Total Pageviews

Sunday 4 January 2015

गुप्तहेर संघटनांचे राष्ट्रीय सुरक्षेत योगदान -MUST READ

गुप्तहेर संघटनांचे राष्ट्रीय सुरक्षेत योगदान -TARUN BHARAT तारीख: 04 Jan 2015 01:03:14 सार्वभौम राष्ट्रापुढे अखंडत्व व सुरक्षा अबाधित ठेवण्याचे मुख्य आव्हान असते, नव्हे, ते त्यांचे आद्य कर्तव्यच आहे. अनेकदा राष्ट्रहित जपणे परंपरागत मार्गाने उदाहरणार्थ- राजकीय, आर्थिक, कूटनीतिक वा सैनिकी कृतीने शक्य होत नाही. यास्तव कुणाला सुगावा न लागता गुप्तपणे मारक व प्रतिकारात्मक क्षमता प्राप्त करावी लागते. अशी प्राप्त केलेली शक्ती सतत वृद्धिंगत करून उच्चस्तरावर सज्ज ठेवणे अनिवार्य ठरते. असे करताना फक्त गुप्त माहिती प्राप्त करणे व संकलित करणे इतके सीमित उद्दिष्ट नसते. जी राष्ट्रे शत्रूंनी वेढलेली आहेत अशांना तर अशी क्षमता सतत तत्पर ठेवावी लागते. काही देश अशी क्षमता त्यांच्याकडे असल्याचे उघडपणे मान्य करतात, पण तपशील देत नाहीत. अन्य काही देश अशी क्षमता त्यांच्याकडे असल्याचे मान्य करत नाहीत. ‘चाणक्यनीती’प्रमाणे राष्ट्रावर चार प्रकारची आक्रमणे, संकटे येतात- १) बाहेरून आलेले आक्रमण- ज्याला बाहेरून प्रेरित केले जाते. उदा. पाकिस्तान व चीनचे आक्रमण. २) बाहेरून आलेले आक्रमण- ज्याची प्रेरणा देशांतर्गत आहे. उदा. काश्मीरमधील आतंकवाद. ३) देशांतर्गत विपात्ती- ज्याची प्रेरणा बाहेरची आहे. उदा. ईशान्य भारतातील फुटीरवाद. ४) आंतरिक विपत्ती- ज्याची कारणेही देशांतर्गत आहेत उदा. नक्षलवाद. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशात दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली ‘आय. बी.’ नावाची गुप्तहेर संघटना कार्यरत होती. या संघटनेकडे मारक व प्रतिकारात्मक शक्ती मर्यादित होती. या संघटनेने तत्कालीन पूर्व-पाकिस्तान व ईशान्य भारतात आयएसआयचा मुकाबला करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्याकडे असा गैरसमज आहे की, आयएसआयने १९८९ पासून काश्मिरात देशविघातक व दहशतवादी कारवाया सुरू केल्या. वस्तुस्थिती अशी आहे की, आयएसआयने याची सुरुवात, १९५६ मध्ये नागा बंडखोर फिजो व त्याच्या अनुयायांना प्रशिक्षित करून केली. तत्कालीन पूर्व-पाकिस्तानातील चितगाव येथे प्रशिक्षण छावण्या उघडून बंडखोरांना उत्तर बर्मामार्गे चीनमधे पाठविण्यास मदत केली. १९६० सालापासून मिझो बंडखोर लाल डेंगा व त्याच्या समर्थकांना आश्रय देऊन मदत करण्याचा उपद्व्याप केला. सन १९६२ चे चीनबरोबरील युद्ध, १९६५ सालचे पाकिस्तानबरोबरील युद्ध तसेच आयएसआयचा पूर्व-पाकिस्तान व ईशान्य भारतातील प्रभाव लक्षात घेता सक्षम गुप्तहेर संघटनेची गरज भासू लागली. देशाबाहेरील शत्रूंकडील गुप्त माहिती, तयारी, क्षमता, व्यूहरचना इ.