Total Pageviews

Sunday, 16 April 2017

खेळ सावल्यांचा By pudhari-जर कुलभूषणचे अपहरण करून पाक हेरसंस्था भारताला हुलकावणी देत असेल, तर तिला शह देणारी खेळी कर्नल हबीबला पळवून झालीच नसेल, असा छातीठोक दावा कोणी करू शकत नाही.


| Publish Date: Apr 16 2017 6:39PM | Updated Date: Apr 16 2017 6:39PM भारताचा निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव याच्या पाकप्रणीत फाशीने दोन देशांतील हेरगिरीवर नव्याने प्रकाश पडू लागला आहे; पण दोन वर्षांपूर्वी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याच विषयावर भाष्य केले, तेव्हा त्याचा आशय अनेकांच्या लक्षातही आलेला नव्हता. आज कुलभूषणला वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीय आसुसला आहे. ते योग्यही आहे, स्वाभाविकही आहे. त्यातून राष्ट्रीय बंधूभावाचे प्रदर्शनही होत असते; पण ज्या प्रकारचे आरोप पाकिस्तानने जाधववर केले आहेत, तशा प्रकारात आजपर्यंत अनेक भारतीयांचा हकनाक बळी गेला आहे आणि त्यांच्यासाठी कोणी एक अश्रूही ढाळला नव्हता. पर्रीकर यांनी त्यावरच टिप्पणी केलेली होती. भारताच्या दोन माजी पंतप्रधानांनी सुरक्षा विषयात हलगर्जीपणा केल्याने अनेक भारतीय ‘डीप असेट’ मारले गेले; असे पर्रीकर म्हणाले होते. त्याचा अर्थ पाकिस्तानात जे कोणी भारतासाठी हेरगिरी करीत होते, त्यांचा तेव्हा बळी गेला होता आणि कोणी दोन अश्रूही ढाळले नव्हते. जनता पार्टीची सत्ता असताना मोरारजी देसाई व जनता दलाचे कडबोळे सरकार असताना इंद्रकुमार गुजराल, यांनी पाकिस्तानात चालू असलेल्या भारतीय हेरगिरीचा गाशा गुंडाळला होता. जेव्हा असे काही घडते, तेव्हा तिथे कार्यरत असलेल्या आपल्या हेरांना वार्‍यावर सोडले जात असते. त्यापैकी कोणाकडे भारताचा पासपोर्ट असतोच असे नाही, किंवा त्यापैकी अनेकजण भारताचे नागरिक असतात असेही नाही; पण ते तिथे भारताचे हितसंबंध जपण्यासाठीच काम करत असतात. त्यांच्या जीवाचे मोलही कुणा भारतीय नागरिकापेक्षा कमी नसते; पण जेव्हा हे दोन पंतप्रधान सत्तेत होते, तेव्हा आजच्या इतका माध्यमांचा पसारा वाढलेला नव्हता आणि आजच्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत इतका गाजावाजा होत नसे. म्हणूनच तत्कालीन हेरांचा हकनाक बळी गेला होता. आताही जाधव भारताचा हेर म्हणून पाकिस्तानात गेला वा काही कारवाया केल्या, याचा कुठला पुरावा पाकिस्तान देऊ शकलेला नाही; पण त्याला पकडून वा त्याचे अपहरण करून चाललेले नाटक मात्र, दोन्ही देशांच्या हेरखात्यांच्या लपंडावाचीच एक खेळी आहे यात शंका असायचे कारण नाही. कारण इथे आपण जसे कुलभूषणच्या फाशीविषयी ओरडत आहोत, तसेच तिथे पाकिस्तानात कर्नल हबीब झहीर नावाच्या लष्करी अधिकार्‍याच्या बेपत्ता होण्यावरून काहूर माजलेले आहे. अनेकदा असे संशयित पकडले वा पळवले जातात आणि मग त्यांची दोन देशात देवाण-घेवाणही होत असते. कुलभूषणची