Total Pageviews

Monday, 16 May 2011

LOOTING TAXPAYERS MONEY -EDITORIAL IN SAMANA

कॉंग्रेसवाले साप तर राष्ट्रवादीवाले अजगराच्या भूमिकेत आहेत. साप विषारी दंश करतो, तर अजगर मिळेल ते गिळतो आहे.

जनतेला मूर्ख समजू नका!कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांत सध्या जे सुरू आहे त्यास नक्की काय म्हणावे? ते कधी भांडतात तर कधी धर्मनिरपेक्षता, समता वगैरेंच्या नावाने एकमेकांच्या पायाचे तीर्थ प्राशन करतात. कधी भांडण इतके विकोपाला जाते की, ते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे राहतात; पण त्याच उंबरठ्यावरून हे ‘जोडपे’ पुन्हा हनीमून एक्स्प्रेसला निघते. राज्य सहकारी बँकेच्या बरखास्तीनंतर दोन्ही पक्ष जणू काडीमोडाच्या आणि ‘ईट का जवाब पत्थर से’ देण्याच्या तयारीत होते. मात्र आता दोघेही सावरले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर केले आहे की, कॉंग्रेस - राष्ट्रवादीत भांडण नसून अजित पवारांशी कोणतेही मतभेद नाहीत. राज्य सहकारी बँकेवरील कारवाईबाबत राष्ट्रवादीच्या मोठ्या साहेबांशी चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. हे सर्व ऐकल्यावर व पाहिल्यावर असे वाटते की, बहुधा कॉंग्रेस - राष्ट्रवादीवाले महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजत असावेत. राज्य सहकारी ‘बँक’ कुणाच्या मालकीची (म्हणजे बापाची) नसल्याची भाषा पृथ्वीराजांनी केली होती. मग त्या बापाचे आता काय झाले? राज्य सहकारी बँक कॉंग्रेसवाल्यांनीच बुडवल्याचा प्रतिहल्ला राष्ट्रवादीच्या बैठकीत खुद्द अजित पवारांनीच केला. हत्तीचे गंडस्थळ फोडले की, हत्ती खर्‍या अर्थाने घायाळ होतो व प्राण सोडतो. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या गंडस्थळावर म्हणजे राज्य सहकारी बँकेवर बरखास्तीचा हल्ला करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीस जेरीस आणले. प्रश्‍न इतकाच आहे की, महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षित मुख्यमंत्री अशा प्रकारच्या शह-काटशहाच्या राजकारणातच रमणार की राज्याच्या विकासासाठी काही ठोस पावले उचलणार? मुख्यमंत्रीपदी येऊन चव्हाणांना सहा महिने उलटले. या काळात त्यांनी दाखविलेले कर्तृत्व काय? हा प्रश्‍नच आहे. मुख्यमंत्र्यांचे कर्तृत्व दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा अशा प्रकारची जाहिरात या सहामाहीनिमित्त प्रसिद्ध करायला हरकत नाही. पक्षांतर्गत विरोधकांना सत्तेच्या बडग्याने दुर्बल करून त्यांना स्वत:ला मजबूत करता येणार नाही. राष्ट्रवादी हा त्यांचा सत्तेतला पार्टनर आहे व राष्ट्रवादी
नालायक आणि भ्रष्ट असेल तर मुख्यमंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवायला हवी. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीस ‘टपली’ मारली, पण या टपलीस तोडीस तोड असा लाफा राष्ट्रवादीच्या ‘टग्या’ मंत्र्यांनी मारला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्य सहकारी बँक कॉंग्रेसवाल्यांमुळे कशी बुडाली व कॉंग्रेसच्या पुढार्‍यांनीच साखर कारखाने विकून त्या पैशांचा कसा अपहार केला ते पुराव्यांनिशी सादर केले आहे. अजित पवारांनी कॉंग्रेस पुढार्‍यांच्या बुडवेगिरीची जी यादी जाहीर केली त्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर ‘नो कॉमेंटस्’ असे आहे. अजित पवारांच्या आरोपांवर चर्चा करू असे मोघम उत्तर पृथ्वीराज चव्हाणांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यकारभार करण्यापेक्षा सत्तेतील मित्रपक्षालाच गटारात लोळवून धुळवड साजरी करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे व या सत्तेच्या भांडणात कारभार ठप्प झाला असून राज्याचा गाडाही चिखलात रुतला आहे. मुख्यमंत्री दिल्लीतून येताना महाराष्ट्रात काय घेऊन आले? ते शंभरेक रबरी बूच घेऊन आले व आधीच्या प्रत्येक निर्णयास फक्त बूच लावण्याचे काम ते नेटाने करीत आहेत. याला राज्यकारभार म्हणत नाहीत. पृथ्वीराज चव्हाण उद्या मुख्यमंत्री नसतील, पण महाराष्ट्र राज्य राहणारच आहे व हे राज्य अपंग, लुळेपांगळे झालेल्या अवस्थेत सोडून गेले तरी पृथ्वीराज चव्हाणांचे काहीच नुकसान होणार नाही. महाराष्ट्राची मात्र पीछेहाट होईल. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची जबाबदारी सामुदायिक असते. ती जबाबदारी एकट्या मंत्र्याची नसते. मुख्यमंत्री सरकारचे नेतृत्व करतात, पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचे व पुढच्या चोवीस तासांत तेच निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवायचे हे त्यांच्या गोंधळलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मंत्रिमंडळात एखादा निर्णय होत असताना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांवर झापडे असतात काय? कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे एकमेकांना संपवायला निघाले आहेत. सत्तेचा वापर ते राज्याच्या व जनतेच्या कल्याणापेक्षा एकमेकांना खतम करण्यासाठीच करीत आहेत. कॉंग्रेसवाले साप तर राष्ट्रवादीवाले अजगराच्या भूमिकेत आहेत. साप विषारी दंश करतो, तर अजगर मिळेल ते गिळतो आहे. दोघांपासून
महाराष्ट्राला धोकाच धोका आहे. दोघांनाही ठेचावेच लागेल व त्यांना ठेचल्याशिवाय महाराष्ट्राची घुसमट थांबणार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पुढारी एकमेकांविरुद्ध जी भाषा वापरीत आहेत ती सभ्य, सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारी नाही. श्रीमान आर.आर. पाटील हे तर मंत्रिमंडळातील संस्काराचे व संयमाचे प्रतीक मानले जातात. शांतता व संयमाची भाषा ते करतात व इतरांना शहाणपण शिकवतात, पण गृहमंत्रीपदावरील या व्यक्तीनेही कॉंग्रेसला दमबाजी करीत ‘ईट का जवाब पत्थर’ने देण्याची हिंसक भाषा केली. परस्परांना अशा पद्धतीने दम भरल्यानंतर आता म्हणे या दोघांमधील मतभेद मिटले आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, ‘सर्व मतभेद दूर झाले आहेत. याबाबतीत आता मागे वळून न पाहता बँकेची भक्कम उभारणी कशी होईल यादृष्टीने प्रयत्न होतील.’ म्हणजे आता राज्य सहकारी बँकेतला सर्व भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आर्थिक अनियमितता संपली असे पृथ्वीराजांना म्हणायचे आहे का? तिकडे राष्ट्रवादीवालेही मुख्यमंत्र्यांसारखाच सूर लावीत आहेत. म्हणजे कॉंग्रेसवाल्यांनी राज्य बँक बुडविल्याचा त्यांनीच केलेला आरोप आता ‘पवित्र’ झाला असे मानायला हवे! जनता मूर्ख आहे, तिला काहीच समजत नाही असे या दोघांना वाटते काय? जनतेला मूर्ख समजू नका. कारभार राज्य बँकेचा असो किंवा सरकारचा, तो कसा सुरू आहे हे जनता जाणते. पृथ्वीराज चव्हाणांनी मुंबई-पुण्यातील बिल्डरांना चाप लावल्यामुळे बांधकामे रखडली आहेत व जागोजागी विटांचे ढिगारे पडले आहेत. याच विटांचा वापर करून राष्ट्रवादीवाले कॉंग्रेसवाल्यांची डोकी फोडणार की कॉंग्रेसवालेही त्याच मार्गाने जाणार? महाराष्ट्रात सध्या जो राजकीय तमाशा सुरू आहे तो लवकरात लवकर थांबला नाही तर हे राज्य शिखर बँकेप्रमाणे बुडल्याशिवाय राहणार नाही. त्याची जबाबदारी सत्तेतील दोन्ही ‘बुडवे’ व ‘बडव्यां’वर राहील.

No comments:

Post a Comment