Total Pageviews

Monday, 23 May 2011

BUREAUCRATS FOOL EVERY BODY

सनदी अधिकारी आपल्या अक्कल हुशारीच्या जोरावर राजकीय नेत्यांना एका बोटावर नाचवतात.

 वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर त्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. अलीकडेच या प्रकरणासंबंधीची संगणकाची हार्ड डिस्क गायब झाल्याची बातमी येऊन धडकली. आदर्श सोसायटी कारगिल शहिदांच्या कुटुंबियांना घरे देण्यासाठी उभारण्यासाठी स्थापन झाल्याचे आतापर्यंत म्हटले जात होते. त्यात बडे राजकीय नेते आणि सनदी अधिकार्‍यांनी आपले वजन वापरून आप्तस्वकियांना सदनिका मिळवून दिल्या. सोसायटीचे मुख्य प्रवर्तक संरक्षण खात्याचे माजी सनदी अधिकारी आर.सी. ठाकूर यांनी द्विस्तरीय चौकशी आयोगासमोर नुकतेच एक प्रतिज्ञापत्र सादर केले. आदर्श हाऊसिंग सोसायटी ही शहिदांच्या कुटुंबियांना घरे देण्यासाठी स्थापनच झालेली नव्हती, असा धक्कादायक गौप्यस्फोट ठाकूर यांनी केला. सोसायटीची योजना कारगिल युद्धापूर्वीच तयार होती. कुलाबासारख्या परिसरात अलिशान इमारत बांधून तेथे श्रीमंतांना सदनिका विकण्यात येणार होत्या. अशा इमारतींबाबत सरकारने कोणतेही विशेष नियम केलेले नाहीत. त्यामुळे आदर्श सोसायटीवरून वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. इमारत बांधताना सरकारच्या सर्व नियमांचे योग्य ते पालन झाले आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या प्रतिज्ञापत्राद्वारे प्रकरणातील हवा काढून घेण्याचा आणि ते निकाली काढण्याचा कट तर रचण्यात आलेला नाही ना? सनदी अधिकारी आपल्या अक्कल हुशारीच्या जोरावर राजकीय नेत्यांना एका बोटावर नाचवतात. आपणास हवे तसे बदल करून घेतात. अशाच एखाद्या सुपीक डोक्यातून हा नवा फंडा निघालेला नाही ना? ज्या मुद्यावर हे प्रकरण आधारले आहे, त्याचा आधारच काढून घ्यायचा, त्याबाबत उपस्थित झालेल्या सगळ्याच मुद्यांचा इन्कार करायचा, त्यांना छेद द्यायचा, ‘ना रहेंगे बास ना बजेंगी बासुरी...’ असाच या प्रतिज्ञापत्रामागीलआदर्श’ हेतू दिसतो. ठाकूर यांचे प्रतिज्ञापत्र आदर्श प्रकरणाच्या पायालाच सुरुंग लावणारे आहे. ‘आदर्श’पायी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्यासह अनेक राजकीय नेते, सनदी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्याचा तपास सीबीआय करीत असताना त्यासंबंधीच्या फाईल्स, कागदपत्रे गहाळ होत आहेत. आदर्श सोसायटी प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नसेल, सारे काही आलबेल असेल तर मग लपवाछपवी कशासाठी? आदर्शच्या जागेबाबत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही आपले प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे. ठाकूर यांच्या प्रतिज्ञापत्राने खळबळ माजली असताना विलासराव आपल्या प्रतिज्ञापत्रात काय सांगतात, याबद्दल सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. 

No comments:

Post a Comment