.
लोकसत्ता टीम | Updated: April 24, 2017
काश्मीर खोऱ्यात लोकांना दगडफेक करण्यासाठी चिथावणी देणाऱ्या तब्बल ३०० व्हॉटसअप ग्रुप्सवर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी ९० टक्के ग्रुप्स बंद करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात काश्मीर खोऱ्यात दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या दंगेखोरांना रोखण्यासाठी लष्कराकडून करण्यात येणारा पॅलेट गन्सचा वापरही वादाचा मुद्दा ठरला आहे. मात्र, दगडफेक करण्यासाठी लोकांना व्हॉटसअॅपच्या माध्यमातून चिथावणी दिली जात असल्याचे अनेकदा समोर आले होते. या ग्रूप्सच्या माध्यमातून लष्करी कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी दगडफेक करण्यासाठी लोकांना भडकावले जायचे. या प्रत्येक ग्रुपमध्ये साधारण २५० सदस्य होते. लष्करी कारवाईच्यावेळी या ग्रुप्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत चिथावणीखोर संदेश पाठवले जायचे आणि पद्धतशीरपणे दगडफेक घडवून आणली जायची. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून असे व्हॉटसअॅप ग्रुप शोधून त्याच्या अॅडमिन्सना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे. त्यानंतर गेल्या तीन आठवड्यात २५० पेक्षा जास्त व्हॉटसअॅप ग्रुप बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे दगडफेकीच्या घटना कमी झाल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले होते. इंटरनेटशिवाय इतका मोठा जमाव गोळा करणे जवळपास अशक्य आहे. अनेकवेळा तर लष्करी कारवाईच्या ठिकाणापासून १० किलोमीटर अंतरावरील तरूणही दगडफेकीत सामील झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच झालेल्या बडगाम जिल्ह्यातील घटनेच्यानिमित्ताने याचा प्रत्यय आला. २८ मार्चला येथील दुरबुग गावाच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन आंदोलकांचा मृत्यूही झाला होता. मात्र, काल याठिकाणी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतरही परिस्थिती वेगळी होती. यावेळी इंटरनेट सेवा बंद ठेवल्यामुळे दगडफेक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment