यांच्याप्रमाणेच जेवण आणि इतर
दैनंदिनी ठेवायचे. त्यामुळे सैनिकांचे त्याच्यावर अपार प्रेम होते. प्रत्यक्ष
युद्धाच्या वेळी आघाडीवर राहून, इतर सैनिकांप्रमाणे धोके
पत्करुन, नेतृत्व करायचे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक लढाईत
त्यांना प्रचंड यश मिळायचे. कारण जीवन आणि मरणाच्या रेषेवर नेतृत्व करण्याची एकच
पद्धत आहे, ती म्हणजे सैनिकांच्या आघाडीवर राहून नेतृत्व
करणे होय. ती बाजीराव पेशव्यांनी प्रत्यक्षात आणली होती.
बाजीराव पेशव्यांना
भारताच्या इतिहासात योग्य ते महत्व दिले गेले नाही. याचे एक कारण, ब्रिटिशांनी
भारताची सत्ता मोगलांकडून जिंकून घेतली असे भारताच्या राजकीय नेतृत्वाला दाखवायचे
होते. मात्र, सत्य वेगळे होते. ब्रिटिशांनी भारताची सत्ता
मराठा साम्राज्याकडून जिंकलेली होती.
ते स्वतः घोड्यावर बसून
सैन्याचे नेतृत्व करायचे. त्यांचे सैन्य घोडदळावर जास्त प्रमाणात अवलंबून होते.
मोगलांचे सैन्य युद्धांच्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य, बायका-मुले
घेऊन जायचे. त्यामुळे मोगल सैनिक एका दिवसात १० ते १२
किमीच पुढे जायचे. मोगलांचे सैन्य हे छोट्या शहराप्रमाणे असायचे. प्रत्येक दिवशी हे
शहर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असे. त्यामुळे
त्याची हालचाल ही अतिशय मंद होती. मात्र, बाजीरावांच्या सैन्याचा पुढे
जाण्याचा वेग मोगलांच्या चौपट होता. एक दिवसात ते ४० ते ५० किमी एवढे अंतर पार
पाडायचे. याचे कारण म्हणजे त्यांच्याबरोबर युद्धसामग्रीव्यतिरिक्त फारसे साहित्य
नसायचे. प्रत्येक सैनिकांकडे भाला किंवा तलवार आणि एक-दोन दिवस पुरेल एवढे धान्य
असायचे. इतर वेळी आजूबाजूला मिळेल ते धान्य वापरुन सैनिक आपले जीवन जगत असत.
त्यामुळे त्यांना गतिमान हालचाली करणे शक्य होत असे.
२० वर्षांच्या कारकिर्दीत ४१
लढाया लढल्या
बाजीरावांनी त्यांच्या २०
वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि ते एकमेव सेनापती आहेत, ज्यांनी या
संपूर्ण लढाया जिंकल्या. त्यामुळेच साम्राज्य विस्तारुन मध्य प्रदेश पार करुन
राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहचले होते. त्यांनी
लढलेल्या सर्वच लढायांचे वर्णन करणे शक्य नाही. मात्र, आज
युद्धशास्त्राचा अभ्यास करणार्या व्यक्तींनी त्यांच्या
लढायांचा, रणनीतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. माळव्यात मोगलांविरुद्ध केलेली लढाई ही दुसरी महत्वाची
लढाई. बुंदेलखंडच्या लढाईत त्यांनी छत्रसालाचे रक्षण केले. गुजरातमध्येही ते
उत्कृष्टरित्या लढले होते. तसेच जंजिराच्या सिद्धी विरुद्धही ते उत्कृष्टपणे लढले
होते. त्याची अत्यंत महत्वाची लढाई म्हणजे त्यांनी दिल्लीकडे केलेले कुच. त्यावेळी
दिल्लीची सत्ता जवळजवळ मराठ्यांच्या हातात आली होती. समुद्र लढायांमध्ये त्यांनी
पोर्तुगालविरुद्धही लढाई केली होती. नादिरशहाने मोगलांवर हल्ला करुन भारतात प्रवेश
केला. त्यावेळी मोगलांच्या मदतीला जात असताना नर्मदेच्या काठी आजारी पडून त्यांचा
मृत्यू झाला. त्यांची समाधी आजही रावरखेडी या नर्मदेच्या काठावरील गावात आहे.
पालखेडची लढाई महत्त्वाची
त्यांच्या लढायामध्ये निजामाविरुद्ध
झालेली पालखेडची लढाई महत्त्वाची मानली जाते.पालखेडच्या लढाईत निजामांनी
मराठ्यांमध्ये फूट पाडून शाहू आणि त्यांच्या बंधूंना वेगवेगळे केले आणि शाहू
महाराजांची राजधानी सातारा येथे कूच केले. त्यावेळा शाहू महाराज पुरंदरच्या
किल्ल्यात गेले. बाजीराव त्यावेळी खानदेशामध्ये लढाईला होते. शाहू महाराजांनी
त्यावेळी रक्षण करण्याकरीता बाजीरावांना सातार्याला बोलावले.
त्यावेळेस त्यांनी म्हटले
होते, ‘तुम्हाला झाड कापायचे असेल तर त्याच्या फांद्या कापण्यात काही अर्थ नसतो,
त्यासाठी झाडांच्या मुळांवर हल्ला करणे गरजेचे असते. यामागे
बाजीरावांचा उद्देश होता की, मोगल सत्तेचे मूळ हे दिल्लीकडे होते. ते छाटून या साम्राज्याला धक्का देणे हाच
उद्देश त्यांनी पालखेडमध्ये अमलात आणला.
