Total Pageviews

Friday 2 January 2015

आधुनिक तंत्रज्ञान मुळावर-INTERNET FUELS RAPE MOLESTATION

वय फक्त पाच वर्षे! इंग्रजी शाळेत शिकणार्‍या एका मुलीने आपल्या गुप्तांगावर दुखापत झाली असल्याचेे आपल्या आईला सांगितले तेव्हा तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने लघवीच्या वाटेवर इजा झाल्याचे सांगितले. मग ही इजा कशी झाली असे विचारल्यावर सीनियर केजीमध्ये शिकणार्‍या मुलीने आपल्याच वर्गातील एका मुलाने आपणास शाळेच्या ‘वॉश रूम’मध्ये नेऊन आपल्या ‘प्रायव्हेट पार्ट’शी चाळे केल्याचे सांगितले तेव्हा त्या मुलीच्या आईवडिलांना प्रचंड धक्काच बसला. त्यांनी या लैंगिक शोषणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या मुलाला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. परंतु बाल्यावस्थेत असलेला तो शिशुवर्गातील मुलगा काय सांगणार? अवघ्या पाच वर्षांचा तो कसा काय बलात्कार करणार? त्यामुळे त्या मुलाने ‘हातचलाखी’ केली होती. त्याचाच परिणाम त्या मुलीला भोगावा लागला. तिला जखम झाली. मुलीच्या आईवडिलांनी त्या मुलावर कारवाई व्हावी म्हणून पोलीस ठाणे डोक्यावर घेतले, परंतु त्या लहानग्या मुलावर कारवाई करण्याची कायद्यात कोणतीही तरतूद नसल्याने पोलिसांनी ‘नॉन कॉग्निजिबल’ म्हणजे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली. ही अलीकडचीच मुंबईच्या माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे. विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकार माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयांतच घडतात असे नाही. तो काळ आता गेला. शिशुवर्गातही लहान मुलांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार वाढीला लागले आहेत. त्यामुळे मुलांना शिकविणार्‍या प्रामाणिक शिक्षकांना शाळेत डोळ्यांत तेल घालून विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. वर्ग सोडून जाता येत नाही. मधल्या सुट्टीतही मुलांवर लक्ष ठेवावे लागते, त्यांच्या हालचाली पारखाव्या लागतात. नाहीतर मुलगा कुठल्या मुलीला वॉश रूममध्ये घेऊन जाईल याचा नेम नाही. दहा वर्षांच्या मुलांवर तर आमची विशेष नजर असते असे सांगताना एक शिक्षक म्हणाले, संधी मिळताच ही मुले कोणत्याही टोकाला जातात. रिकाम्या वर्गात ‘रेडहँड’ पकडूनही काही उपयोग नसतो. आईवडिलांना बोलावून समज दिली तर त्यांच्याकडून आणखी भयंकर माहिती मिळते. ‘‘१र्०े१० के घर में क्या करेंगे? मरद मानता नहीं। बच्चे सब देखते है। उसका असर होता है!’’ हे वास्तव झोपडपट्टीतील आयांचे आहे, परंतु मध्यम व उच्च वर्गातील पालकांचे काय? त्यांच्या घरातील मुलांना तर फेसबुक, व्हॉटस्ऍप आदी सोशल साइटस्नी व्यापून टाकले आहे. बरीच मुले आईवडिलांच्या ‘बेडरूम’मधील सीनचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, तर काही मुले सोशल साइटस्वरील अश्‍लील क्लिप्स पाहून बिघडतात. गेल्याच आठवड्यात कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील चितपूर गावात चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी आपल्याच वर्गातील एका मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तेव्हा शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलांना आपण देवाघरची फुलेे म्हणतो त्या समजाला आता तडे जाऊ लागले आहेत. शाळकरी मुले अधिक हिंसक होत चालली आहेत. मोबाईलवरील इंटरनेटवरून पोर्नोसाइटस्, ब्ल्यू फिल्मस् बघण्याचेच हे परिणाम आहेत. दर सेकंदाला अश्‍लील व हिडीस क्लिप्स सोशल साइटवर डाऊनलोड होतात. या क्लिप्स पाहून अल्पवयीन मुले उत्तेजित होतात. त्यांना त्याचे हळूहळू व्यसन लागते. स्त्री दिसली की त्यांच्या मनात सतत विकृत विचार येतात. त्यामुळेच अलीकडे लहान मुलांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार वाढीला लागले असून जगभरातील पालक व शालेय शिक्षक चिंतेत आहेत. कधी प्रकरण दडपले म्हणून शिक्षकांनाच सुळावर चढविले जात आहे. बर्‍याच वेळा शाळेची व पालकांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून शिक्षक प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता आरोपीला मदत केली म्हणून शिक्षकांनाही जेलमध्ये जावे लागत आहे. तेव्हा शिक्षक शिक्षक राहिले नाहीत, विद्यार्थी विद्यार्थी राहिले नाहीत. नातीही संपत चालली आहेत. ९० टक्के बलात्कार हे स्वकीयांकडून, नातेवाईकांकडूनच होत आहेत. तेव्हा प्रश्‍न पडतो येथून पुढे काय होणार आहे या नात्यांचे आणि निरागस बालकांचे? ब्ल्यू फिल्मस्, व्हिडीओ क्लिप्स व पोर्नोसाइटस् नावाच्या अजगरांनी सारे जग गिळंकृत केले आहे. मानवाचे आधुनिक तंत्रज्ञान त्याच्याच मुळावर आले. हातातील ‘मोबाईल’ने तर क्रांती केली आहे. तेव्हा आगे आगे देखो होता है क्या? - प्रभाकर पवार

No comments:

Post a Comment