कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पानिपति॥
- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकी झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंझत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहीला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त - मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला - "दो मोती गलत, दस-बीस अश्रफात, रुपयोंकी गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे तर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गढ बाकि सब गढियॉ।" म्हणून लौकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचाच नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र; पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे "पराभूत" झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत"
No comments:
Post a Comment