April 23, 2017011
टेहळणी
कुलभूषणसहित आपल्या सर्व गुप्तहेरांच्या मागे ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे महत्त्वाचे आहे. यात कुलभूषण गुप्तहेर आहे की नाही ते महत्त्वाचे नाही, तर तो या देशाचा नागरिक आहे, हे महत्त्वाचे आहे.
‘‘मी अमेरिकन असतो तर तीन दिवसांत सुटलो असतो ना?’’ रवींद्र कौशिकने आपल्या शेवटच्या पत्रात हा हेलावून टाकणारा प्रश्न विचारला होता. आजच्या पिढीला या ‘ब्लॅक टायगर’बद्दल काही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. रवींद्र कौशिक ऊर्फ नबी अहमद शकीर हा भारताचा गुप्तहेर होता. या रंगमंच कलाकारातील सुप्त गुण हेरून ‘रॉ’च्या अधिकार्यांनी त्याला गुप्तहेर बनवले. त्याने इस्लाम कबूल केला. पापस्तानातील एका मुस्लिम मुलीशी निकाह केला. १९७९ ते १९८३ या काळात त्याने पापस्तानच्या सैन्यात नोकरी मिळवून भरपूर माहिती भारताकडे पाठवली. या पाच वर्षांत पापी अधिकार्यांना त्याचा काहीच संशय आला नाही. दुर्दैवाने पुढे इनायत मसीहा नामक ‘रॉ’चा एक हेर पकडला गेला आणि रवींद्रचे भांडे फुटले. त्याला आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नंतर ती रद्द करून जन्मठेपेत परावर्तित करण्यात आली. वेगवेगळ्या तुरुंगात ठेवून त्याचा यथेच्छ छळ केला जात होता. सियालकोट, मुलतान, कोट लखपत आदी ठिकाणी त्याला ठेवण्यात आले. तब्बल १८ वर्षे त्याने अनन्वित हाल भोगले आणि २६ जुलै १९९९ ला, अस्थमा आणि क्षयाने गांजलेला हा ‘ब्लॅक टायगर’ तुरुंगातच मरण पावला. त्याचे मृत शरीर देण्यासही पापस्तानने नकार दिला. भारत सरकारने त्याच्या कुटुंबीयांना आधी पाचशे व नंतर दोन सहस्र रुपये इतकीच पेन्शन देऊ केली होती. आपण आपल्या गुप्तहेरांबद्दल किती उदासीन असतो, त्याचे हे उदाहरण आहे.
असे अनेक गुप्तहेर आपल्या देशासाठी काम करीत असताना पकडले गेले असतील, मारले गेले असतील अथवा आजही छळ सोसत तुरुंगात खितपत पडले असतील. काही वर्षांपूर्वी माजी गुप्तहेरांच्या संघटनेने दिल्लीत आंदोलन केले होते. त्यात पापस्तानात अद्याप छळ सोसत तुरुंगवास भोगणार्या लोकांचे नातेवाईक आणि जे परत आले त्यांना सरकारने गुप्तचर म्हणून नाकारलेले असे लोक होते. कामगिरी बजावून यशस्वी होऊन परतलेल्या आपल्या गुप्तहेरांना आपण का झिडकारतो, ते आकलनाच्या पलीकडचे आहे. अशा कित्येक झिडकारलेल्या लोकांना भरपाई मिळविण्यासाठी आणि स्वत:ची ओळख मिळविण्यासाठी सरकारविरुद्ध न्यायालयात लढावे लागते आहे, हे दुर्दैवाचे आहे. यांच्याबद्दल कोणी बुद्धिजीवी पुढे येत नाही.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेच्या निमित्ताने हे सर्व आठवले. याकुबच्या फाशीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पहाटे उठवायला गेलेल्या पुरोगामी व अमन की आशावाल्यांपैकी एकही जण कुलभूषणसाठी पुढे का येत नाही? पापस्तानाला सदैव भेटी देणारे हे ‘पीस इनिशिएटिव्ह’वाले आता गप्प का आहेत? आजही विविध वृत्तवाहिन्यांवरून जणू पाकी एजंट असल्यासारखे बोलणारे हे लोक, आपला देश सोडून पापस्तानात स्थायिक का होत नाहीत? भारताने पकडलेल्या ज्या १२ मच्छीमार पापस्तान्यांची सुटका होणार होती, ती भारताने सध्या रोखून धरली आहे. त्यावर एक शहाणे विचारवंत आमच्याशी एका वाहिनीवर वाद घालत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताने त्यांना आधी सोडून द्यायला हवे. असे लोक आपल्याकडे असल्यावर आणखी वेगळ्या शत्रूची गरज काय?
पण, यांनाच दोष का द्यावा? गुणांचा अतिरेक झाला की, तिथे सद्गुणविकृती निर्माण होते, असे सावरकर म्हणत असत. अहिंसावाद्यांमध्ये ती पुरेपूर भिनली आहे. त्यातून गांधीवादी म्हणवणारे काही जण तर अगदी अर्क म्हणावे लागतील. असा एक पंतप्रधान आपल्याकडे होऊन गेला. त्याच्यामुळे तब्बल ५२ गुप्तहेर एलिमिनेट झाले. पापस्तानाला अण्वस्त्रधारी होण्यातही त्यांचा हातभार लागला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या कामगिरीमुळेच बहुधा त्यांना पापस्तानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-पापस्तान’ देण्यात आला असावा! त्यांचे नाव मोरारजी देसाई असे होते. जनता पक्षाच्या काळात ते आपल्या देशाचे पंतप्रधान होते.
रावळपिंडीजवळ कहूता येथे पापस्तान सीक्रेट युरेनियम एनरिचमेंट प्लाण्ट उभारत आहे, ही बातमी ‘रॉ’च्या गुप्तहेरांनी आणली. लगेच ‘रॉ’ने आपले ५२ गुप्तहेर तिथे कामाला लावले. नोकर, हरकाम्या, स्वयंपाकी आदी भूमिकेत हे लोक शिरले आणि कहूतामधील बित्तंबातमी काढू लागले. या प्लाण्टमध्ये काम करणार्या वैज्ञानिकांच्या केसांचे नमुने मिळवून त्यांची छाननी करण्यात आली. त्यांचे रिझल्टस् पॉझिटिव्ह आले. त्यावरून तिथे युरेनियमसंबंधात काम चालू आहे आणि पाक अण्वस्त्रसज्ज होऊ पाहतो आहे, हे कळून चुकले. त्याच वेळी इराकसुद्धा बगदादजवळ आपला प्लाण्ट कार्यान्वित करणार होता. हे दोन्ही प्लाण्ट उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलच्या ‘मोसाद’ने ‘रॉ’कडे हात पुढे केला. या ऑपरेशन्सची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. त्यांनी लगेच ही कारवाई गुंडाळण्यास सांगितले. मुळात त्यांचा ‘रॉ’वर राग होता. त्या संस्थेने इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून आणिबाणीच्या काळात विरोधकांवर कारवाई केली होती, असे त्यांना वाटत होते. त्यात काही तथ्य असू शकेल. पण, तो राग देशाच्या मुळावर येऊ द्यायचा नसतो, इतकी जागरूकता असावी लागते. तसे न करता त्यांनी ‘रॉ’च्या फंडात ३० टक्के आर्थिक कपात केली.
‘निर्माय खलजिह्वाग्रं सर्वप्राणहर नृणाम्|
चकार किं वृथा शस्त्र विष वन्हिन प्रजापतिः॥
लोकांचे प्राण घेणारी (त्यांना दुखावणारी) एकमेव, तीक्ष्ण जीभ निर्माण केल्यानंतर विधात्याने शस्त्र, विष आणि अग्नी यांची कशाला बरे निर्मिती केली?
हे सर्व पाहिल्यावर इस्रायली परराष्ट्रमंत्री आणि ‘मोसाद’ संचालक अशा दोघांनी मोरारजींची भेट घेतली. हे सर्व ऑपरेशन आम्ही फत्ते करू, फक्त आमच्या विमानांना इंधन आणि एक थांबा भारताने द्यावा, अशी विनंती केली. ती विनंतीसुद्धा देसाईंनी फेटाळली. त्यानंतर झिया उल हकला फोन करून कहूताबद्दलची सर्व माहिती ‘रॉ’मुळे भारताला मिळाली असल्याचे सांगितले आणि आवरते घ्यायला सांगितले. यामुळे झिया सावध झाला आणि नंतर पापस्तानातील ‘रॉ’चे एजंट शोधून काढण्यात आले.
तिकडे इराकवरील ऑपरेशन यशस्वी झाले. एकट्या इस्रायलने ते तडीस नेले. फक्त त्यासाठी १९८१ उजाडावे लागले इतकेच. मोरारजींच्या या सद्गुणविकृतीमुळे ‘रॉ’चे खच्चीकरण झाले. ‘मोसाद’ने ‘रॉ’शी संबंध तोडले. पापस्तान अण्वस्त्रधारी बनून आता सतत आपल्याला धमक्या देतो आहे.
आतातरी आपण अधिक सावध बनायला हवे आहे. सुदैवाने देशहिताचा विचार करणारा आणि शत्रूला जशास तसे उत्तर देऊ पाहणारा पंतप्रधान आपल्याला मिळाला आहे. कुलभूषणसहित आपल्या सर्व गुप्तहेरांच्या मागे ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे महत्त्वाचे आहे. यात कुलभूषण गुप्तहेर आहे की नाही ते महत्त्वाचे नाही, तर तो या देशाचा नागरिक आहे, हे महत्त्वाचे आहे. ‘अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे| तजवीज करीत बैसावे एकान्त स्थळी॥ या समर्थांच्या उक्तीची आठवण होते आहे.
No comments:
Post a Comment