टूरिझम हवे की टेरोरिझम?
April 3, 2017021
– पंतप्रधानांचा काश्मिरी तरुणांना सवाल
– काही दगडफेक करतात, काही दगड फोडून बोगदा तयार करतात
– देशातील सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचे राष्ट्रार्पण
– नितीन गडकरी यांचे अभिनंदन
श्यामकांत जहागीरदार
उधमपूर, २ एप्रिल
काश्मिरातील युवकांसमोर टूरिझम आणि टेररिझम असे दोन मार्ग आहे टूरिझमच्या मार्गाने जम्मू काश्मीरचा विकास होऊ शकतो, तर टेररिझमचा मार्ग त्यांना विनाशाकडे नेऊ शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील चेनानी-नाशरी दरम्यानच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या बोगद्याचे लोकार्पण केल्यानंतर उधमपूर येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह, जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोरा, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, उपमुख्यमंत्री निर्मलसिंह, सार्वजनिक बंाधकाम मंत्री नईम अख्तर, प्रदेश भाजपा अध्यक्ष सत शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बोगद्याचे लोकार्पण केल्यानंतर हेलिकॉप्टरने मोदी आणि अन्य मान्यवरांचे सभास्थळी आगमन झाले. मोदी यांचे आगमन झाल्यावर तसेच त्यांचे भाषण सुरू असतांना ‘मोदी, मोदी’चा अखंड गजर सुरू होता.
या बोगद्याच्या कामासाठी केंद्र सरकारने पैसे दिले असले तरी त्याच्या उभारणीत क़ाश्मीर खोर्यातील युवकांचे मोठे योगदान आहे. जवळपास ४ हजार तरुणांनी दगड फोडून हा बोगदा घडवत राज्याच्या विकासात आपले योगदान दिले, तर दुसरीकडे काही भरकटलेले तरुण दगडफेक करून खोर्याच्या विकासात अडथळा आणत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. खोर्यात सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटनांवर या माध्यमातून मोदी यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. खोर्यातील हिंसाचारात आतापर्यत अनेक निर्दोष तरुणांचा बळी गेला., काश्मीरची भूमी रक्ताने लाल झाली. ४० वर्षांपासून खोर्यात हा प्रकार सुरू आहेे. यातून आतापर्यंत कोणाचेच भले नाही, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
हा बोगदा म्हणजे जम्मू-काश्मीरच्या विकासाची भाग्यरेषा ठरेल. या बोगद्याने जम्मू आणि श्रीनगरमधील अंतरच कमी होणार नाही, तर हदयानेही हे दोन्ही प्रांत जवळ येतील, असा विश्वास व्यक्त करत मोदी म्हणाले की, या बोगद्यामुळे राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, तसेच रोजगारही वाढेल. प्रति माणशी उत्पन वाढवण्याची क्षमता देशात फक्त जम्मू-काश्मीरमध्येच पर्यटनामुळे आहे. पर्यटनाची ताकद ओळखा आणि त्यादृष्टीने कामाला लागा. यासाठी केंद्र सरकारकडून जी काही मदत लागेल, ती सर्व करायला आम्ही तयार असल्याचा निर्वाळा मोदी यांनी दिला.
या बोगद्यामुळे शेतकर्यांना आपला शेतमाल, फळे, भाजीपाला आणि फुले दिल्लीच्या बाजारात पाठवता येतील. आतापर्यंत अनेकवेळा जम्मू-श्रीनगर मार्ग ठप्प राहात असल्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. आता मात्र या बोगद्यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे, तरुणांना रोेजगाराच्या अनेक संधी मिळणार आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. बोगद्याचे काम करतांना पर्यावरणाचे रक्षण करण्यात आले. यातून जगासमोर एक आदर्श उभा करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी ८० हजार कोटींचे पॅकेज दिले होते. आतापर्यंतच्या पॅकेजचा खर्च कागदावरच होत होता. यावेळी मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरला विकासाच्या प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याची ग्वाही देत मोदी म्हणाले की, यापासून कोणी आम्हाला रोखू शकणार नाही. जम्मू-काश्मीरची प्रगती कशी होते हे आम्ही सीमेपलीकडच्या लोकांना दाखवून देऊ. जम्मू क्षेत्रासह राज्याचा संतुलित विकास करण्याची हमी मोदी यांनी दिली. राज्यात असेच आणखी ९ बोगदे बांधण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
नितीन गडकरी
येत्या दोन वर्षात राज्यात रस्ते विकासाची ६० हजार कोटींची कामे केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट २०१८ पयर्र्ंत जम्मू-श्रीनगर हे २९३ किमीचे अंतर आणखी ६२ किमीने कमी करण्याची घोषणा करत गडकरी म्हणाले की, यामुळे जम्मूवरून श्रीनगरला चार तासातच पोहोचता येईल.