ची माहिती प्राप्त करून आपले धोरण आखण्यास्तव अशी संघटना सहायक ठरू शकेल, असे प्रकर्षाने वाटू लागले. यामुळे २१ सप्टेंबर १९६८ रोजी रॉ म्हणजेच ‘रीसर्च ऍण्ड ऍनॅलेटिकल विंग’ नामक संस्थेची स्थापना करण्यात आली. याआधीच्या गुप्तहेर संघटनांनी केलेल्या कारवाईमुळे नागालॅण्ड व मिझोरममधे बर्याच प्रमाणात शांतता प्रस्तापित करण्यात आली. १९६२ च्या युद्धाअगोदर गुप्तहेरांनी उत्तर बर्मातील पहाडी भागात असलेल्या कांचीन प्रांत व लगतच्या चीनमधील युनान प्रांतात अचानक खेचरांच्या संख्येत वाढ झाल्याची सूचना गुप्तहेरांनी दिल्लीला कळविली होती. युद्धानंतर असे लक्षात आले की, चिनी सैनिक व त्यांचे गुप्तहेर यावरून आपल्या हद्दीत शिरून मोर्चेबंदी केली होती. या सूचनेकडे दिल्लीस्थित योजना व नीतिनिर्धारण करणार्यांनी दुर्लक्ष केल्याने आपण चीनकडून दारुण पराभव ओढवून घेतला. (संदर्भ काव बॉइज ऑफ रॉ- ले. बी. रामन्- पृ. क्र. १७) १९५२ साली चीन, अक्साई चीन भागात रस्ता बांधत असल्याची माहिती तेव्हाचे आय. बी. प्रमुख भोलानाथ मुलिक यांनी सरकारला दिल्याचा दावा केला होता. याकडे कानाडोळा केल्याने चीनने या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले व भारताला हा भूभाग गमवावा लागला. (संदर्भ दि लॉग रोड टु सियाचीन ले.-कुणाल वर्मा व राजीव विलियम्स, पृ. क्र. ८३) वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यावेळच्या संघटनांचे श्रेय न नाकारताही अतिशय शक्तिशाली संघटनेची देशास नितान्त गरज होती. आपल्या पौराणिक ग्रंथात हेरांची आवश्यकता व महत्त्व याबाबत सखोल व विपुल अंगाने लिखाण झाल्याचे आढळते. १) ऋग्वेद- शासनसंस्थेत महत्त्वाची कामगिरी बजावणारे हेर वेदकाळापासून आढळतात. इंद्राचा पुरोहित असलेल्या बृहस्पतीच्या गायी पणिनीने चोरून एका विशिष्ट ठिकाणी बंदिस्त केल्या होत्या. इंद्राच्या सांगण्यावरून सरमा नावाच्या कुत्रीने त्यांचा शोध लावला. असा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. (१०-१०८) याशिवाय ऋग्वेदात अन्यत्रही या धेनूशोधनाचे विपुल उल्लेख आहेत. २) रामायण- राक्षसांकडे हेरांचा स्वतंत्र विभागच होता, असे दिसते. लक्ष्मणाकडून विद्रूप झालेली शूर्पणखा रावणाच्या दरबारात जाऊन त्याला मर्मभेदक शब्दांनी बोलली. तिचे ते बोलणे म्हणजे एकप्रकारची हेरकथाच आहे. सीताहरणानंतर रावणाने रामाच्या हालचालीची माहिती कळविण्यासाठी जनस्थानात आठ राक्षस हेरांची नियुक्ती केली होती. राम आणि सुग्रीव यांच्यात फूट पाडण्यासाठी रावणाने शुक्राची नियुक्ती केली होती. (वा. रा., युद्ध-२०) तसेच वानरसेनेचे बलाबल जाणण्यासाठी रावणाने शुक्र, सारण, शार्दुल यांच्या नेतृत्वाखाली अनेक जासूस पाठविले होते. वानरांमधेही गुप्तचर होते. राम, सुग्रीव यांच्यातील मैत्रीची वार्ता हेरांनीच अंगदाला सांगितली होती. (वा. रा., किष्किंधा-१५) हनुमानाला तर हेरांमधील आदर्श असे म्हटले