एक काळ असा होता की, जम्मू-काश्मीरची ओळख- कश्यप ऋषींची भूमी, शारदापीठ, शैव तत्त्वज्ञानाचे उगमस्थान, आचार्य अभिनव गुप्त यांचे तत्त्वज्ञान, चिनारचे उंचच उंच वृक्ष, अक्रोडची झाडे, सफरचंदाच्या बागा, गुलाबांची मुघल उद्याने, दर्या-खोर्यांमधील निसर्गसौंदर्य आणि त्यात झुळझुळ वाहणारे झरे, छोटी-मोठी सरोवरं- विशेषतः दल लेक, हजरतबल दर्गा, छोट्या-मोठ्या पिरांचे दर्गे, माता वैष्णोदेवीचे मंदिर, शंकराचार्य टेकडी, केशराची शेती, अलिशान शिकारे, उनी कपडे, पश्मिना शॉल, बसोली कलाकृती, बर्फाच्छादित शिखरे, राजा हरिसिंगांचे शौर्य, काश्मिरी संगीत आणि पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय केंद्र… अशी होती. पण, गेल्या ४० वर्षांत या राज्याची ओळख टूरिझमसाठी नव्हे, तर टेररिझम्साठी होऊ लागली आहे. आज प्रतिभेचे माहेरघर म्हणून काशीकडे बघितले जाते, पण पूर्वी हा मान जम्मू-काश्मीरला होता आणि येथेच शिक्षित होऊन सारे ब्रह्मवृंद, संतसमाज, त्यांनी ग्रहण केलेल्या ज्ञानाचे सिंचन भारतभरच नव्हे, जर जगात सर्वत्र करीत असत. भारताचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आज मूठभर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी वेठीस धरला आहे. आज अनेक समस्यांचे माहेरघर म्हणून हा प्रदेश ओळखला जाऊ लागला आहे. पण, भारताने आशा सोडलेली नाही. या राज्यात सुख-समृद्धी नांदावी आणि या राज्याने विकासाच्या मार्गाने धावावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह झटत आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गतिशीलतेतून साकार झालेल्या ९.२ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे पंतप्रधानांनी केलेले लोकार्पण, हे त्याच दिशेने टाकलेले एक भरभक्कम पाऊल आहे. बोलणारे तर बरेच असतात, पण बोललेले शब्द खरे करून दखवणारे नेते आताशी फारसे दृष्टीस पडत नाहीत. पण, मोदींनी जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आणि त्यांच्या विकासाबाबतच्या आशादेखील जागविल्या. म्हणूनच आजवर भाजपाचे नाव उच्चारल्यावर विंचू चावल्यागत किंचाळणार्या मेहबुबा यांना, मोदी, राजनाथसिंह, नितीन गडकरी यांची तारीफ करताना शब्द कमी पडत होते! या नेत्यांकडून त्यांच्या अधिक अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. पण, मेहबुबांनी केलेली पंतप्रधानांसह इतर नेत्यांची तारीफ केवळ चेनानी-नाशरीदरम्यान उभारण्यात आलेल्या आशियातील सर्वात लांब बोगद्याच्या निर्मितीमुळे झालेली नाही. त्यासाठी बरीच मोठी पार्श्वभूमी, पडद्याआड राहून अनेक नेत्यांनी तयार करून ठेवलेली होती. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांच्याकडे जम्मू-काश्मीरने पक्षाची संघटनात्मक जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी सातत्याने मेहबुबा मुफ्ती यांच्याशी सुसंवाद साधून राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचे फायदे त्यांना विदित केले आणि पीडीपीचे भवितव्य भाजपासोबत कसे सुरक्षित राहील, याचा फार्म्युलादेखील सांगितला. एक मुस्लिम कडव्या नेत्या म्हणून पूर्वी असलेली मेहबुबांची प्रतिमा आज बदललेली दिसतेय्, त्या मोदींच्या शेजारी बसलेल्या दिसताहेत, केदारनाथ यात्रेकरूंची विचारपूस करताहेत आणि खोर्यातून बळजबरी पलायन केलेल्या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाबाबतही त्या बोलताहेत… या सार्या घटनांमागची खरी गोम ओळखायला यायला हवी. एकीकडे काही युवक विघटनवाद्यांच्या हातातील बाहुले