Total Pageviews

Tuesday 17 May 2011

BSP MLA GETS LIFE IMPRISOMMENT FOR RAPE

बहुचर्चित शशी खून प्रकरणी उत्तर प्रदेशचा माजी मंत्री आनंद सेनला फैजाबाद न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. लॉ कॉलेजमध्ये शिकणार्‍या शशी या विद्यार्थिनीचे अपहरण, लैंगिक शोषण आणि अखेरीस खून करून पुरावेसुध्दा नष्ट केल्याचे आरोप त्याच्यावर होते. तेवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही. त्याच्याविरुध्द दाखल झालेला खटला मागे घ्यावा म्हणून शशीच्या पालकांना पैशाचे आमिषही दाखवण्याचा निर्लज्जपणा हा गुन्हेगार करू शकला. सगळे खानदान नष्ट करण्याच्या धमक्या देण्यासही त्याने मागेपुढे पाहिले नाही. उशिरा का होईना त्याला त्याच्या पापाचे प्रायश्‍चित्त जन्मठेपेच्या शिक्षेच्या रूपाने मिळाले. खरी चिंतेची बाब वेगळीच आहे.

असा अट्टल गुन्हेगार त्या राज्यात मायावतीकडून मंत्रिपदावर बसवला गेला ही राजकारणी पुढार्‍यांची नीतिमत्ता कोणत्या थराला पोचली आहे याचे निदर्शक आहे. यापूर्वीदेखील उत्तर प्रदेशात मायावतींच्या अनेक सहकार्‍यांचे व सहकारी मंत्र्यांचे गुन्हे उघडकीला आले; पण कुणालाही त्याबद्दल कसलीच लाज नाही. याच गुन्हेगार प्रवृत्तीची सुधारलेली आवृत्ती केरळमध्ये घडू पाहत आहे.

इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या वतीने निवडून आलेल्या पी. के. कुंजलीकुट्टी या गणंगाने मंत्रिपदाचा हट्ट धरलेला आहे. कोझिकोडे शहरात एक मोठे सेक्स स्कँडल उघडकीस आले. त्यात हा कुंजलीकुट्टी प्रमुख आरोपी आहे. तरीही त्याची मंत्रिपदाची मागणी कदाचित मान्य होण्याची शक्यता आहे.

केरळ हे देशातील सर्वात जास्त साक्षर व सुशिक्षितांचे राज्य! तेथेच नीतिमत्तेच्या र्‍हासाचे नवे शिखर गाठले जाणार का? अगदीच काठावरच्या बहुमताने कॉंग्रेस आघाडी केरळमध्ये सत्तारूढ होणार आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगला बर्‍यापैकी यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय सरकार स्थपना अवघड आहे. एकदा सत्तेचा पाठलाग प्राधान्याने करण्याची सवय झाली की नीतिमत्ता गुंडाळून ठेवण्यास कुठल्याही राजकीय पक्षाला लाज वाटेनाशी झाली आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ताकारण म्हणजे नैतिकतेला हरताळ असे समीकरण रूढ होऊ लागले आहे. सिझरच्या पत्नीचे चारित्र्य संशयातीत असले पाहिजे असे सगळ्याच पक्षांचे नेते भाषणे देताना सांगतात. प्रत्यक्षात मात्र कुणालाही सत्तेमागे धावताना नीतिमत्तेचा विचार सुचत नाही.

कधीकाळी महाराष्ट्र प्रगत राज्य समजले जात होते. आजही ती घमेंड मारण्यात महाराष्ट्रातील कोणतेही नेते पायाखाली काय जळत आहे हे पाहू इच्छित नाहीत. मुंबईतील उत्तुंग ‘आदर्श’ हे अलीकडच्या मराठी नीतिमत्तेचे ढळढळीत उदाहरण आहे. त्यातील काळी कारस्थाने जगजाहीर झाली असली तरी कागदोपत्री त्याचे पुरावे दिसू नयेत म्हणून सरकारी कार्यालयातील फाईल्स, फाईलमधील कागदपत्रे आणि आता तर संगणकातील हार्ड डिस्कसुद्धा नाहीशा केल्या जात आहेत. नवे महाभारत नीतिमत्तेच्या होळीतल्या राखेतून निर्माण होणार असेल का?

No comments:

Post a Comment