पाहिजे.) ३) महाभारत- महाभारताच्या काळात हेरांचे महत्त्व खूप वाढले होते असे दिसते. पांडवांचा वनवास संपला आणि त्यांचा अज्ञातवास सुरू झाला. त्या काळात त्यांचा शोध लागावा म्हणून दुर्योधनाने हेरांचे जाळे पसरले होते. हेर कुठे असावे, यासंबंधाचे विवेचन करताना महाभारतात असे म्हटले आहे की, स्वराष्ट्रात व शत्रुराष्ट्रात न ओळखता येणारे हेर नेमावे. (शांति- १४०-४०) हेरांच्या योग्यतेसंबंधी काही मानदंड महाभारतात आले आहेत. हेर परचित्त परीक्षक व बुद्धिमान असावा. तहान, भूक व कष्ट सहन करण्याची शक्ती त्यांच्या अंगी असावी. प्रसंगी त्याला मुका. बहिरा, आंधळा इ. विविध रूपे वठविता आली पाहिजेत. शुक्रनीतिकार सांगतात की, हेर इंगित जाणणारा म्हणजे अंत:करणाचा ठाव घेणारा, माणसाची चर्या आणि हालचाल पाहून अचूक निदान करणारा व बुद्धिमान असावा. तो बोलण्यात चतुर असावा. देश, काल परिस्थितीचे ज्ञान त्याला अचूक असायला हवे. स्वामिनिष्ठा हेरांचा फार मोठा गुण आहे. शत्रुसैन्याच्या शिबिरात वावरणार्या हेरांना प्रसंगी प्राणाचे मोल देऊनही हा गुण टिकवावा लागतो, अन्यथा सारे राष्ट्र उद्ध्वस्त होण्याची भीती असते. या अनुषंगाने खालील उदा. उद्धृत करणे सयुक्तिक ठरेल, असे वाटते. बारा-तेरा वर्षांपूर्वी पाकिस्तानने भारताच्या रूपलाल नामक हेरास मुक्त करून भारताच्या सुपूर्द केले. (अर्थात भारत सरकारने परिपाठीप्रमाणे तो हेर असल्याचा इन्कार केला.) मुक्ततेच्या आधी २८ वर्षे रूपलाल यांनी पाकिस्तानी तुरुंगात क्रूर अत्याचार व हालअपेष्टा भोगल्या होत्या. टीव्ही अँकर बरखा दत्त यांनी घेतलेल्या मुलाखतीत, आपणात इतकी वर्षे अत्याचार सहन करण्याची शक्ती कुठून आली? अशी विचारणा केली. यावर रूपलाल यांनी दिलेले उत्तर स्तिमित करणारे आहे. त्यांनी सांगितले की, ‘‘भगवद्गीता मुखोद्गत असल्याने नेमाने ते त्याचे पठन करीत. यामुळे अत्याचार सहन करण्याचे व संतुलन कायम राखण्याचे बळ प्राप्त झाले.’’ ४) कौटिल्यनीती- कौटिल्याने आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात सांगितलेले हेरांचे प्रकार आणि त्यांची कामे याचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे- क) कापटिक- दुसर्यांची इंगिते जाणणारा प्रौढ विद्यार्थी. मंत्र्याने याला मुबलक पैसा व प्रतिष्ठा द्यावी. ख) उदास्थित : प्रथम संन्यास स्वीकारून नंतर गृहस्थाश्रमात येणारा. याने भटक्या साधूंना-संन्याशांना अन्न, वस्त्रे व निवारा देऊन आपल्यासारख्या हेरांची निर्मिती करावी. ग) गृहपतिक- बाह्यत: शेती करून गृहस्थजीवन जगणारा, पण गुप्तचराचे काम करणारा. घ) वैदेहक- ज्याचा व्यापार पूर्णपणे बसलेला आहे, असा व्यापारी दुकान थाटून हेराचे काम करतो. च) तापस वेशधारी- संपूर्ण मुंडन केलेला अथवा जटा वाढविलेला, पण वैराग्यशील नसलेला साधू. छ) सत्री- ज्यांना कोणीही नातेवाईक