म्हणून त्यांनी आपला पहिला
हल्ला मोगल असलेल्या गुजरात भागात केला. त्यानंतर माळव्यात
निजामांच्या रसदीचे जे तळ होते, त्यावर हल्ला केला. त्यामुळे निजामाचा
दिल्लीशी असणारा संबंध तुटला. त्यानंतर बाजीरावांचे घोडदळ औरंगाबादला येऊन पोहचले.
ती निजामाची राजधानी होती. त्यामुळे निजाम याकडे दुर्लक्ष करु शकला नाही. निजामाने
पुणे-सातारा आणि पुरंदरच्या भागात असलेली आपली लढाई थांबवून बाजीरावांशी लढाई
करण्याचा निर्णय घेतला. बरेच अतंर पार करुन निजामाचे सैन्य गोदावरी नदी पार करुन
औरंगाबादला पोहोचले. निजामाला वाटत होते की ते मराठा घोडदळाचा पाठलाग करत आहेत.
तिथे लढाई करण्यापेक्षा बाजीरावांनी त्यांना आणखी आत येऊ दिले आणि औरंगाबादपासून
काही किलोमीटर अंतरावरील पालखेड या ठिकाणी त्यांना येण्यास भाग पाडले. या ठिकाणी
येईपर्यंत निजामाची रसद तुटलेली होती, सैन्य थकलेले होते, अशा वेळी निजामावर बाजीरावांच्या सैन्याने दोन्ही बाजूंनी हल्ला केला. रसद बंद झाल्याने आणि काही हालचाल
करता न येऊ शकल्याने निजामाचे खूप नुकसान झाले. ६ मार्चला निजामांनी बाजीराव
पेशाव्यांसमोर शरणागती पत्करली.
बाजीरावांचे सैन्य छोट्या
छोट्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून युद्ध भूमीवर एकत्र यायचे. याला
इंग्रजीमध्ये (Concentration
at the point of decision) असे म्हटले जाते. शेवटच्या
क्षणी एकत्र आल्यामुळे शत्रूला त्याच्याविरुद्ध कारवाई करणे शक्य व्हायचे नाही.
तसेच शत्रूला आपला पाठलाग करायला लावून बाजीराव त्यांना थकवायचे आणि शेवटी शत्रूला
अशा भागात यायला भाग पाडायचे, जिथे शत्रुवर ३-४ ठिकाणाहून हल्ला करणे सोपे
व्हायचे.
बाजीरावांनी पोर्तुगीजांशीही
लढाई केली. त्यांनी पोर्तुगीज आणि सिद्धी यांना हरविले. वसईची लढाई आणि सिद्धीशी
झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. जंजिराच्या सिद्धीला कोकणामध्ये आपले
राज्य पसरविण्यात त्यामुळे यश मिळाले नाही. बाजीराव पेशव्यांच्या युद्धकौशल्याचा
भारतातील इतिहासकारांनी फारच कमी अभ्यास केला आहे. जदुनाथ सरकार ग्रॅट डफ
यांसारख्या काही इतिहासकारांनी त्यांचा
अभ्यास करुन बाजीरावांचे युद्धकौशल्य सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बाजीराव पेशवे हे भारतातील
सर्वांत कुशल घोडदळाचे सेनापती
युरोपमधल्या युद्धकुशल सैन्य
अधिकार्यांनी बाजीरावांच्या कौशल्याचे कौतुक केलेले आहे. फिल्ड
मार्शल मॉण्टगोमरी हे ब्रिटिश सैन्याचे सरसेनापती होते. दुसर्या महायुद्धात ब्रिटिश सैन्य जिंकले त्याचे श्रेय त्यांच्या नेतृत्वाला दिले
जाते. त्यांनी म्हटले आहे की, बाजीराव
पेशवे हे भारतातील सर्वांत कुशल घोडदळाचे सेनापती होते. असेच कौतुक व्हिएतनाम
सैन्यामध्येही केले गेले आहे. थोडक्यात बाजीराव पेशव्यांनी त्या काळाला योग्य ठरेल
अशी युद्धनिती वापरुन त्यावेळचे निजाम, मोगल व ईतर शत्रूचा पराभव केला. त्यामुळेच त्यांचे इतिहासामधील स्थान आढळ आहे.
भारताच्या शत्रूंनी बाजीरावांची घोडदौड थांबविण्याकरीता नादिरशहाला इराणमधून
भारतात हल्ला करण्यासाठी बोलावले. बाजीराव त्यांच्याशी लढण्यासाठी जात असतां आजारी पडले आणि
नर्मदेच्या काठावर त्यांचा मृत्यू झाला. बाजीराव दिल्लीला पोहोचून नादिरशहाशी लढले
असते, तर युरोपात गेलेला भारताचा कोहिनूर हिरा आणि मयूर सिंहासन
हे भारतातच राहिले असते. त्याचवेळी भारतात मराठ्यांचे साम्राज्य तयार झाले असते
आणि कदाचित ब्रिटिशांनाही भारतभूमीमध्ये येणे आणि इथे राज्य करणे कठीण झाले असते.
म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजानंतर बाजीराव पेशवे हे अतिशय सर्वोतकृष्ट रणनीती
सेनापती होते.
No comments:
Post a Comment