पाकिस्तानच्या क्रूरतेचे उत्तर काय असायला हवे?
April 17, 2017010
अन्वयार्थ
भारताचा सैनिक केवळ वर्दीधारी, नोकरपेशा कर्मचारी नाही. वर्दी अंगात घातल्यानंतर तो भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकाचा तेवढाच सशक्त प्रतिनिधी होतो, जसा तिरंगा झेंडा आहे, संविधान आहे आणि राष्ट्रपतींची गरिमा आहे. त्याहून अगदी तसूभरही कमी स्थान सैनिकाच्या सन्मानाला आम्ही देऊ शकत नाही.
मी नुकताच महाराष्ट्राच्या विविध भागांना भेटी देऊन परतलो आहे. तेथे हनुमान जयंती अतिशय उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते. परंतु, यावेळी हनुमानांच्या स्मरणासोबतच कुलभूषण जाधव यांच्या फाशीची चर्चाही तितकीच तीव्र वेदना मला देऊन गेली. कुलभूषण जाधव हे सातार्याचे सुपुत्र आहेत, यासाठी ही वेदना झाली असे नाही. ती यासाठी की, पाकिस्तान भारताविरुद्ध आपल्या क्रूर हल्ल्यांच्या सगळ्या मर्यादा पार करीत आहे. वास्तविक पाहता कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कांगारू न्यायालयाने एकतर्फी फाशीची सजा सुनावून भारताविरुद्ध युद्धाचे बिगुल फुंकले आहे.
हे युद्ध त्या घृणेची निरंतरता आहे. त्याची बिजे भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी पेरली गेली होती. स्वातंत्र्यानंतर लगेच सप्टेंबर १९४७ मध्ये कबिल्यांच्या वेशात हल्ला, कच्छवर हल्ला करण्यात आला. १९६५ चे युद्ध आम्ही जिंकूनही हाजी पीर ही महत्त्वाची खिंड परत केली, १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी लष्कराच्या ९० हजार अधिकारी-सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. नंतर झिया उल हकने खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालून हजारो जखमांनी भारताला रक्तरंजित करणे आणि पुन्हा आयएसआयकडून करविले गेलेले दहशतवादी हल्ले, ज्यात आमचे ८६ हजाराहून अधिक भारतीय जवान आणि नागरिकांचा मृत्यू होणे… पाकिस्तानी हल्ल्यांची ही यादी खूप लांबलचक आहे. आणि त्याहूनही लांब आहे, भारताच्या धैर्याला थकवा आणणारी कथा.
हा कांगावा की, पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी होत आहे आणि त्याला अमेरिका आणि चीनची मदत आहे. भारतासाठी ही बेईमानी आहे. आमच्यासाठी फक्त एकच बाब महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यांपासून भारताला कशाप्रकारे सुरक्षित ठेवता येईल. हे खरेच आहे की, आज जगात सर्वाधिक मुसलमान मुसलमानांद्वारेच पाकिस्तानात मारले जात आहेत. कारण हे की, आपापसातील घृणा आणि त्यातून जन्मास आलेली हिंंसा. कुणी शिया पंथीयांच्या हजारो वेबसाईट एकदा तरी पाहिल्या तर त्यांना असे लक्षात येईल की, पाकिस्तानी कट्टरपंथी सुन्नी जमातीकडून शियांवर करण्यात येणार्या क्रूर हल्ल्यांच्या हृदयाला पिळवटून टाकणार्या घटना पाहावयास मिळतील. बलुचिस्तान आणि सिंधमध्येही पाकिस्तानी लष्कराकडून केल्या जाणार्या पाशवी अत्याचारांची यादीही खूप लांब आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयतर्फे पोषित तेथे ७६ दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. मसूद अजहर आणि लखवी तर हिमनगाचे केवळ एक टोक आहेत.
एका ढोबळ अनुमानानुसार आजही पाकिस्तानात दोनशेपेक्षा अधिक भारतीय कैदी आहेत. सरबजीत सिंग आणि कश्मीर सिंग यांची कहाणी आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचार आपण पाहिले आहेत. परंतु, १९७१ च्या युद्धात पकडल्या गेलेल्या ५४ भारतीय युद्धकैद्यांबाबत अजूनही काहीच थांगपत्ता नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजही ते पाकिस्तानी तुरुंगात मृत्यूची प्रतीक्षा करीत आहेत.
अमानुषपणे अत्याचार हे पाकिस्तानच्या रक्तातच भिनले आहे. कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या जाट रेजिमेंटमधील पाच शूरवीर जवान अर्जुनराम बासवाना, मूलाराम, नरेशसिंह, भंवर लाल बागडिया आणि मीका राम यांचे पार्थिव जेव्हा भारत सरकारला सोपविण्यात आले, तेव्हा त्यांची क्षतविक्षत स्थिती पाहून प्रत्येकच भारतीयाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आमच्या जवानांचे रक्त खवळले होते; पण ते क्रौर्यही आम्हाला चुपचाप सहन करावे लागले होते. लांस नायक हेमराज आणि लांसनायक सुधाकरसिंह यांचे शीर कापून त्यांचे शरीर भारताला सोपविण्यात आले होते (जानेवारी २०१३). तेव्हा सारा देश संतापाने फणफणला होता. काही दिवसांनंतर हे सर्वकाही आम्ही विसरून गेलो.
