April 13, 2017068
दिल्लीचे वार्तापत्र
कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या पाकिस्तानच्या आततायी निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आधीच तणावपूर्ण असलेल्या संबंधातील तणाव आणखी वाढला आहे. जाधव यांच्यावर रॉचे अधिकारी असल्याचा आणि पाकिस्तानातील घातपाती कारवायात सहभागी असल्याचा आरोप ठेवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानची ही कृती भारतविरोधी आणि प्रक्षोभक म्हणावी लागेल.
जाधव यांना फासावर लटकवण्यात आले तर ती त्यांची हत्या मानली जाईल, असे भारताने ठणकावून सांगितले आहे. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारतीय जनतेत प्रचंड क्षोभ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जाधव यांच्याविरुद्ध ते रॉचे अधिकारी असल्याचे आणि घातपाती कारवायात त्यांंचा सहभाग असल्याचे कोणतेच पुरावे पाकिस्तानजवळ नसल्याचा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत केला आहे. त्याचप्रमाणे जाधव यांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची, वेळ पडली तर त्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याचा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत एकमुखाने दिला आहे. त्यामुळे जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आपल्या प्रयत्नात कोणतीही कसूर ठेवणार नाही, असा विश्वास देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरुद्ध पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा मार्ग उपलब्ध असल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी संसदेत केला आहे. त्याचबरोबर जाधव यांना आपल्या बचावासाठी सर्वोत्तम वकील उपलब्ध करून देण्याची तयारी भारत सरकारने दर्शवली आहे. त्यामुळे जाधव फाशीच्या शिक्षेविरुद्धची आपली लढाई पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात चांगल्या पद्धतीने लढू शकतील, याबाबत शंका नाही.
जाधव हे भारताचे सुपुत्र असल्यामुळे या लढाईत केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा निर्वाळाही सुषमा स्वराज यांनी दिला आहे. मात्र या लढाईत कुलभूषण जाधव एकटे नाही, तर आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा सर्व राजकीय पक्षांनी आणि देशवासीयांनीही जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची गरज आहे. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावताना कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच पाकिस्तानातील माध्यमांनीही फाशीच्या शिक्षेविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध सर्व पुरावे असतानाही भारताने त्याच्याविरुद्धचा खटला कायदेशीर मार्गाने आणि अजमल कसाबला आपल्या बचावाची पूर्ण संधी देत चालवला होता. खरं म्हणजे अजमल कसाबविरुद्ध कोणताही खटला न चालवता त्याला गोळ्या घालून मारून टाकले असते, तरी कोणी भारताला दोष दिला नसता. कारण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या सहभागाचे पुरावे संपूर्ण जगाने पाहिले होते. मात्र भारत हा कायद्याने चालणारा आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणारा देश असल्यामुळे भारताने अजमल कसाबचा खटला न्याय पद्धतीने चालवला. दुसरीकडे कुलभूषण जाधवकडे भारताचा हेर असल्याचा तसेच त्याने पाकिस्तानात घातपाती कारवाया केल्याचे कोणतेच पुरावे नसताना पाकिस्तानच्या न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे जाधवला फाशीची शिक्षा सुनावण्याला पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी हिरवी झेंडी दाखवली होती. याचाच अर्थ जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्याचा निर्णय पाकिस्तानी सरकारच्या आणि लष्कराच्या दबावाखाली लष्करी न्यायालयाला घ्यावा लागला आहे.
पाकिस्तानी तुरुंगात असे एक नाही तर भारतीय लष्कराचे जवळपास ५४ अधिकारी गेल्या कित्येक वर्षांपासून सडत आहेत. यात नागपूरचे फ्लाईट लेफ्टनंट तांबे यांचाही समावेश आहे. मात्र त्यांची अद्याप सुटका झाली नाही. जिनेव्हा करारानुसार एकदुसर्याने आपापल्या ताब्यातील युद्धकैद्यांची सुटका करण्याची तरतूद होती, मात्र पाकिस्तानने जिनेव्हा करारातील तरतुदींनाही हरताळ फासला आहे. विशेष म्हणजे या सर्वांना १९७१ च्या युद्धात युद्धबंदी बनवण्यात आले होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना नुकत्याच भारत दौर्यावर येऊन गेल्या. बांगलादेश मुक्तियुद्धात शहीद झालेल्या भारतीय लष्करी अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या उपस्थितीत नुकताच सत्कार करण्यात आला. पाकिस्तान आपल्या देशातील तुरुंगात असलेल्या भारताच्या ५४ लष्करी अधिकार्यांची सुटका करायला तयार नाही, मात्र शरणागती पत्करलेल्या पाकिस्तानच्या ९३ हजार युद्धकैद्यांची सिमला कराराच्या आधारे भारताने ससन्मान सुटका केली होती, हेही यानिमित्ताने सांगावेसे वाटते. ज्या सिमला कराराच्या आधारे पाकिस्तानाच्या ९३ हजार युद्धकैद्यांची सुटका होऊ शकते, त्याच सिमला कराराचा आधार घेऊन आम्ही आमच्या ५४ लष्करी अधिकारी आणि जवानांची सुटका का करून घेऊ शकलो नाही? आमचे त्या वेळचे राजकीय नेतृत्व यात कमी पडले का, असा प्रश्न भारतीयांना सतावतो आहे. याआधी अशाच आरोपावरून पाकिस्तानने भारताच्या अनेक निरपराध नागरिकांना फासावर लटकवले आहे. १९९९ मध्ये शेख शमीम या भारतीय नागरिकाला फासावर लटकवण्यात आले होते. सरबजितसिंह, किरपालसिंह आणि नंतर चमेलसिंह यांचा पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. चमेलसिंह यांच्या शरीरातील अनेक अवयव काढून टाकण्यात आल्याचे त्यांच्या मृतदेहाचे भारतात दुसर्यांदा झालेल्या शवविच्छेदनात आढळून आले होते. विशेष म्हणजे हे ५४ भारतीय युद्धकैदी पाकिस्तानानील वेगवेगळ्या तुरुंगात असल्याचे वेळोवेळी स्पष्टही झाले होते. १९९६ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री इंद्रकुमार गुजराल यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात पाकिस्तानात ५४ भारतीय युुद्धकैदी असल्याची कबुलीही दिली होती. तसेच त्यांच्या सुटकेबाबत भारताकडून केल्या जाणार्या प्रयत्नांना पाकिस्तान प्रतिसाद देत नसल्याबाबत खेदही व्यक्त केला होता.
या युद्धकैद्यांची सुटका करण्याचे नाटक पाकिस्तानने वेळोवेळी केले. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही या ५४ युद्धकैद्यांना सोडण्याची तयारी दाखवली होती, पण त्यांनी पुढे काहीच केले नाही. या कैद्यांच्या नातलगांनाही एका विशेष गाडीतून पाकिस्तानात नेण्यात आले होते. मात्र त्या वेळी आधीच पाकिस्तानने या ५४ कैद्यांना लपवून ठेवले होते, ज्या वेळी त्यांचे नातलग पाकिस्तानातील तुरुंगांना भेट देत होते. भारताबद्दल पाकिस्तानच्या मनात प्रचंड विखार आहे, द्वेष आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने भारतात दहशतवादी कारवाया पाकिस्तान घडवीत असतो, भारताला त्रास देत असतो. त्याचेच प्रत्यंतर अशा घटनांतून येत असते.
कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी प्रयत्न करताना केंद्र सरकारने पाकिस्तानच्या तुरुंगातील ५४ भारतीय युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या एक दोन नाही तर ९३ हजार लष्करी अधिकारी आणि जवानांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याची ताकद भारतीय लष्करात अजूनही आहे, याचा पाकिस्तानने विसर पडू देऊ नये. भारतीय लष्कराने पाकिस्तानात सर्जिकल स्टा्रईक करून आपण काय करू शकतो, याची झलकही पाकिस्तानला दाखवली आहे. त्यामुळे पाकिस्तानने विनाकारण भारताशी खाजवून घेऊ नये. जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यासोबत त्यांची आणि अन्य ५४ भारतीय युद्धकैद्यांचीही पाकिस्तानने तातडीने सुटका करावी. भारतातील नेतृत्वात आता बदल झाला आहे, याची पाकिस्तानने जाणीव ठेवली पाहिजे, तेच त्यांच्या हिताचेही आहे
No comments:
Post a Comment