Total Pageviews

Friday 16 January 2015

केवळ संघटनांवर बंदी घालून उपयोगाचे नाही.. कडक आणि थेट कारवाई अपेक्षित

अमेरिकेनेच पुढाकार घ्यावा! केवळ संघटनांवर बंदी घालून उपयोगाचे नाही.. कडक आणि थेट कारवाई अपेक्षित आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे या वेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. त्याच पार्श्वकभूमीवर दहशतवाद्यांच्या कारवाया वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीमेपलीकडून सध्या अनेक कारवाया वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ठिणग्या पडत आहेत. भारताचे सैनिकही त्याला प्रत्युत्तर देत आहेत. सुमारे २00 दहशतवादी भारतात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले होते. पोरबंदरच्या दिशेने येणारी बोट तटरक्षक दलाने अडवली आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. मात्र, आता संपूर्ण जगाला हादरा देण्याच्या तयारीत ते आहेत. त्यामुळे भारतात सार्वजनिक ठिकाणी, शाळांमध्ये आपल्या नापाक इराद्यांना प्रत्यक्षात आणण्याचे काम करणार आहेत, असे चित्र आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे शाळेवर हल्ला करून मुलांना लक्ष्य केले ते पाहता दहशतवादी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हे आपल्यासमोर आहे. त्यामुळे आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. तो हाणून पाडला पाहिजे. जनरला ऑफिसर कमांडर १६ कोरचे कमांडर जनरल के. एच. सिंग यांनी स्पष्ट केले आहे की, हे दहशतवादी दहशत पसरवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून पाकिस्तानने मुद्दामहून ३६ लाँच पॅड तयार केले आहेत. या लाँच पॅडचा उपयोग वॉर रूमसारखा केला जातो. पाकिस्तान भारतात दहशतवाद्यांना पाठवून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रय▪करत आहे; परंतु संपूर्ण जगाला भयभीत करायचे असेल तर अमेरिकेचे अध्यक्ष भारतात असताना केले तर त्याचा परिणाम मोठा होईल, असे त्यांना वाटत असावे. अमेरिकेने पाकिस्तानला अगोदरच या दहशतवादी संघटनांना आळा घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने नाईलाजाने का होईना; पण जमात-उद-दावासह सुमारे १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची तयारी जोरात केली आहे. नुकतेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानला दहशतवादाविरोधात नरमाईची भूमिका घेऊ नये, असे सांगितले आहे. अमेरिकेनेही आतापर्यंत पाकिस्तानला हरेक प्रकारे मदत केली आहे, मात्र ही मदत पायाभूत सुविधांसाठी होण्याऐवजी नको त्या गोष्टींवरच खर्च होते की काय? अशी शंका येऊ लागली आहे. खरे तर पेशावर येथे झालेल्या मोठय़ा दहशतवादी हल्ल्यानंतरच पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. अमेरिकेने आतापर्यंत मदत केली असली तरी पाकमध्ये दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. जरी या दहशतवादी संघटनांवर पाकने बंदी घातली असली तरी त्यांच्या कारवाया थांबतील काय? हा प्रश्न आहे. भारताने आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांच्या विरोधात पाकला पुरावे दिले; परंतु पाकने मात्र त्यावर काहीही कारवाई केली नाही. उलट ते दहशतवादी बिनधास्त फिरत आहेत. उद्याही या १२ संघटनांवर बंदी घातल्यानंतर त्यांच्या कारवाया थांबतील असे पाकिस्तान छातीठोकपणे सांगू शकेल काय? एकूणच पाकिस्तानला अमेरिकेने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी आणि पाकने केवळ कारवाईचे नाटक केले असले तरी अमेरिका त्यांची मदत काही थांबवणार नाही, हे सत्य आहे. अमेरिकेने आपल्या देशावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला..आता संपूर्ण जगात पाकिस्तानच्या आशीर्वादाने जे काही दहशतवादी हल्ले होत आहेत त्यांना कोण आवरणार! केवळ संघटनांवर बंदी घालून उपयोगाचे नाही.. कडक आणि थेट कारवाई अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment