Total Pageviews

Monday, 23 May 2011

EDITORIAL IN SAMANA

स्पेक्ट्रम घोटाळ्यात कॉंग्रेसचा जणू काही हात नाही या भ्रमात त्यांनी राहू नये. कर्तेकरविते कॉंग्रेसवालेच आहेत.

हीच आहे कॉंग्रेस नीती!घर फिरले की घराचे वासेही फिरतात. ‘द्रमुक’चे करुणानिधी कुटुंब सध्या या फिरलेल्या घराचा आणि कोसळलेल्या वाशांचा अनुभव घेत आहे. करुणानिधी यांची कन्या कनिमोझी टु जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अखेर तिहार तुरुंगात गेली. या सर्व प्रकरणात सीबीआयने तिला सहआरोपी केलेच होते. आता आरोपपत्र दाखल होताच द्रमुक कन्येस सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला व सरळ तुरुंगाचा रस्ता दाखवला. तामीळनाडूत करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाचा दारुण पराभव अम्मा जयललिता यांनी केला. या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच करुणानिधी यांना मुलीस तुरुगंात जाताना पाहावे लागले. राजकारणात पैशांचा व संपत्तीचा हव्यास हा असा नडतो. करुणानिधी यांना काही बायका व बरीच मुले आहेत. त्या प्रत्येकाची सोय करुणानिधी यांनी लावली आहे. कुणी तामीळनाडूच्या राजकारणात, कुणी दिल्लीच्या सत्तेत तर कुणी सिनेमा-टीव्हीच्या धंद्यात आहेत. करुणानिधी यांचे सारे औरस व अनौरस खानदान सत्तेच्या अवतीभोवतीच आहे, पण हे कुटुंब मधल्या काळात फुटून विस्कळीत झाले. सत्ता होती तोपर्यंत सारे कसेबसे एक होते, पण आता सगळ्यांचीच पळापळ झाली. ए. राजा यांनी चारेक महिन्यांपासून तुरुंगातच आपला बोर्‍याबिस्तरा मांडला आहे व साधारण एक लाख नव्वद हजार कोटींचा स्पेक्ट्रम घोटाळा राजा अण्णा दूरसंचार मंत्री असताना घडला. त्यातून कमवलेला सर्व पैसा हा काही राजा यांच्या लुंगीत गेला नाही. मुळात लुंगीला खिसा नसतो. त्यामुळे ही सर्व रक्कम करुणानिधी यांच्या कुटुंबीयांनीच गिळली व पचवली, पण त्यांना ढेकर देता आला नाही. राजा यांनी ज्या बड्या कंपन्यांना ‘स्पेक्ट्रम’चे परवाने दिले त्यातील डी. बी. रिऍलिटीज कंपनीने २०० कोटी रुपयांचा मलिदा कनिमोझी संचालक असलेल्या टी.व्ही. कंपनीस दिला व हे सर्व व्यवहार रेकॉर्डवर आहेत. आम्ही भ्रष्टाचाराचे पैसेही चेकने स्वीकारतो अशा प्रकारची धाडसी, बिनधास्त भूमिका घेणारे ‘द्रमुक’ पुढारी म्हणजे चमत्कारच म्हणायला हवा. दोनशे कोटी करुणानिधी यांच्या कन्येस मिळाले व ही सरळ सरळ ‘लाच’ होती. इतक्या बिनधास्तपणे व्यवहार सुरू असताना आज जागे झालेले सीबीआय पथक कुठे होते? डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी हे सर्व प्रकरण न्यायालयात नेले व न्यायालयाने या प्रकरणाची सडकीकुजकी पाळेमुळे खोदून काढली नसती तर हा भ्रष्टाचाराचा नंगानाच असाच चालू राहिला असता. द्रमुक पक्ष केंद्रातील सत्तेत सहभागी होता म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पेक्ट्रम घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले. आघाडी सरकारची मजबुरी म्हणून राजांच्या व त्यांच्या द्रमुक परिवाराच्या खिरापतीकडे त्यांनी डोळेझाक केली. म्हणजे धृतराष्ट्राच्या भूमिकेतच ते गेले. त्या भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार द्रमुक व करुणानिधी परिवारच होता. याच भ्रष्टाचाराच्या पैशांतून तामीळनाडूतील विधानसभा निवडणुका लढवून जिंकू, मतदारांना आमिषे दाखवू, मते विकत घेऊ याच तोर्‍यात हा परिवार होता, पण अखेर पैशांची चटक लागलेल्या तामीळ मतदारांनीही स्पेक्ट्रम घोटाळ्यातला पैसा नाकारून करुणानिधी परिवाराचा दारुण पराभव केला. सत्ताधारी ‘द्रमुक’ला ५० जागांची मजल गाठता आली नाही व प्रमुख विरोधी पक्ष म्हणूनही त्यांना तामीळनाडूच्या विधानसभेत स्थान मिळाले नाही. दक्षिणेची जनता एखाद्यास असे काही डोक्यावर घेते की, विचारता सोय नाही व नंतर त्याचा असा कचरा करते की, कचरापेटीतही त्यास स्थान मिळत नाही. करुणानिधी परिवाराच्या नशिबी तीच कचरपट्टी आली. राजकारणात पैसा चिरंजीव नसतो हा धडा देशातील सर्वच राजकारण्यांनी आता घ्यावा. सुरेश कलमाडी, अमरसिंह यांचेही पैशांचे राजकारण संपलेच आहे. प्रश्‍न इतकाच आहे की, स्पेक्ट्रम घोटाळ्यात कॉंग्रेसचा जणू काही हात नाही या भ्रमात त्यांनी राहू नये. कर्तेकरविते कॉंग्रेसवालेच आहेत. द्रमुकची गरज आज कॉंग्रेसच्या दृष्टीने संपली आहे. वापरा व फेका हेच धोरण त्यांनी राबविले. द्रमुकचा राजा तिहारमध्ये गेला तेव्हाही कॉंग्रेसच्या चेहर्‍यावरची सुरकुती हलली नाही व आता राजापाठोपाठ द्रमुकची राणी आत गेली तरीही कॉंग्रेसला दु:ख नसावे.

No comments:

Post a Comment