| Updated: Apr 6, 2017, 07:26PM IST
0
काश्मीरला आपली जहागिरी समजणारे फारुक अब्दुल्ला सत्तेपासून दूर झाल्यापासून अधूनमधून बरळतात, ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या बोगद्याचे उद़्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटन आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करीत दोहोंपैकी काय निवडणार असा प्रश्न त्यांनी तेथील युवकांना केला होता. खोऱ्यामधील तरुणांची दिशाभूल करून त्यांना जवानांवर दगड फेकायला लावण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा उल्लेख केला होता. दगडफेक करणाऱ्यांची भावना समजून घेण्याची भाषा करीत अब्दुल्लांनी फुटीरतावाद्यांची भूमिका उचलून धरली आहे. अब्दुल्ला घराण्याच्या तीन पिढ्यांनी काश्मीरमध्ये सत्ता उपभोगली असून, सोयीने भूमिका बदलण्याची त्यांना सवयच आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे; परंतु काश्मीर ही आपल्या कुटुंबाची जहागीर असल्याच्या भावना असलेल्या अब्दुल्ला यांना ते मान्य नाही. राज्याची सत्ता उपभोगताना, तसेच केंद्रातील मंत्रिपदे भूषविताना त्यांनी घेतलेल्या शपथेचाही त्यांना विसर पडला आहे. देशाच्या एकात्मतेशी प्रतारणा करून ते आपले आस्तित्व राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत काश्मीरमधील मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहेच. त्या पाठोपाठ झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही तेथील मतदारांनी त्यांना सत्तेवरून खाली खेचले आहे. दहशतवादाला छुपा पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भावनेला त्यांच्याच मतदारांनी केराची टोपली दाखविली आहे. असे असतानाही सातत्याने अशी भूमिका घेऊन लोकप्रियता मिळविण्याचा आणि आपले अस्तित्व टिकविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची कडक शब्दांत निंदाच केली पाहिजे. काश्मीरमधील समस्या ही विकासाच्या मार्गानेच सुटणारी आहे. मात्र, विकासाऐवजी सत्तेतच रस असणाऱ्या अब्दुल्ला पितापुत्रांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. काश्मीर अस्थिर करून त्याद्वारे आपले अस्तित्व टिकविणाऱ्या राजकारण्यांमुळे तेथील प्रश्नाची गुंतागुंत वाढत चालली आहे. काश्मीरचा प्रश्न पेटवत ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या कारवाया, तेथील राजकारण्यांची उलट-सुलट विधाने यांमुळे काश्मीरच्या जनतेचे मोठे नुकसान होत आहे. अब्दुल्लांसारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्याने अधिक समंजस भूमिका घेण्याची गरज असताना, ते बरळू लागले आहेत. त्यांची ही भूमिका फक्त त्यांच्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच मागे नेणारी आणि दहशतवादाचा भस्मासूर पोसणारी आहे. अब्दुल्लांना कधी तरी महात्मा गांधींच्या मार्गाने जाण्याची सुबुद्धी मिळावी एवढीच अपेक्षा करता येईल
No comments:
Post a Comment