डॉ. अरविंद सिन्हा
एरोस्पेस अभियंता पुरस्काराने गौरवण्यात आले
लोकसत्ता टीम | Updated: April 15, 2017 10:26 AM
0
SHARES
FacebookTwitterGoogle+Email
हेलिकॉप्टर्सचे ऊध्र्व उड्डाण तंत्रज्ञान जगात खूप महत्त्वाचे मानले जाते. या विषयात अधिक संशोधन व प्रगती साधण्यासाठी अमेरिकन हेलिकॉप्टर सोसायटी इंटरनॅशनल ही संस्था १९४३ मध्ये स्थापन करण्यात आली. एएचएस असे संक्षिप्त नाव असलेल्या या संस्थेचे किमान ६००० सदस्य असून या विषयात अनेक शिष्यवृत्त्या, पुरस्कार व प्रशिक्षण संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ऊध्र्व उड्डाण तंत्रज्ञानावर तेथे संशोधनही केले जाते. या संस्थेचा एरोस्पेस इंजिनीयर पुरस्कार यंदा ऑस्ट्रेलियात राहणारे, पण जन्माने भारतीय असलेले हवाई अभियंता निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. अरविंद सिन्हा यांना जाहीर झाला आहे. त्यांनी ऊध्र्व उड्डाण तंत्रज्ञानात मोठे काम केले आहे. या सोसायटीचे फेलो म्हणून त्यांना मे २०१६ मध्ये गौरवण्यात आल्यानंतर आता एरोस्पेस अभियंता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
हेलिकॉप्टर हवाई उड्डाण क्षेत्रात मार्गदर्शक कामगिरी करणाऱ्या सोसायटी सदस्यांना हा पुरस्कार दिला जातो. सिन्हा यांना आतापर्यंत अनेक मानांचे पुरस्कार मिळाले असून डिझाईन प्रकल्प व अध्यापन क्षेत्रातही त्यांनी मोलाचे काम केले आहे. ऊध्र्व उड्डाण तंत्रज्ञान म्हणजे व्हर्टिकल फ्लाइट टेक्नॉलॉजीतील हा पुरस्कार म्हणजे एक मोठा सन्मान आहे, असे सांगून सिन्हा यांनी अतिशय नम्रतेने या पुरस्काराचा स्वीकार केला. सध्या ते ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागात हेलिकॉप्टर सिस्टम डिव्हिजनचे अभियांत्रिकी संचालक आहेत. ऑस्ट्रेलियन लष्करासाठी व नौदलासाठी ते एव्हिएशन प्लॅटफॉर्म अँड सिस्टम्स याबाबतचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर आहेत. सामरिक हवाई प्रणाली तयार करण्यात त्यांचे विशेष नैपुण्य आहे. यात हेलिकॉप्टर्स व मानवविरहित विमाने यांचा समावेश होतो. याआधी ते रॉयल मेलबर्न इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या एरोस्पेस अँड अॅव्हिएशन रिसर्च सेंटरचे संचालक तसेच प्राध्यापक होते. सध्या ते मेलबर्न येथील एरोस्पेस डिझाईन या मोनाश विद्यापीठाच्या संस्थेत मानद प्राध्यापक आहेत. भारतीय लष्करातही त्यांनी काम केले असून इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र) व एअरबोर्न स्पेशल फोर्सेस या विभागांची धुरा त्यांनी सांभाळली. तरुणपणी मेजर म्हणून काम करताना त्यांनी सियाचीन हिमनदी परिसरात १९८४ मध्ये ऑपरेशन मेघदूतअंतर्गत अभियांत्रिकी विभागाचे नेतृत्व केले होते. ती मोहीम नव्वद दिवसांची होती, कारण तेथे माणसाचा पाडाव लागणे प्रतिकूल हवामानामुळे कठीण असते; पण तेथे त्यांना दोन वर्षे मुदतवाढ मिळाली. तेथे त्यांच्या चमूला ‘स्पेशल ऑपरेशन्स ऑर्डर’ हा सन्मान मिळाला होता. आयआयटीत हेलिकॉप्टर डिझाइन विषयातील पदव्युत्तर पदवीमुळे त्यांना ऑस्ट्रेलियात याच विषयात डॉक्टरेट करण्याची संधी मिळाली. सिन्हा हे भारतातील मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनीयरिंग या संस्थेचे अधिष्ठाता होते. सातारा सैनिकी शाळेचे ते माजी विद्यार्थी. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत त्यांचे आधीचे शिक्षण झाले आहे. डॉ. सिन्हा यांनी केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करून नावलौकिकाचा मोह धरलेला नव्हता, त्यामुळेच त्यांनी आधी भारतात काम केले व आता त्यांना अमेरिकेतील एका प्रतिष्ठित संस्थेचा पुरस्कार मिळाला. ही सर्वासाठीच अभिमानाची बाब तर आहेच, शिवाय या क्षेत्रातील कारकीर्दीसाठी तरुणांना मोठी प्रेरणा देणारी आहे.
No comments:
Post a Comment