ओबामांचा हिंदुस्थान दौरा नसता तर हिंदुस्थानात आगळीक करू नये असा दम अमेरिकेने पाकड्यांना भरला असता का? अमेरिकेचे हे ‘दाखवायचे दात’ पाकिस्तान ओळखून आहे. तेव्हा अमेरिका आणि ब्रिटनला पाकिस्तानने हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करू नयेत असे खरोखर वाटत असेल तर त्यांना फक्त दम देऊ नका, पाकड्यांचे हिंदुस्थानविरोधी शेपूट पिळा!
दम नको, शेपूट पिळा!
मुंबईवरील ‘२६/११’च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी झकी-उर-रेहमान लख्वी याला हिंदुस्थानच्या हवाली करावे असा दम अमेरिका आणि ब्रिटनने म्हणे पाकिस्तानला भरला आहे. दोन दिवसांपूर्वीही अमेरिकेने पाकिस्तानला असाच दम दिला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या २६ जानेवारीच्या हिंदुस्थान भेटीदरम्यान पाकिस्तानने हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करू नयेत. तशी आगळीक केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहे. खरे तर लख्वी याला हिंदुस्थानच्या ताब्यात द्या असे सांगणे काय किंवा ओबामा भेटीदरम्यान पाकड्यांनी वाकडे शेपूट हलवू नये असा दम भरणे काय, यात हुरळून जाण्यासारखे फार काही नाही. लख्वीला हिंदुस्थानच्या ताब्यात द्या अशी ब्रिटन—अमेरिकेची सूचना योग्यच आहे. किंबहुना हिंदुस्थानदेखील सातत्याने ती मागणी करीतच आला आहे. मात्र लख्वी काय किंवा ‘२६/११’चा दुसरा प्रमुख सूत्रधार हाफीज सईद याला ताब्यात देण्याची मागणी काय, पाकड्यांनी कायम आपल्या मागण्यांना केराचीच टोपली दाखवली आहे. किंबहुना, लख्वीला जामिनावर सोडण्याचे आदेश पाकिस्तानी न्यायालयाने गेल्या महिन्यात दिले होते आणि हिंदुस्थानच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार झाला होता. हिंदुस्थान सरकारने या निकालाविरोधात तीव्र आक्षेप घेतल्याने पाक राज्यकर्त्यांना लख्वी याला अद्याप तरी तुरुंगातच ठेवणे भाग पडले आहे. मात्र तेथील राज्यकर्त्यांचा हा ‘कणखर’पणा किती काळ राहील याचा भरवसा नाही. पेशावर हत्याकांड झाले नसते तर लख्वीदेखील त्या हाफीज सईदसारखा पाकिस्तानात आज मोकाट फिरताना आणि हिंदुस्थानविरोधी गरळ ओकताना दिसला असता. कारण सईद काय, लख्वी काय किंवा अन्य दहशतवादी काय, या सर्वांचे पोशिंदे पाकिस्तानी सरकार आणि लष्करातच बसलेले आहेत. त्यामुळे आज अमेरिका आणि ब्रिटनने सांगितले म्हणून लख्वीला पाकिस्तान आपल्या ताब्यात देईल,
‘२६/११’चा रेंगाळलेला खटला वेगाने चालवून आरोपींना शिक्षा ठोठावेल असे समजण्याचे कारण नाही. फार तर अमेरिकेने दम भरल्याने ओबामा भेटीच्यावेळी पाकड्यांचे दहशतवादी शेपूट कदाचित वळवळणार नाही. मात्र खरा प्रश्न त्यानंतरचाच आहे. कारण अमेरिकेचा दम ओबामा भेटीपुरताच आहे. ओबामांचा हिंदुस्थान दौरा नसता तर हिंदुस्थानात आगळीक करू नये असा दम अमेरिकेने पाकड्यांना भरला असता का? अमेरिकेचे हे ‘दाखवायचे दात’ पाकिस्तान ओळखून आहे. तेव्हा अमेरिका आणि ब्रिटनला पाकिस्तानने हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करू नयेत असे खरोखर वाटत असेल तर त्यांना फक्त दम देऊ नका, पाकड्यांचे हिंदुस्थानविरोधी शेपूट पिळा!
No comments:
Post a Comment