जम्मू येथील रिंगरोडसाठी २१०० कोटी, तर श्रीनगर येथील रिंगरोडसाठी २२०० कोटी देण्याची तसेच या कामाच्या निविदा तातडीने काढण्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. लडाख येथील जोजिला पास येथे ६ हजार कोटी खर्च करून रस्ते बांधण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
मेहबुबा मुफ्ती
केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे जम्मू-काश्मिरातील परिस्थितीत सुधारणा होत असली तरी अजून खूप काही करायचे असल्याचे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्यामुळेच मागील वर्षीच्या संकटाच्या परिस्थितीतून जम्मू काश्मीर बाहेर येऊ शकले, अशी कृतज्ञताही मुफ्ती यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करतांना मुफ्ती म्हणाल्या की, मोदी जे म्हणतात, ते करून दाखवतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. उत्तरप्रदेशातील विजयाबद्दल मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंदसिंह यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते.
आणि आकाशात हजारो चांदण्या…
चेनानी-नाशरी बोगद्याचे औपचारिक उद्घाटन मी केले असले तरी तुम्हीसुद्धा या बोगद्याच्या उद्घाटन प्रक्रियेत आपल्या मोबाईलचे फ्लॅश चालू करून तसेच भारतमातेचा जयजयकार करत सहभागी व्हा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी करताच उपस्थित लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या मोबाईलचा फ्लॅश चालू करून तसेच भारतमातेचा जयजयकार करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. एकाच वेळी हजारो लोकांच्या मोबाईलचे फ्लॅश चालू झाल्यामुळे आकाशात तारे चमकल्यासारखे वाटत होतेबोगद्याची १० वैशिष्ट्ये:
१. दोन लेनचा हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. यामुळे जम्मू-श्रीनगर हे अंतर १०० कि.मी. ने कमी होणार आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचणार आहे.
२. हा बोगदा बांधण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. खराब हवामान असताना जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केला जातो. हा बोगदा मात्र कधीही बंद करावा लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे सुरू होऊन हा बोगदा रामबन जिल्ह्यातील नाशरी येथे बाहेर पडतो.
३. बर्फवृष्टी आणि दरड कोसळण्याची भीती असलेल्या ४४ ठिकाणांपासून हा बोगदा तुमची सुटका करणार आहे.
४. या बोगद्याच्या उभारणीसाठी एकूण १ हजार ५०० इंजीनिअर्स, भूगर्भतज्ज्ञ आणि कामगारांनी अहोरात्र मेहनत घेतली.
५. या बोगद्यासाठी एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये इतका खर्च आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बोगद्याची उभारणी केली.
६. बोगद्याच्या सुरक्षेसाठी सुमारे १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास कंट्रोल रूमकडून तत्काळ वाहतूक पोलिसांना त्यांची माहिती दिली जाणार आहे.
७. दोन लेनवर २९ क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पॅसेज आहे.
८. बोगद्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणूनही खबरदारी घेण्यात आली आहे. बोगद्यात हवा खेळती राहावी, कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढू नये यासाठी ठिकठिकाणी छिद्रं ठेवण्यात आली आहेत.
९. बोगद्यात पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एखाद्या वाहनात बिघाड झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून ही व्यवस्था असणार आहे.
१०. या बोगद्यामुळे काश्मीर खोऱ्याचा इतर भागांशी बाराही महिने संपर्क राहणार आहे. व्यापार आणि पर्यटन या दोहोंसाठी हा बोगदा पर्वणी ठरेल. जम्मू-काश्मीरसाठी हा बोगदा लाइफलाइनच ठरणार आहे.
No comments:
Post a Comment