खुन्यांना बक्षीस जाहीर करणारे जल्लाद!
पॅरिसमधील व्यंग्यचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयात रक्ताचा सडा पडला. जिहादी आतंकवादाने मशीनगनमधून गोळ्या घालत दहा पत्रकारांना काही कळण्याच्या आत मारून टाकले. दोन सुरक्षारक्षक बळी पडले. मात्र, या भयंकर घटनेचा म्हणावा तेवढा तीव्र निषेध भारतात झाला नाही. एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ऊठसूट गळे काढणारे आता तोंडाला सेक्युलर कुलूप लावून थंड बसले. दहा वर्षांपूर्वी काढलेले कार्टून त्यानंतर पाच वर्षांनी या साप्ताहिकाने पुन्हा छापले. त्याचा विरोध करण्यासाठी थेट माणसे मारण्याचाच मार्ग अवलंबिला गेला. ही मेलेेली माणसे साधी नव्हती. झुंझार पत्रकारिता करणारी होती. जीवनातील विसंगती शोधून त्यावर मार्मिक भाष्य करणारी होती. समाज हलविण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीमध्ये असते, हे तर सर्वमान्य आहे. मात्र, ज्यांच्या डोक्यात पंथवेड घुसलेले आहे त्यांना काय? त्यांच्या दृष्टीने त्यांचा पंथ सोडून अन्य पंथातील लोक काफरच! त्यांना जबरदस्तीने आपल्या मार्गावर आणणे किंवा न येतील तर त्यांना मारून टाकणे, इतकेच त्यांना माहीत. एकम् सत विप्रा बहु वदन्ति... असा संस्कार करणार्या किंवा
आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम्
सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति
हे त्यांना काय माहीत. मात्र, हे सर्व माहीत असूनही भारतातील स्वत: विद्वान, विचारवंत, पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी आता गप्प आहेत. हिंदुत्वाचा काहीही विषय आला की ही मंडळी धर्माधिष्ठित राज्य स्थापन करायला हिंदुत्ववादी निघाले आहे, असे किंचाळत गोंधळ घालतात. मात्र, आता ते गप्प आहेत.
पॅरिसच्या घटनेचा निषेध भारतातील प्रत्येकाने केला पाहिजे. अशी अपेक्षा होती की पत्रकारसंघ, एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे नाव घेत दूरान्वयाने हिंदुत्ववादी चळवळीतील संघटनांवर विनाकारण टीका करणारे आता निदान या घटनेचा निषेध करतील. मात्र, निषेधाचे फार कमी सूर उमटले.
निषेध तर नाहीच. मात्र, घडले ते उलटेच! उत्तर प्रदेशातील तथाकथित सेक्युलर बहुजन समाज पक्षाचे एक माजी मंत्री याकूब कुरेशी या महाशयांनी या पत्रकारांना ठार मारणार्यांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जर कोणी या खुनी कृत्याची जबाबदारी घेईल तर म्हणे हे याकूब महाशय त्यांना ५१ कोटी रुपयांचे इनाम देतील. इतके पैसे या महाशयांकडे कसे आणि कोठून आले? या पैशाचा त्यांनी कर भरला आहे काय? ताबडतोब भारतातील आयकर खात्याने यांच्या मुसक्या बांधून याचा जाब विचारला पाहिजे. ही चौकशी होईल तेव्हा होईल. मात्र, याकूब महाशयांच्या या घोषणेनंतर पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारे गप्प आहेत. पू. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची ऊठसूट भाषा करणारे आता चिडीचूप आहेत.
एम. एफ. हुसैन नावाचे एक चित्रकार भारतात होऊन गेले. या महाशयांनी हिंदू देव-देवतांची नग्न चित्रे काढली होती. विशेषत: ज्यांना हिंदू श्रद्धेने विद्येची देवता मानतात त्या सरस्वतीचे या उर्मट आणि बिनडोक चित्रकाराने नग्न चित्र काढले होते. एका चित्रपट अभिनेत्रीला, मी आईच्या जागी मानतो, असे आधी विधान केले आणि नंतर या अभिनेत्रीवर बैलाकडून बलात्कार असे चित्र या नराधमाने काढले होते. आधी आई मानून नंतर स्वत:ला मैकबुल म्हणजे बैल अशी कल्पना करून त्या बैलाकडून त्या आई मानलेल्या महिलेवर बलात्काराचे चित्र काढणारी ही विकृतीच म्हटली पाहिजे. या माणसाच्या असल्या विकृत चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले तेव्हा ज्यांच्या मनात देव-देवतांबद्दल श्रद्धा आहे, आई या प्रतीकाबद्दल जिवापाड प्रेम आहे अशा काही जणांनी एम. एफ. हुसैन यांच्या या भुक्कड चित्रप्रदर्शनाचा विरोध केला. त्यावर हा देशद्रोही चित्रकार म्हणाला की, मी देश सोडून जाईन.