फाशी हीसुद्धा अशीच खेळी असू शकते. कारण त्याला बलुचिस्तानात पकडण्यात आल्याची घटना वर्षभर जुनी आहे. मात्र अकस्मात फाशीची घोषणा आता झाली, त्यामागे हबीबच्या बेपत्ता होण्याचेही कारण असू शकते.. कर्नल हबीब हा पाकिस्तानी लष्कराच्या चिलखती विभागाचा अधिकारी होता आणि त्याने नंतरच्या काळात पाक हेरखात्यामध्येही महत्त्वाची कामगिरी पार पाडलेली आहे. एका माहितीनुसार गतवर्षी कुलभूषणला पकडणार्‍या पथकाचा म्होरक्याही हबीब असल्याचे बोलले जाते. असा कर्नल हबीब काही महिन्यापूर्वी निवृत्त झाला आणि त्याने जगभरात चांगल्या वेतनाच्या नोकरीचा शोध सुरू केला होता. त्याला एका वेबसाईटवर तशी नोकरी असल्याचे आढळले आणि संबंधित कंपनीने त्याला जाडजुड पगार देण्याचे मान्य केले. त्यानुसार तो मुलाखतीसाठी ओमानला गेला आणि तिथून नेमणूक घेऊन नेपाळला पोहोचला. नेपाळच्या विमानतळावर त्याला त्या कंपनीचा प्रतिनिधी भेटला व तिथून लुबिनी या नेपाळी शहरात हबीब पोहोचला. त्या ठिकाणाहून त्याने आपल्या कुटुंबाला फोन करून माहिती दिली आणि त्यानंतर कर्नल हबीब बेपत्ता आहे. त्याने कुटुंबाशी संपर्क साधलेला नाही की नेपाळी पोलिसांना त्याचा शोध लागू शकलेला नाही. साहजिकच त्याचे अपहरण भारतीय हेरखात्यानेच केले असावे असा पाकिस्तानचा संशय आहे, किंबहुना तसा पाकचा आरोपही आहे. या घटनेनंतर दोनच दिवसांत कुलभूषणच्या फाशीची घोषणा व्हावी, ही बाब म्हणूनच खटकणारी आहे. जर कुलभूषणचे अपहरण करून पाक हेरसंस्था भारताला हुलकावणी देत असेल, तर तिला शह देणारी खेळी कर्नल हबीबला पळवून झालीच नसेल, असा छातीठोक दावा कोणी करू शकत नाही. कारण कुठल्याही देशाच्या हेरखात्याच्या सर्व हालचाली वा खेळी तिथल्या सरकारलाही पूर्णपणे ठाऊक नसतात. कारण कुलभूषणबाबतीत पाकने त्याच्या अटकेची घोषणा तरी केलेली होती; पण भारताने हबीबविषयी अवाक्षरही अजून बोललेले नाही. अशा गोष्टी माध्यमात आल्या, मगच गाजावाजा होत असतो. अन्यथा शेकड्यांनी अशी माणसे पळवली व पकडली जात असतात. त्यांची देवाणघेवाण होते किंवा परस्पर विल्हेवाटही लावली जात असते. आपल्यापर्यंत त्यापैकी काहीच येत नसल्याने आपण त्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असतो. कारण गोपनीयता हा कुठल्याही हेरगिरीचा गाभा असतो; पण आता पाकिस्तानने असा खेळ सुरू केला असेल, तर त्याची अधिक किंमत त्याच देशाला व त्याच्या अनेक नागरिकांना मोजावी लागू शकते. कारण प्रत्येक पकडलेला पाकिस्तानी हेर कोर्टासमोर हजर करून खेळत बसायला भारतीय हेरखात्यालाही सवड असतेच असेही नाही. चकमकीत त्यांचीही इशरत होऊ शकते. भारतातच नव्हेतर अगदी पाकिस्तानातही अशा अनेक हबीबचे अकस्मात बळी जाऊ शकतात. पाकिस्तानला मोलाचे वाटणारे अनेकजण भारताच्याही जाळ्यात अडकू शकतात. कारण हा खेळ सावल्यांचाच असतो आणि फक्त सावली पकडून उपयोग नसतो. हाती काहीही लागत नाही

No comments:

Post a Comment