नाहीत पण ज्यांचे पोषण करणे आवश्यक आहे असे. तसेच भविष्य सांगणारे, जादूटोणा, वशीकरण, शकुनविद्या इ. ज्ञान असणारे लोक सत्री नावाने ओळखावे. ज) तीक्ष्ण- ज्यांना स्वत:च्या जीविताचा विचार नसतो आणि जे केवळ पैशासाठी हत्ती वा कोणत्याही क्रूर प्राण्याबरोबर टक्कर द्यायला तयार असतात त्यांना तीक्ष्ण हे नाव आहे. झ) रसद- गुप्तपणे विषप्रयोगाची कामे करणारा हेरवर्ग या नावाने ओळखला जातो. हे लोक निष्ठुर व स्नेहशून्य असतात. ५) शिवनीती- हेरांचे माहात्म्य छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगल्याप्रकारे जाणले होते. त्यांचे हेरखाते अत्यंत कार्यक्षम होते. उत्तरेकडील मुगल साम्राज्याप्रमाणेच दक्षिणेतील सर्व राज्यांतही त्यांचे हेर सतत संचार करीत असत. हेरांकडून शत्रूची संपूर्ण माहिती मिळविल्यानंतरच त्यांनी आपल्या सर्व स्वार्या सुरू केल्या. त्यांच्या या खात्याचा गौरव करताना एका समकालीन पाश्चात्त्य लेखकाने म्हटले आहे, ‘‘हा राजा आपल्या हेरांना भरपूर वेतन देत असे व त्यामुळे हे हेर शिवाजीस नक्की बातमी देत असत व त्यायोगे शिवाजीस यश मिळायला सोपे जात असे. पैसा देऊन मित्र कसे मिळवावे, हे शिवाजी उत्तम प्रकारे जाणत होते. हे मित्र त्यांना प्रत्येक तासाला वार्ता पुरवीत होते.’’ अफजल खानाच्या जावळीभेटीच्या प्रसंगी त्यांनी खानाच्या हालचालीची माहिती पुरविण्यासाठी नानाजी प्रभू मुसेखोरकर यास नेमले होते. तो दररोज रात्री फकिराच्या वेशात खानाच्या छावणीत भिक्षा मागत असे व तिथल्या सर्व खलबतांची माहिती महाराजांना पुरवीत असे. मुंबईतील इंग्रजांची माहिती काढण्यासाठी सुंदरजी प्रभू नामक हेराची महाराजांनी नेमणूक केली होत. बहिर्जी नाईक हा तर त्यांचा प्रसिद्ध हेर होता! बसूरच्या स्वारीत हेरांनी पुरविलेल्या माहितीप्रमाणे लूट मिळाली नाही म्हणून व खोटी वार्ता दिली म्हणून महाराजांनी एका हेराला ठार केले होते. हेरखाते हा राज्ययंत्रणेचा एक अपरिहार्य भाग आहे. (भा. संस्कृतिकोश- खंड १०) तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना पूर्णकालीन दुसरी सुरक्षा सेवा असावी, असे प्रकर्षाने जाणवल्याने १९६८ साली ‘रॉ’ची स्थापना केली. आय. बी.चे तत्कालीन उपसंचालक रामेश्वरनाथ काव यांनी नवीन संस्थेची ब्ल्यू प्रिंट सादर केली. त्यांचीच ‘रॉ’चे पहिले प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. ‘रॉ’ने आपले काम सुरवातीला मुख्य संस्थेची शाखा म्हणून २५० कर्मचार्यांबरोबर सुरू केले. ‘रॉ’ची स्थापना झाल्याच्या चार वर्षांच्या आत बांगला देश मुक्त करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. आतापर्यंत ‘रॉ’च्या नावे खालील यशस्वी मोहिमांची नोंद आहे : १) बांगलादेश-मुक्तीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. पाकिस्तान ३ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या