April 8, 2017
Facebook Twitter
देशाच्या सर्वच राज्यांत तरुणाईची होरपळ सुरू आहे, पण कश्मीरातील तरुण पाकपेरणेने दगडफेक आणि हिंसाचार करतो तेव्हा ‘जरा त्या पोरांची वेदना समजून घ्या’ असे आणखी किती काळ ऐकून घ्यायचे? कश्मीरात सुरू असलेल्या ताज्या हिंसाचाराचा धिक्कार मेहबुबा मुफ्ती यांनी केलेला नाही. डॉ.अब्दुल्लासारख्यांनी त्या दगडफेकीचे समर्थन केले. त्या समर्थनाचा साधा निषेधही मेहबुबा मुफ्ती यांनी केला नाही. सगळाच गोंधळ आहे. तेव्हा कोणत्या तोंडाने अब्दुल्लाच्या विधानाचा धिक्कार करायचा, हाच सगळ्यांपुढे गहन प्रश्न आहे. कश्मीरसंदर्भात काही सकारात्मक घडविण्याची गरज आहे.
सगळाच गोंधळ!
कश्मीर प्रश्नाचा चुथडा आपलेच लोक कसा करतात याचा आणखी एक इरसाल नमुना समोर आला आहे. अर्थात यांना आपले तरी कसे म्हणावे हा प्रश्नच असतो. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला हे आता पचकले आहेत की, ‘‘कश्मीरातील तरुण रोजगार, पर्यटनासाठी नव्हे, तर त्यांच्या हक्काच्या देशासाठी दगडफेक करतो.’’ फारुख अब्दुल्ला काय किंवा सध्याच्या भाजपसमर्थक मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती काय, त्यांचे अंतरंगातील हे विष अधूनमधून उकळी फुटावी तसे बाहेर पडतच असते. डॉ. अब्दुल्ला हे श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उभे आहेत व त्यासाठी त्यांनी ही नवी पोपटपंची सुरू केली आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांची वक्तव्ये सहसा कोणी गांभीर्याने घेत नाहीत, पण शेवटी कश्मीरातील आजच्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले तर डॉ. अब्दुल्ला यांच्यासारख्या कश्मिरी पुढाऱयांच्या अंतरंगात काय खदखदत आहे हे लक्षात येते. कश्मीरातील तरुण जवानांवर दगडफेक करीत आहेत हे काही देशभक्तीचे लक्षण नक्कीच नाही; पण या तरुणांचे समर्थन करताना मेहबुबा मुफ्ती व फारुख अब्दुल्ला या दोन राजकीय हाडवैऱयांचे मनोमीलन झाले आहे. हा देशाला सगळय़ात मोठा धोका आहे. कश्मिरी तरुणांना दहशतवाद हवाय की पर्यटन हवेय, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी विचारला. त्यावर ‘दगडफेक’ हे उत्तर असेल व त्या
दगडफेकीचे समर्थन
होणार असेल तर कश्मीरमधील जवानांच्या सांडलेल्या रक्ताचे मोल कमी होते. दगडफेक करणारे भाडोत्री आहेत व त्यांना दगड फेकण्यासाठी पाकिस्तानी संघटनांकडून पैशाचा पुरवठा होत असेल तर ही देशभक्तीच आहे असे बोलणारे लोक ठार वेडे आहेत किंवा त्यांना देशभक्तीची व्याख्या समजावून सांगायला हवी. मेहबुबा मुफ्ती यांनीही या दगडफेक्यांचे समर्थन केले आहे. एकदा नव्हे, वारंवार आणि अनेकदा केले आहे. राज्यकर्त्याने अशा दगडफेक्यांना आवरायला हवे आणि कठोर शासन करायला हवे, पण स्वतः राज्यकर्तेच अशा देशद्रोही प्रवृत्तींचे उघड समर्थन करू लागले तर कसे व्हायचे? निवडणुका जिंकण्यासाठी पाकसमर्थनाच्या घोषणा देणाऱयांच्या दाढय़ा कुरवाळणारे कोणीही असोत, त्यांच्या वाऱयालाही चांगल्या प्रवृत्तीच्या राजकीय मंडळींनी उभे राहू नये. अर्थात सत्तेच्या राजकारणात याचा विचार कुठे होतो? पुन्हा डॉ. अब्दुल्ला यांच्या बेताल विधानांचा समाचार घेण्याचे नैतिक बळ कश्मीरातील सत्ताधाऱयांकडे आज उरले आहे काय, हा प्रश्नच आहे. कश्मिरी तरुण ‘त्यांच्या देशा’साठी दगडफेक करीत असतील तर ‘पोरांनो, तुमचा देश नक्की कोणता?’ असे खडसावून विचारण्याची हिंमत आज तरी कुणात दिसत नाही.डॉ. अब्दुल्ला यांच्या विधानांची चिरफाड करणाऱयांना उद्या कदाचित गुन्हेगार ठरवले जाईल. अर्थात डॉ. अब्दुल्ला यांचा
राजकीय इतिहास
हा नेहमीच संशयास्पद राहिला आहे आणि विद्यमान मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राष्ट्रभक्तीच्या नावाने फार प्रकाश पाडल्याचेही दाखले नाहीत. अश्रफ वाणीसारखा हिजबुलचा कमांडर मारल्याबद्दल त्या आमच्या जवानांवर आगपाखड करतात व संसदेवर हल्ला करणाऱया अफझल गुरूला हुतात्मा आणि स्वातंत्र्यसेनानी ठरवतात. कश्मीरातील तरुणांचे काही प्रश्न आहेत असे वारंवार सांगून देशाला ब्लॅकमेल करणे आता बंद केले पाहिजे. जे प्रश्न कश्मिरी तरुणांचे आहेत त्याहीपेक्षा गंभीर प्रश्न देशातील इतर प्रांतांच्या तरुणांचे आहेत. हे तरुणही निराशा, बेरोजगारी, महागाईच्या आगीत जळत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यातील तरणाबांड शेतकरी हजारेंच्या संख्येने आत्महत्या करतोय. मात्र एवढी प्रतिकूल परिस्थिती असूनही तो ‘त्याच्या देशा’च्या वगैरे नावाने दगडफेक करीत नाही! देशाच्या सर्वच राज्यांत तरुणाईची होरपळ सुरू आहे, पण कश्मीरातील तरुण पाकपेरणेने दगडफेक आणि हिंसाचार करतो तेव्हा ‘जरा त्या पोरांची वेदना समजून घ्या’ असे आणखी किती काळ ऐकून घ्यायचे? कश्मीरात सुरू असलेल्या ताज्या हिंसाचाराचा धिक्कार मेहबुबा मुफ्ती यांनी केलेला नाही. डॉ. अब्दुल्लासारख्यांनी त्या दगडफेकीचे समर्थन केले. त्या समर्थनाचा साधा निषेधही मेहबुबा मुफ्ती यांनी केला नाही. सगळाच गोंधळ आहे. तेव्हा कोणत्या तोंडाने अब्दुल्लाच्या विधानाचा धिक्कार करायचा, हाच सगळय़ांपुढे गहन प्रश्न आहे. कश्मीरसंदर्भात काही सकारात्मक घडविण्याची गरज आहे
No comments:
Post a Comment