Maharashtra Times | Updated: Apr 24, 2017, 10:37PM IST
8
सीमासुरक्षा दलाचा जवान तेजबहादूर यादव याला चौकशीअंती बडतर्फ करण्यात आले, अशी बातमी आली व पुन्हा मीडियामध्ये काहूर माजण्यास सुरुवात झाली. जसे काही एखाद्या संन्याशाला सुळावर चढवले! वास्तविक तेजबहादूरला झालेली शिक्षा अतिशय योग्य आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नसते, काळ सोकावत असतो, याची जाणीव मीडियावाल्यांनी ठेवावयास पाहिजे.
मासुरक्षा दल व लष्कर यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. कृपया याची सरमिसळ करू नये. तरीही सीमासुरक्षा जितकी महत्त्वाची तितकीच युद्धभूमीही महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने दोन्हीही यंत्रणांकडे पाहणे गरजेचे आहे. ज्या बाबीकरिता तेजबहादूरला बडतर्फ करण्यात आले, ती बाब क्षम्य नाही. ही बाब कोणती, तर लष्करी जवानांना दिले जाणारे निकृष्ट प्रतीचे अन्न, असा त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही बाब अतिशय गंभीर आहे. वास्तविक लष्करी जवानांना अगदी कोष्टकाप्रमाणे अन्न दिले जाते. ते काही चमचमीत रस्सेदार नसते. म्हणूनच तर एखाद्या तरी लष्करी जवानाचे पोट पुढे आलेले दिसते काय? अन्न जर अतिशय निकृष्ट प्रतीचे असेल तर एखादा तरी जवान कुपोषणाने मरण पावला का? एवढ्या मोठ्या यंत्रणेत एखाद्या दिवशी असा प्रकार घडलाही असेल म्हणून काय रोज असेच निकृष्ट अन्न देण्यात येते काय, की ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करावा?
वास्तविक लष्करात प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात येते. जवान सीमेवर तैनात असेल तर त्याच्या घरादाराची, बायकोपोरांची, नातेवाइकांची व त्यांच्या स्वतःच्या मानसिकतेचीही काळजी घेण्यात येते. याचा आम्हाला अनुभव आहे. १९७१ ची गोष्ट आहे. आम्ही ट्रेनिंगवर असताना दोन महिन्यांनंतर एक हवालदार मेसेज घेऊन आला- ‘९९ साहब का आज दिन को बारह बजे कमांडिंग ऑफिसर साहब के दप्तर में पेशी है.’ प्लटूनमधील सर्व ऑफिसर जरा दचकले व घाबरलेही, ‘क्या बात होगयी भाई?’ नंतर मी ट्रेनिंग ड्रेस उतरवला व नेहमीचा रुटीन ड्रेस चढवला. बरोबर बारा वाजता कमांडिंग ऑफिसरच्या ऑफिसबाहेरील ऑर्डर्लीला रिपोर्ट केला. त्या वेळी कर्नल घाणेकर हे कमांडिंग ऑफिसर होते. ते मराठी असल्यामुळे त्यांनी सर्व प्रश्न मराठीत विचारले. ‘आपल्या घरून आतापर्यंत एकही पत्र का आले नाही? तू घरून रागारागाने तर आला नाही ना?’
TDSPro to manage your TDS quarterly returns
Ad: Sinewave
5 best SIP mutual funds to invest in 2017
Ad: Fundsindia
Recommended By Colombia
ताजी प्रतिक्रिया
तेजबहादूर ने फ्क्त सोशियल मीडीया मध्ये सत्य मांडले आणि त्याची गच्छन्ति जालि आणि आता प्राध्यापक सारखे लोक सुद्धा त्याला गुन्हेगार ठरवत आहेत भारतात खोटे बोलायचे बक्षीस मिळते पण खरे बोललले की शिक्षा मिळते हेच परत परत सिद्ध होत असते
Naresh Patil
सर्व प्रतिक्रिया पाहाप्रतिक्रिया लिहा
मी त्यांना सांगितले, की माझ्या घरी फक्त आई आहे व तीही अडाणी आहे. तिला लिहिता-वाचता येत नाही. वडील लहानपणीच वारले. गाव अगदी लहान आहे. त्यामुळे मला कोण पत्र लिहिणार? ‘गावात लिहिता-वाचता येणारा कोणीच नाही काय?’मी म्हंटले, ‘आहे.’