वारतेची गीतं गाणारा हा समाज हे विसरून जातो की, शहीद होणार्या जवानांचेही कुटुंब असते. त्यांचे माता-पिता, पत्नी, मुलं, भाऊ-बहिणी आणि परिवार. मीडियात दहशतवाद्यांच्या मुलांच्या मुलाखती छापण्याची अलीकडे फॅशन रूढ झाली आहे; पण शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या माता-पिता, पत्नी, त्यांच्या मुलीची मुलाखत घेताना त्यांना आपण कधी पाहिले आहे? कल्पना करा, असले क्रौर्य अमेरिका आणि चीनच्या सैनिकांसोबत पाकिस्तानने केले असते तर काय प्रतिक्रिया उमटली असती? भारताचा सैनिक केवळ वर्दीधारी, नोकरपेशा कर्मचारी नाही. वर्दी अंगात घातल्यानंतर तो भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकाचा तेवढाच सशक्त प्रतिनिधी होतो, जसा तिरंगा झेंडा आहे, संविधान आहे आणि राष्ट्रपतींची गरिमा आहे. त्याहून अगदी तसूभरही कमी स्थान सैनिकाच्या सन्मानाला नाही. काश्मीरात सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्सच्या (सीआरपीएफ) एका जवानासोबत दगडफेक करणार्या देशद्रोही लोकांनी जो लज्जास्पद व्यवहार केला त्याची व्हिडीओ क्लिप वायरल झाली आहे; पण त्याची तेवढी तीव्र प्रतिक्रिया उमटली? आम्ही आमच्या भूमीवर-काश्मिरात मातृभूमीसाठी लढणार्या आमच्या सैनिकांचे रक्षण करू शकत नाही, याचे काय उत्तर आहे? त्या जवानाने त्या भ्याड, पाकिस्तानच्या पैशांवर दगडफेक करणार्यांवर स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला असता तर त्या जवानाविरुद्ध सर्वात जास्त भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष पत्रकारांनीच लिहिले असते. पण, भारताच्या एका जवानाच्या या अपमानावर कुठे एखादा लेख, संपादकीय लिहिले गेले अथवा संसदेत या घटनेबाबत आवाज उठविला गेला? कारण, आमच्या देशात जवानाच्या बाजूने बोलणे निवडणुकीच्या विजयाचा आधार बनत नाही.
कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली नाही, त्यांना ठार मारण्याबाबत आधीच निर्णय झाला होता. त्यानंतर फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली. आपल्या राजनयिकांनाही भेटू दिले गेले नाही आणि या प्रश्नाचेही उत्तर पाकिस्तानने दिले नाही. जाधव हे भारतीय हेर होते तर त्यांना भारतीय पासपोर्ट सोबत घेऊन जाण्याची काय गरज होती? या विषयात व्हिएन्ना समझोत्याचे पालन करून भारतीय राजनयिकांना जाधव यांची भेट का घेऊ दिली गेली नाही. भारताने या संदर्भात विनंतीची १३ पत्रे पाठविली होती. कुलभूषणच्या स्वीकारोक्तीचा जो व्हिडीओ प्रसारित करण्यात आला, तो तुकड्यात आणि फोटोशॉपमध्ये का? सामान्यत: अशा प्रकारचे खटले हे दिवाणी न्यायालयात जातात. अगदी पहिल्यांदाच हे प्रकरण पाकिस्तानी कोर्ट मार्शल न्यायालयात का नेण्यात आले? डिसेंबर २०१६ मध्ये नवाज शरीफ यांचे विदेशी संबंधांचे सल्लागार सरताज अझीझ यांचे विधान होते की, केवळ कुलभूषणच्या काही बयाणांव्यतिरिक्त आमच्याकडे आणखी दुसरा कोणताही पुरावा नाही. मग कोणत्या आधारावर कुलभूषणला फाशी सुनावण्यात आली? काय हे सत्य आहे का की, कुलभूषण जे इराणमध्ये आपला व्यवसाय करीत होते, त्यांचे तालिबान्यांनी अपहरण करून पाकिस्तानात
बळजबरीने नेले आणि तेेथे पाकिस्तानी सैन्याच्या हवाली केले गेले?
आम्हाला हा विश्वास वाटतो की, भारत सरकार तेवढेच उद्वेगित आणि चिंतीत आहे जेवढे आम्ही सर्व. आम्ही फक्त बोलू शकतो-जन-मनाचे भाव प्रदर्शित करू शकतो. एक सशक्त आणि निर्णायक सरकार कुलभूषण यांच्याबाबतीत सर्व संभव, परंतु, वेळप्रसंगी असंभव उपायही करेल आणि कुलभूषण यांना सुखरूपपणे भारतात परत आणेल, हीच आपण सर्वांनी कामना करायला हवी.
No comments:
Post a Comment