इंग्रजांनी अंदमानच्या कराल दाढेत काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंधारकोठडीत टाकल्यानंतरही
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
असे गीत लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर कोणीकडे आणि हा चित्रांना विरोध होताच देश सोडून जाण्याची भाषा करणारा बेईमान, देशद्रोही कोणीकडे? वास्तविक याच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची मागणी करायला हवी होती. मात्र, या देशातील स्वत:ला बुद्धिवादी म्हणविणार्यांनी हुसेन याच्या या विकृत चित्रांना विरोध करणार्यांनाच शिव्यांची लाखोली वहायला सुरुवात केली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढायला आणि मातम करायला सुरुवात झाली. काहीही संबंध नसताना या घटनेचा रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषदेशी संबंध लावत बंदी घालण्याची मागणी करण्यापर्यंत या दीडशहाण्या लोकांची मजल पोहोचली.
अगदी तसाच प्रसंग आता घडतो आहे. काही लोकांनी दहा वर्षांपूर्वी काढलेल्या आणि आठ वर्षांपूर्वी पुनमुर्द्रण केलेल्या चित्राला विरोध करत बदला घेण्याची भाषा करत दहा पत्रकारांना ठार मारले. त्याबाबत हे अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाले तोंड लपवून बसले आहेत. या ठार मारणार्यांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा या देशातील एक मुडदेफरास करतो, तरीही त्यावर कोणी एक शब्द बोलायला तयार नाहीत. एरवी ऊठसूट भारतीय घटना, घटनेचे शिल्पकार पू. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण करणार्या मायावती आपल्याच पक्षाचा एक माजी मंत्री पत्रकारांचे मुडदे पाडणार्यांना ५१ कोटीचे बक्षीस निर्लज्जपणे जाहीर करतो, तरीही गप्प बसल्या आहेत.
या लोकांना महापुरुष फक्त स्वार्थासाठी हवे आहेत. राजकीय धुणी धुण्यासाठी आणि वैचारिक वैराचा कंड शमविण्यासाठी झुंडशाही करीत अभिव्यक्तिस्वातंत्र्यासारखे विषय फक्त किंचाळण्यासाठी हवे असतात की काय? एखाद्या साधू-संताने आपल्या आग्रहासाठी जर थोडी आक्रमक भाषा चुकून जरी वापरली, तर त्याचा दूरान्वयाने संबंध सगळ्या हिंदुत्ववादी चळवळीशी जोडत माफी मागा, असे ओरडण्यापासून सरकारने बंदी घालावी, अशी मागणी करण्यापर्यंत अनेक दिवस धिंगाणा घालणारे सगळे तमाम स्वयंघोषित पुरोगामी, विचारवंत, आजचा, कालचा आणि उद्याचा सवाल करणारे आता कोठे लपून बसले आहेत?
याचा एकच अर्थ आहे. मानवता, सेक्युलॅरिजम, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, जगण्याचा हक्क, मानवी हक्क ही सगळी तत्त्वे यांना दुरून, ओढून, ताणून हिंदुत्ववादी चळवळीला शिव्या देण्यासाठीच फक्त हवी असतात.
हम आह भी भरते है तो हो जाते हैं बदनाम
वो कत्ल भी करते हैं पर चर्चा नहीं होती
असा एक शेर आहे. हा शेर शब्दश: खरे करण्याचा चंग जणू या तमाम तथाकथित पुरोगामी, मल्टिकम्युनल लोकांनी बांधला आहे.
माणसे मारणार्यांचा निषेध करायचा नाही, माणसे मारणार्यांना ५१ कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा अत्यंत उर्मटपणे करणार्याच्या विरोधात एक शब्द काढायचा नाही. निरपराध लोकांचे गळे चिरणार्या नक्षलवाद्यांच्या विरोधात ब्र उच्चारायचा नाही. नक्षलवाद्यांचे समर्थन करत त्यांना बळ देणार्या बिनायक सेन सारख्यांना एखाद्या राज्यातील भाजपा सरकारने अटक केली, तर सगळ्या जगातून मानवी हक्काची ओरड करत दबाव आणायचा असले या कथित डाव्या, पुरोगामी, मल्टिकम्युनल लोकांचे चाळे आता लोकांनी ओळखले पाहिजेत. यांना रस्तोरस्ती, भेटतील तेथे अडवून जाब विचारला पाहिजे. यांना हातही न लावता यांच्याशी वैचारिक प्रश्न उपस्थित करत यांना यांच्या भूमिकेबाबत, भूमिका न घेण्याबाबत जाब विचारला पाहिजे.
यापेक्षाही महत्त्वाचे हे की जगात मानवतेला काळिमा फासणारा, कोणताही मुलाहिजा न ठेवता सभ्यतेला धोका उत्पन्न करणारा जिहादी दहशतवाद नंगा नाच घालतो आहे. सिरियात, पेशावरमध्ये, पॅरिसमध्ये अगदी अंगावर शहारे आणणार्या, मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणार्या घटना एकामागून एक घडत आहेत. या लाजिरवाण्या घटनेतील आरोपींना बक्षिसे देण्याचे निर्लज्ज आणि किळसवाणे प्रकारही धडधडीतपणे समोर येत आहेत. सज्जनशक्तीने या सर्वांच्या विरोधात एकत्र येण्याची गरज आहे. ज्यांची मने संवेदनशील असतील, ज्यांचे माणूसपण जिवंत असेल, त्या प्रत्येकाने या मुडदेफरासांच्या विरोधात आता धीटपणाने अभिव्यक्त होण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment