Total Pageviews

Thursday, 26 May 2011

care poor people

संपत्तीचा माज नको
ऐक्य समूह
Wednesday, May 25, 2011 AT 01:30 AM (IST)
Tags: editorial

देशातली कोट्यवधी गरीब जनता दोन वेळच्या अन्नाला महाग असताना, हजारो कोटी रुपयांचे राजमहाल उभारुन, संपत्तीचे प्रदर्शन घडवणाऱ्या उद्योगपतीवर रतन टाटा यांनी चढवलेला हल्ला म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या भावनांचे प्रगटीकरण होय! लंडनच्या वास्तव्यात टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी "अँटिलिया', या मुंबईत मुकेश अंबानी यांनी बांधलेल्या आलिशान बंगल्यावर टीका करताना, आपल्या घराभोवती राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचा श्रीमंतांनी विचार करायला हवा. वीज, पाण्याचा वारेमाप वापर करुन श्रीमंतीचे प्रदर्शन आणि उधळपट्टी करणे योग्य नाही. जेव्हा समाजात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील आर्थिक दरी वाढत जाते, तेव्हा गरिबांचे अधिकच शोषण होते. बडे भांडवलदार आपल्या तुंबड्या भरतात आणि गरीब मात्र अधिकच कंगाल होतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत सुविधांपासून गरीब माणसे वंचित राहतात. ही सामाजिक विषमताच क्रांतीला निमंत्रण देणारी ठरते, असा खुलासा रतन टाटांनी लंडनमधल्या आपल्या त्या वक्तव्यावर केला आहे. आपण मुकेश अंबानी यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नव्हती. त्यांचे नावही घेतले नव्हते. मुलाखत घेणाऱ्या त्या पत्रकाराने त्यांचे नाव घेतले, असे सांगून रतन टाटांनी, आपण व्यक्तिगत कुणाचाही द्वेष करीत नाही, कुणाच्या श्रीमंतीचा आपल्याला हेवा वाटत नाही. पण श्रीमंतांना गरिबांच्या समस्या, अडचणीबद्दल कळवळा असायलाच हवा, असे मात्र त्यांनी पुन्हा सांगितले. रतन टाटांना हे सांगायचा वंशपरंपरागत अधिकार आहे. अलीकडच्या काळात राजकीय वारशाचा, प्रचंड संपत्तीचा, सत्तेच्या राजकारणाचा अधिकार सांगणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच, रतन टाटा यांच्यासारखी आपण समाजाच्या मालमत्तेचे विश्वस्त आहोत, असे समजून त्यानुसार कृतिशील वागणारी श्रीमंत माणसे खूप कमी व्हायला लागली आहेत. सत्तेच्या जोरावर शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता करणाऱ्या राजकीय दरोडेखोरांची संख्या वाढती आहे. एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांचा टु-जी स्पेक्ट्रम घोटाळा करणारे माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत शेकडो कोटी रुपयांची हडपा हडपी करणारे सुरेश कलमाडी, अशी नालायक माणसे सरकारच्याच म्हणजेच पर्यायाने जनतेच्या पैशावर बेशरमपणे डल्ला मारतात. निर्लज्जपणे आपण निर्दोष असल्याचे ढोलही वाजवतात. सरकारी मालकीचे भूखंड हडप करून कोट्यवधी रुपयांचे "आदर्श' इमले याच महानगरी मुंबईत बांधले गेले. त्या भ्रष्टाचाराची गटारगंगा भरभरुन वाहते आहे. लोकांनी त्याग करावा आणि आपण मात्र जनतेच्या पैशावर डल्ला मारुन, पुढच्या पाच पिढ्या संपणार नाही, अशी मालमत्ता-संपत्ती जमवावी, असे सत्तेच्या मार्गाने झटपट श्रीमंत झालेल्यांना वाटते आहे. जाहीर सभा समारंभातूनही सत्तेच्या कुरणात चरणारे हे भोंदू लोक, राष्ट्र मोठे होण्यासाठी जनतेने त्याग केला पाहिजे, असे उपदेशाचे डोस पाजत हिंडतात. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांच्या घराण्याने, प्रचंड संपत्ती-मालमत्तेचा मोह मात्र कधी धरला नाही. टाटा उद्योग समूहाची मालमत्ता अब्जावधी कोटी रुपयांत गेली. परदेशातही टाटांच्या उद्योगांचा विस्तार झाला. पण या उद्योग समूहाचे विश्वस्त असलेले टाटा घराण्याच्या पाचही पिढ्यांनी आपला साधेपणा कधीही सोडला नाही. टाटा उद्योग समूहाच्या मालकीचे असलेले महानगरी मुंबईतले हॉटेल "ताज' हजारो कोटी रुपये किंमतीचे आहे. आलिशान आहे. पण रतन टाटा मात्र अद्यापही मुंबईतल्या साध्या सदनिकेत राहतात. त्यांच्या मालकीचा बंगला किंवा सदनिका महानगरी मुंबईत नाही. त्यांची राहणी आणि खर्चही सामान्य माणसांसारखेच आहे. उद्योगपती रतन टाटा उद्योगाच्या विस्तारासाठी विमानाने जगभर फिरतात. मोठ्या हॉटेलात राहतात. पण रतन टाटा मात्र कधीही उधळपट्टी करीत नाहीत. त्यामुळेच गोरगरिबांची जाणीव ठेवा, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन घडवू नका, असा सल्ला देतात, तेव्हा सामान्य माणसांबद्दलची टाटा घराण्याची जोडलेली नाळ कायम असल्याची प्रचिती येते.
टाटांची समाजसेवा
टाटा उद्योग समूहाच्या शेकडो कंपन्या आणि कारखान्यांची मालकी असलेल्या "टाटा सन्स', या कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातला तीस टक्क्यापेक्षा अधिक निधी सामाजिक सेवेच्या कार्यासाठीच गेली शंभर वर्षे खर्च होतो आहे. टाटा उद्योग समूहाच्या उदार देणग्यांतूनच भाभा अणु संशोधन केंद्र, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, टाटा समाज शिक्षण संस्था यासह शेकडो संस्था उभ्या राहिल्या. देशाच्या विकासात या संस्था अग्रणी राहिल्या. गरिबातल्या गरीब रुग्णालाही वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठीच टाटा समूहाने कोलकत्त्यासह अनेक ठिकाणी रुग्णालये सुरु केली. काही धूर्तांनी विश्वस्त संस्था स्थापन करुन, सरकारी मालकीचे भूखंड फुकापासरी घशात घालून त्यावर गगनचुंबी इमारती बांधल्या, रूग्णालयेही सुरू केली. पण तिथले उपचार मात्र गरिबांना परवडणारे नाहीत. सरकारकडून सवलती उपटणारी ही अशी विश्वस्त रुग्णालये गरिबांवर मोफत उपचार करीत नाहीत, अशी कबुली राज्य सरकारलाही विधानसभेत द्यावी लागली होती. पण टाटा समूहाने समाजसेवेची अशी ढोंगबाजी कधीही केलेली नाही. देशाच्या वैज्ञानिक-शास्त्रीय प्रगतीत मोलाचा सहभाग असलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्थाही टाटांच्या अर्थसहाय्यानेच उभी राहिली. आपण सामान्यांचे आहोत आणि सामान्य माणसाच्या पैशावरच आपला उद्योग सुरू झाला, भरभराटीला आला. त्याचा विस्तार झाला, याची जाणीव टाटा समूहाची मालकी असलेल्या टाटा घराण्यातल्या प्रमुखांना कायम राहिली. त्यामुळेच टाटा हे नाव ग्राहकांच्या विश्वासाचे तर झालेच पण सामान्यातही आदराचे ठरले. लोकांच्या पैशावर संस्था उभ्या करायच्या आणि त्या संस्थांना नावे मात्र आपलीच द्यायची, आपल्या भोवती आरत्या ओवाळून घ्यायच्या, असला उद्योग टाटांनी कधीच केला नाही. पैशाचा माज आणि श्रीमंतीचा अहंकार या दुर्गुणापासून टाटा घराणे सदैव दूर राहिले. त्यामुळेच पारतंत्र्याच्या काळात देशाच्या औद्योगिकरणाचा पाया घालणाऱ्या टाटांची, समाजाशी असलेली बांधिलकी कधीच सुटली नाही. टाटा समूहाने आतापर्यंत दिलेल्या हजारो कोटी रुपयांच्या देणग्यांचा आणि सुरु केलेल्या संस्थांची जाहिरातबाजीही केलेली नाही. आदिवासीपासून ते समाजातल्या तळागाळातल्या घटकापर्यंतच्या सामाजिक-आर्थिक समस्यांचा अभ्यास करायसाठीही, संशोधकांना अर्थसहाय्य करण्यात टाटा समूहाने कधीही हात मागे घेतला नाही. प्रामाणिकपणा, चारित्र्य, राष्ट्रनिष्ठा, आपण समाजाचे विश्वस्त असल्याची निष्ठा या भांडवलावरच टाटा समूह विस्तारित झाला. लोकप्रिय झाला. राष्ट्राचा आणि जनतेचा झाला. आपले धन हे जनतेचे आहे, तुम्ही श्रीमंत व्हा. पण श्रीमंतीच्या मस्तवालपणाचे प्रदर्शन करु नका. तो गरिबांचा अपमान ठरेल, या भावनेनेच रतन टाटांंनी श्रीमंतांना चार शहाणपणाचे शब्द सुनावले, ते बरे झाले!

 

No comments:

Post a Comment