अनेक विमानतळांवर हल्ला करणार, ही गुप्त माहिती ‘रॉ’ने सरकारला अगोदरच दिली होती. त्यामुळे आपले वायुदल हाय अलर्टवर ठेवून आपल्या विमानांचे व धावपट्ट्यांचे रक्षण करता आले. २) सिक्किमचा भारतात विलय १६ मे १९७५ रोजी झाला. या प्रक्रियेत ‘रॉ’ने मोलाची कामगिरी बजावली. ३) पाकिस्तानची अणुसंशोधन प्रयोगशाळा बलुचिस्तान प्रांतात कहुटा येथे आहे. पाकिस्तान युरेयिम परिष्कृत करत असल्याचा व अण्वस्त्रे निर्माण करत असल्याचा सुगावा प्रथम ‘रॉ’ला लागला. सदर शोध या भागातील कटिंग सलूनमधील केसांचे नमुने प्राप्त करून त्याचे पृथक्ककरण करून लावण्यात आला. ४) ‘मेघदूत मोहीम’ म्हणून ओळखल्या जाणार्या कारवाईमुळे पाकिस्तानने ताबा घेण्यापूर्वी आपण सियाचीनमधे मोक्याची शिखरे काबीज करू शकलो. यामुळे जगातील सर्वांत दुर्गम अशा भागावर वर्चस्व मिळवून चीन तसेच पाकिस्तान यांना शह देणे शक्य झाले. ५) ‘रॉ’च्या सक्रिय सहभागामुळे आयएसआयच्या पंजाबमधील हिंसक व विध्वंसक कारवायांना पायबंद घालणे शक्य झाले. ६) अफगाणिस्तानात तालिबानविरुद्ध लढण्यास नॉर्दन अलायन्सला केलेले सहकार्य बहुमोलाचे होते. ७) कारगिल युद्धादरम्यान ‘रॉ’ने जनरल मुशर्रफ व ले. ज. मो. अजीज यांच्या दरम्यान झालेले गुप्त दूरध्वनी संभाषण पकडले होते. सदर संभाषण बीजिंग व इस्लामाबाद या दोन शहरांतून झाले होते. त्यावेळेस जनरल मुशर्रफ चीनच्या सरकारी दौर्यावर होते. हे संभाषण जाहीर केल्याने आपण जगास पाकिस्तानच्या त्या युद्धातील प्रत्यक्ष सहभाचा ठोस पुरावा देऊ शकलो. ‘रॉ’च्या नावे अनेक पराक्रम व उपलब्धी नोंदविल्या असल्या, तरी अनेकदा ‘रॉ’बाबत विवादही झाले आहेत. अ) ‘रॉ’मधील काही वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकार्यांनी असे आरोप केले आहेत की, या संघटनेत झालेल्या राजकीय हस्तक्षेपाने व भ्रष्टाचाराने संघटनेत विद्रोह वाढू लागला आहे. ब) २००८ साली लैंगिक शोषणाच्या आरोपाची नीट दखल न घेतल्याबद्दल एका वरिष्ठ अधिकार्याने पंतप्रधान कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. क) २००९ साली सात अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी विरोध दर्शवीत रजेवर गेले होते. ड) ‘रॉ’वर सर्वांत गंभीर आरोप हा आहे की, ही संघटना भारतीय जनतेप्रती उत्तरदायी नाही. तसेच त्यांच्यावर फुटीरवादाचा व गुप्त कटांचा आरोप झाला आहे. यातील सर्वांत गंभीर दोन प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत- १) १९८० साली कोलंबोस्थित ‘रॉ’च्या अधिकार्याला सीआयने हनी ट्रॅप केले होते. २) २००४ मधे ‘रॉ’चा उच्चपदस्थ अधिकारी रबिंदरसिंग याने काश्मीरसंबंधी संवेदनशील माहिती अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआयएला हस्तांतरित केली. यानंतर त्याला सीआयएने नेपाळमार्गे अमेरिकेत पळून जाण्यास मदत केली. (संदर्भ- विकीपीडिया) या संदर्भात नुकत्याच उघडकीस आलेल्या अमेरिकेच्या माजी परराष्ट्र अधिकारी रॉबिन राफेल यांच्या प्रकरणाचा उल्लेख करणे समयोचित ठरेल. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप असून, एफबीआयतर्फे सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी त्या सीआयएमध्ये होत्या. राफेल बाईची नेमणूक १९९१ साली दिल्लीस्थित अमेरिकन दूतावासात सल्लागार म्हणून झाली. या बाईने काश्मीर मुद्यावर भारताला बराच त्रास दिला. काश्मीरचे भारतातील विलीनीकरण व सिमला कराराला त्यांचा विरोध होता. भारतीय राजकारण्यांच्या बोटचेप्या धोरणाचा फायदा घेत यांनी भारताविषयीच्या अमेरिकन धोरणास मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले होते. तसेच भारतीय गुप्तहेर संघटना पाकिस्तानला अस्थिर करत असल्याचा आरोप केला. भारतीय राजकीय नेतृत्वास याबाबतीत ठोस व निर्णायक भूमिका न घेता आल्याने गुप्तहेर संघटनांच्या मनोबलावर परिणाम झाला होता. भारताच्या गुप्तहेर संघटनांच्या यशापयशाचे अवलोकन करता खालील बाबी प्रकर्षाने उजागर होतात- अ) आपल्याकडे हेरगिरीबाबत विपुल साहित्य व सशक्त वारसा असतानाही संरक्षणाबाबत व धोरणनिश्चितीबाबत अनास्था आहे, अशी भावना रूढ झाली आहे. ब) राजकीय इच्छाश्तीचा अभाव असल्याने अशा संघटनांचा योग्य वापर होत नाही. किंबहुना त्यांचे मनोबल खालावण्याचीच कृती होते. १९७७ साली पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी रामेश्वरनाथ काव यांना दिलेली अपमानास्पद वागणूक व काही सरकारांनी ‘रॉ’कडे केलेले दुर्लक्ष, या बाबी देशाचा गौरव वाढविणार्या नक्कीच नव्हत्या. क) सरकार बदललल्यावर या संघटनांकडे पूर्वग्रहादूषितपणे बघण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण होते. ड) संरक्षण विषयाबाबत संसदेच्या विविध समित्यांमध्येही या संघटनांच्या कृतीबाबत व कार्यशैलीबाबत गंभीरपणे चर्चा होत नाही. यामुळे त्यांचे भारतीय जनतेप्रती असणारे उत्तरदायित्व अधोरेखित न झाल्याने अनेक दुर्गुणांचा शिरकाव होतो व बेपर्वाई निर्माण होते. अनेक महत्त्वपूर्ण देशांच्या गुप्तहेर संघटना आपापल्या देशांच्या हितरक्षणार्थ कार्यरत आहेत. याचा तपशील असा : अमेरिका सी.आय. ए. इंग्लंड एम.आय.-६ रशिया के.जी.बी. फ्रान्स डी.एस.टी. चीन सी.एस.आय.एस. पाकिस्तान आय.एस.आय. इस्रायल मोसाद भारत रॉ द. आफ्रिका बी.ओ.ओ.