‘मग त्याला पत्र लिही व आईची ख्याली खुशाली त्या व्यक्तीच्या माध्यमातून जाणून घे.’ त्यानुसार पत्रव्यवहार करायला लावला. या ठिकाणी ही गोष्ट सांगण्याचे एकच कारण म्हणजे एवढी काळजी प्रत्येकाची घेतली जाते. एखाद्या जवानाची पत्नी किंवा जवळचे रक्ताचे नातेवाईक आजारी असतील तर जवानाला लाइनऑफ पोझिशनवरूनदेखील भेटीसाठी त्याला घरी पाठवण्यात येते. एखाद्या मोहिमेवर असताना रात्री एखादा जवान आला नाही किंवा येण्यास उशीर झाला तर सर्व जवान तो येईपर्यंत डिनर घेत नाहीत. लष्कराइतकी आपुलकी, प्रेम, सहानुभूती कुठेही पाहावयास मिळत नाही. प्रत्येक कंपनी कमांडर प्रत्येक जवानाला पहिल्या नावावर ओळखत असतो व त्याच नावाने हाक मारतो. लष्करामध्ये सुभेदार मेजर (एसएम, जवानातील सर्वश्रेष्ठ पद) हे अतिशय महत्त्वाचे पद असते. सुभेदार मेजर हा साधा सैनिक व ऑफिसर यामधील अतिशय महत्त्वाचा दुवा असतो. सुभेदार मेजरच्या माध्यमातून जवानांच्या समस्या सोडवल्या जातात. तो जवानाचा कुटुंबप्रमुखच असतो, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. दर महिन्याला सुभेदार मेजर जवानासोबत दरबार घेतो. त्या वेळी जवान आपल्या सर्व समस्या सुभेदार मेजरपुडे मांडतात. नंतर कंपनी कमांडर दरबार असतो. नंतर कमांडिंग ऑफिसरचा दरबार असतो. या माध्यमातून सर्व समस्या सोडविल्या जातात. तेजबहादूरने हे सर्व मार्ग सोडून प्रसिद्धीच्या किंवा हिरोगिरीच्या हव्यासापोटी व्हिडीओ व्हायर केला व लष्कराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला झालेली शिक्षा योग्यच आहे.
प्रश्न येतो जवानांना मिळणाऱ्या हीन वागणुकीचा. हीन हा शब्दच या ठिकाणी बरोबर वाटत नाही. जवानाला ऑफिसरकडून कधीही हीन वागणूक दिली जात नाही. तो जर ड्युटीवर चुकला असेल तर त्याची शिक्षा त्याला जरूर मिळतेच. बऱ्याच वेळा काही जवान ऑफिसरच्या बंगल्यावर तैनात असतात. त्या जवानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे ड्युटी देण्यात येत असते. तेथेही त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक मिळते. बंगल्यावरील जवानांची तैनाती ही ऑफिसच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते. कारण ऑफिसर हा नेहमी वेगवेगळ्या मोहिमांवर व कार्यालयीन कामकाजात व्यस्त असतो. त्यामुळे त्यांच्या फॅमिलीकडे लक्ष देण्याकरिता अतिशय विश्वासू जवानांची गरज असते. शिवाय लष्करी तळापासून नागरी वस्ती, बाजारपेठ, दुकाने खूप लांब असतात. याला जर सिव्हिलियन लोक हीन वागणूक म्हणत असतील तर त्यांची कीव करावीशी वाटते.