बनून लष्करी जवानांवर दगडफेक करण्यात गुंतले असताना, त्याच राज्यातील सकारात्मक विचार करणारे चार हजारावर युवक, भक्कम पहाडीतील दगड फोडून बारमाही वाहतुकीसाठी बोगदा उभारण्यात स्वतःला झोकून देतात, हा बदलदेखील अधोरेखित केला जायला हवा. मोदींनी काश्मिरी युवकांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न तर दाखविलेच, पण त्याच वेळी शेजारी राष्ट्र पाकिस्तानला एक संदेशही दिला. काश्मिरी जनतेचे खरे तारणहार तुम्ही नाही तर भारतीय जनता, भारतीय नेते आणि भारतीय संसदच आहे, हेदेखील त्यांनी पाकिस्तानला दाखवून दिले आहे. मोदींनी, गेल्या वर्षी श्रीनगरमध्ये पूर आला असताना, तेथील सरकार अस्तित्वहीन झाले असताना, लोक ‘त्राहि भगवान’ झाले असताना आणि मदतीसाठी कुणी मिळते का याकडे डोळे लावून बसले असताना, भारतीय लष्कराच्या तुकड्या तातडीने रवाना केल्या आणि तेथील जनेतेचे अश्रू पुसले, हे मेहबुबा विसरलेल्या नाहीत. गेल्या वर्षीच सारा भारत दिवाळी साजरी करण्यात, दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत कुटुंबासह फटाके फोडण्यात आणि फराळावर ताव मारण्याचा आनंद घेत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काश्मीरच्या सीमेवर देशाच्या रक्षणार्थ डोळ्यांत तेल घालून जागणार्या जवानांच्या भेटीला गेले, हेदेखील काश्मीरची जनता आणि तेथील मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. भारताची विभिन्न राज्ये मूलभूत समस्यांचा सामना करीत असताना, काश्मीरचा-भारताच्या अभिन्न अंगाचा- अंतःकरणपूर्वक विचार करून पंतप्रधानांनी या राज्यासाठी घोषित केलेले कोट्यवधी रुपयांचे पॅकेज या राज्यातील हिंदू, मुस्लिम आणि बौद्धांसाठीदेखील किती महत्त्वाचे ठरले, हे सांगण्याची गरज भासू नये. पैसे देऊन भरकटलेल्या युवकांना दगडफेक करण्यास बाध्य करणे अतिशय सोपे आहे. या युवकांच्या पालकांना धमकावून, तुमचा पाल्य दगडफेकीत दिसला नाही तर याद राखा, असे धमकावणे तर हुर्रियतसारख्या संघटनांना अतिशय सोपे आहे. त्यापेक्षाही सोपे म्हणजे जम्मू-काश्मिरातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शाळा जाळून टाकणे. अशा २६ शाळा सहा महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांच्या समर्थकांनी जाळून टाकल्या. विघटनवादाचे समर्थन करणार्या तमाम नेत्यांची मुले जम्मू-काश्मीरच्या बाहेर शिक्षण घेत आहेत. काहींची मुले विदेशात नोकर्या आणि व्यवसाय करीत आहेत, पण यापैकी एकाही नेत्याचा मुलगा अथवा नातेवाईक दगडफेकीच्या घटनांमध्ये पुढाकार घेत नाही. ही तर आपल्याच जातभाईंची फसवणूक आहे ना! आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांची शिक्षणं उत्तम दर्जाची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करणारी व्हावी, याची काळजी करणारी हुर्रियतवादी मंडळी खोर्यातील आम आदमीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध का होत नाही? मोदींविरुद्ध, भारत सरकारविरुद्ध आणि भारतीय संसदेने घेतलेल्या कुठल्याही जनहितार्थ निर्णयाविरुद्ध बंदचे आवाहन करणार्यांमध्ये हुर्रियतवादी पडद्यामागची भूमिका का निभावतात? हादेखील शोधाचाच विषय आहे. जो न्याय हुर्रियतवाल्यांना तोच खोर्यातील आम जनतेलाही मिळायला हवा. म्हणूनच मोदींच्या हस्ते सुरू झालेल्या भुयारी मार्गाने जम्मू-श्रीनगर अंतर तर घटलेच आहे, शिवाय दिल्ली आणि श्रीनगरची जवळीकही वाढली आहे. आता काश्मिरी जनतेनेच, आपला तारणहार कोण, हे ठरविण्याची वेळ आली आहे…!
No comments:
Post a Comment