एस. सीआयए व आयएसआय यांच्या कारवायांबद्दल अनेकांनी ऐकले अथवा वाचले असेल. ९-११ ला अमेरिकेत अतिरेकी हल्ला झाल्यावर, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक द. श्री. सोमण यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. त्यांच्या मते, महाराष्ट्रात किती जिल्ह्यांत दुष्काळ पडला आहे याची अचूक माहिती राज्याचे प्रशासन कदाचित देऊ शकणार नाही. याउलट सीआयए मात्र याबाबतची माहिती अचूकपणे देऊ शकेल, अशी त्यांची क्षमता व ख्याती होती. असे असतानाही ९-११ च्या हल्ल्याचा सुगावा न लागल्याचे आश्चर्य व्यक्त केले होते. सध्याच्या घडीला इस्रायली गुप्तहेर संघटना मोसादकडे असलेली क्षमता, कौशल्य, क्रूरता, समर्पणभाव, व्यावसायिकता तसेच घातपात, अपहरण, हत्या या सर्व हातखंड्यांचा शिताफीने वापर करण्याचे तंत्र अन्य कोणत्या संघटनेकडे आहे असे वाटत नाही. १९६० च्या दशकात चीनने मध्य व उत्तर आफ्रिकेत आपले जाळे गुप्तहेर संघटना सीएसआयएसमार्फत पसरविले होते. त्यांची पाळेमुळे मोसादने अत्यंत क्रूरपणे खणून काढली. त्यांनी सीएसआयएसला शरण येण्यास भाग पाडले. चीनकडे असलेली रशियन गुप्तहेर संघटना केजीबीबाबतची गुप्त माहिती मोसादला हस्तांतरित करण्यास बाध्य केले व दोन साम्यवादी देशांत दरी निर्माण करण्याचे काम केले. त्यावेळेसच्या घाना देशात चिनी समर्थक राष्ट्रपती एन्क्रूमा चीनच्या सरकारी दौर्यावर असताना त्यांची सत्ता उलथविण्यात आली. यामागे मोसादचाच हात असल्याचे बोलले गेले. (संदर्भ- गिडॉन्स स्पाईज- दि सिक्रेट हिस्ट्री ऑफ दि मोसाद, पृ. २५० ले. गॉर्डन थॉमस) ‘रॉ’चे प्रथम प्रमुख रामेश्वरनाथ काव यांनी आदर्श हेर कसा असावा, याचा वस्तुपाठ आपल्या कृतीने घालून दिला आहे. बांगलादेश मुक्त करण्यात भारताचे तीन शिलेदार कारणीभूत होते. यातील श्रीमती इंदिरा गांधी व जनरल माणेकशॉ हे पडद्यासमोरील तर रामेश्वरनाथ काव हे पडद्यामागील शिलेदार होते! १९९६ साली बांगलादेश मुक्तीचे २५ वे वर्धापन वर्ष होते. यानिमित्त दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामेश्वरनाथ काव या कार्यक्रमात उपस्थित होते. परंतु, ते शेवटच्या रांगेत बसले होते. तेथील एका बांगलादेशीयाने त्यांना ओळखले. त्या इसमाने त्यांच्याजवळ जाऊन विनंती केली की, आपले स्थान मंचावर असायला पाहिजे. यावर त्यांचे उत्तर होते, ‘‘मी काहीच केले नाही. या श्रेयाचे धनी बांगलादेशी आहेत.’’ आपण ओळखले गेलो, याचे त्यांना वैषम्य वाटून, शांतपणे सभागृह सोडून जाणे त्यांनी पसंत केले. एप्रिल २०१४ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंजाबातील गुरुदासपूर येथील नरेंद्र मोदींच्या सभेत अनेक माजी गुप्तहेरांनी आपली कैफियत मांडणयाचा प्रयत्न केला. येथे नमूद करणे उल्लेखनीय ठरेल की, या देशास गुरुदासपूर जिल्ह्याने सर्वांत जास्त हेर दिले! त्यांच्यावर अशा प्रकारे आपल्या दुरवस्थेबाबत जाहीरपणे कैफियत मांडण्याची वेळ यावी, ही घटना देशासाठी लज्जास्पद आहे. मोदी सरकार या लोकांवर अशी वेळ यापुढे येऊ देणार नाही, अशी आशा आहे. अर्थात, याबाबत कोणत्याही जाहीर वाच्यतेची अपेक्षा देशाने न बाळगता सरकार आपले कर्तव्य पार पाडेल, असा आशावाद बाळगणे अनाठायी ठरणार नाही

No comments:

Post a Comment