जवानांच्या मानसिकतेचीही काळजी घेण्यात येते. वेळप्रसंगी ऑफिसरच्या पत्नीसुद्धा याकामी मदत करतात. उदाहरणादाखल सांगावेसे वाटते, की आमच्या युनिटचा एक जवान असा होता, की ज्याने चार वर्षांपासून सुटीच घेतलेली नव्हती. तो नेहमी एकलकोंडा व शांत राहायचा. त्याला विचारले, की ‘आपने छुट्टी क्यों नहीं ली?’ बरेच दिवस तो काहीच सांगत नव्हता. शेवटी महत्प्रयासाने त्याला बोलतं केलं. चौकशीअंती कळलं, की हा जवान अनाथालयातून आलेला होता! काही ऑफिसर्सनी प्रस्ताव केला, की याचे लग्न अनाथालयातील एखाद्या मुलीशी लावून देऊ; पण आमच्या सीओंनी त्याला स्पष्ट नकार दिला, की हा अनाथांचा अनाथच होणार म्हणून त्यांनी त्याचे लग्न एका कुटुंबवत्सल कुटुंबातील मुलीशी लावून दिले व तो एक उत्कृष्ट समाजाचा घटक बनला, एवढी काळजी घेतली जाते. काही गोष्टी नकळत ट्रेनिंगचाच एक भाग असतो. उदा. मेसमध्ये डिनर नाइटला सुग्रास अन्नाचा स्वाद घेत असाल, त्या वेळी अचानक धोक्याची घंटा वाजते व एवढे चांगले सुग्रास अन्न सोडून ड्युटीवर हजर व्हावे लागते. हा एक ट्रेनिंगचा भाग असतो.
नुसत्या खाण्यावरून तेजबहादूरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला, याची चर्चा सियाचिनमध्ये शहीद झालेल्याची, चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानच्या ताब्यात गेलेल्या चंदू चव्हाणबद्दल किंवा पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेल्या जाधवांची झाली नसेल तेवढी किंबहुना त्यापेक्षा जास्तच प्रसिद्धी व चर्चा तेजबहादूरच्या व्हिडीओची झालेली दिसते. सैन्याच्या दृष्टीने तेजबहादूरसारख्या घटना अतिशय संवेदनशील, नाजूक, धोकादायक, फंदफितुरी माजविणाऱ्या देशाची संरक्षण फळी खिळखिळी करणाऱ्या, राष्ट्राची एकसंधता धोक्यात आणणाऱ्या, गुप्तता ढासळवणाऱ्या ठरू शकतात. म्हणून याकडे अतिशय गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
पानिपतच्या लढाईचा एक ऐतिहासिक प्रसंग आठवतो. पानिपतची लढाई पेशवे व अहमदशहा अब्दालीमध्ये झाली. त्या वेळी पेशव्यांचे अफाट सैन्य पाहून अब्दालीच्या मनात माघारी जाण्याची तयारी सुरू झाली. आपणास लढायचे नाही असे त्याने ठरवले. शेवटी त्याने आपल्या गुप्त दूताला बोलावून ही कल्पना सांगितली व असे ठरले, की लढाई करायची नाही; पण माघारी जाण्याअगोदर पेशव्यांच्या सैन्याला थोडे न्याहाळून घेऊन संध्याकाळची वेळ होती. त्याचा दूत व अब्दालीने वेश बदलून पेशव्यांच्या सैन्यात फेरफटका मारण्यास सुरुवात केली. त्या वेळी पेशवे सैन्याचा स्वयंपाकाचा बेत चालू होता. प्रत्येक तंबूपुढे आपापल्या चुली पेटल्या होत्या व धूर निघत होता. त्या वेळी अब्दालीने दूताला विचारले, हे काय? वेगवेगळ्या चुली का? त्यावर दूत उत्तरला, या सैन्यात वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक आहेत. हे एकमेकांच्या हातचे अन्न खात नाहीत. त्यामुळे या वेगवेगळ्या चुली पेटलेल्या दिसतात. झालं! अब्दालीच्या मनात उत्साहाची ठिणगी पडली व त्याने उद्या लढायचे आहे, असे ठरविले. तो लढला, लढाईही जिंकली. कारण फंदफितुरी पसरवून त्याने लढाई जिंकली. सैन्याची दाणादाण उडवली. तसे तेजबहादूरसारख्या घटनांवरून होणार नाही यावर काय विश्वास ठेवावा? म्हणून सुरुवातीला म्हंटले आहे, की ‘म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय.
No comments:
Post a Comment