Total Pageviews

Monday, 26 January 2015

PRESIDENT OBAMA INDIA VISIT

चलें साथ साथ... अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भारत भेट आणि उभय नेत्यांनी व्यक्त केलेला अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर परस्परसंबंध वाढीचा मानस, येणार्‍या काळात अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, यात शंका नाही. पंतप्रधान मोदींनी अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत अशी काही जादू केली की, आज प्रत्येकच देश भारतासोबत संबंध वाढविण्यासाठी आतुर आहे. मजबूत परराष्ट्र धोरणामुळेच हे शक्य झाले आहे. अनेक देशांसोबत परराष्ट्र संबंध सुधारले आहेत. कारण, मोदींकडे स्वबळावर बहुमत तर आहेच, खंबीरपणे निर्णय घेण्याची क्षमता आणि दूरदृष्टी आहे. ही क्षमता त्यांनी वेळोवेळी लक्षातही आणून दिली आहे. भारताच्या विदेशी गंगाजळीत भरीव वाढ हे एकमेव वास्तव, मोदी सरकार आर्थिकदृष्ट्या भारताला किती सक्षम करण्याची मनीषा बाळगून आहे, त्याचे द्योतक आहे. मोदी सरकारकडे आज प्रत्येकच क्षेत्रात अनुभवी व तज्ज्ञ लोक आहेत. अनेक वर्षे नरेंद्र मोदींना व्हिसा नाकारणारे अमेरिकेचे राष्ट्रपती, भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण स्वीकारतात, यातच मोदींच्या जादूचा प्रभाव अधोरेखित झाला आहे. विरोधकांनीही (डाव्यांना सोडून) मोदींच्या या करिष्म्याची दाद दिली आहे. भारताने आज दक्षिण आशियातील एक शक्तिशाली देश म्हणून आपली ओळख जगात निर्माण केली आहे. अमेरिकेच्या नजरेतून हे कसे सुटणार? नरेंद्र मोदी हे अमेरिका भेटीवर गेले असताना, त्यांचे झालेले अभूतपूर्व स्वागत अमेरिकेने डोळ्यांत साठवून ठेवले नसते तरच नवल. मोऽदीऽ... मोऽदीऽ... करणारे अमेरिकन जनमानस पाहून एक नवा भारतीय अवतारच जणू आपल्या देशात अवतरला की काय, अशी प्रतिक्रिया अमेरिकन वृत्तपत्रे आणि राजकीय पंडितांनी त्या वेळी व्यक्त केली होती. या सर्व बाबी ओबामांना प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून आमंत्रण स्वीकार करण्यास कारणीभूत ठरल्या. रविवारी बराक ओबामांचे भारत भेटीवर आगमन झाले, तेव्हा राजशिष्टाचार बाजूला ठेवून मोदींनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. एवढेच नव्हे, तर स्वत: ओबामांनी मोदींची गळाभेटही घेतली. ही एकच बाब मोदी-ओबामांच्या मैत्रीचा संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. ओबामांना मानवंदना देण्यासाठी परंपरागत पद्धती बाजूला ठेवून विंग कमांडर पूजा ठाकूर यांची निवड करणे, यातून महिलांना भारतात आदर राखून समान दर्जा दिला जातो, हे मोदींनी देशाला आणि जगालाही दाखवून दिले. मन स्वच्छ असेल तर भारताची संस्कृती गौरवाच्या किती उच्च शिखरावर नेऊन ठेवता येते त्याचे हे उदाहरण. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उभय नेत्यांनी स्वतंत्र चर्चा केली. त्या वेळी अनेक मुद्यांवर ‘चाय पे चर्चा’ झाली. ती उघड करण्यास उभय नेत्यांनी नकार दिला असला, तरी मोदी-ओबामांच्या संयुक्त पत्रपरिषदेत भारत आणि अमेरिका कोणकोणत्या मुद्यांवर परस्परसंबंध आणि परस्परसहकार्य करू इच्छितात, हे जाहीर झाले. अन्य सर्व विषयांपेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा विषय म्हणजे जगात वेगाने फोफावत चाललेला दहशतवाद! या दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अमेरिकेपेक्षा भारत दोन पावले समोर आहे, हे मोदींनी अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रसंघ आणि ब्राझीलमधील परिषदेत जाहीर रीत्या अधोरेखित केले होते. ही बाब जगाच्या नजरेतून सुटली नाही. योगासारख्या व्यायामाला जागतिक अधिष्ठान प्राप्त करून द्यावे, अशी विनंती मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात केली आणि १७० देशांनी त्यावर शिक्कामोर्तब केले! त्यात ४० देश हे मुस्लिम होते, हे येथे उल्लेखनीय! मोदींची ही जादू गारुडासारखी जगाला आपल्या कवेत घेत होती आणि देश या घडामोडी पाहत होता. त्यातूनच भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळावे, ही बाब जगाला भावू लागली. अनेक देशांनी भारताची ही मागणी मान्य केली असतानाच, आता अमेरिकाही पुढे सरसावली आहे. असे झाले तर भारताला संयुक्त राष्ट्रसंघात मोठी ताकद प्राप्त होणार आहे. सध्या अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटन हे पाचच देश स्थायी सदस्य आहेत. त्याचा विस्तार व्हावा, अशी मागणी मोदींनी लावून धरली आहे. सदस्यत्व मिळाल्यास भारतालाही ‘व्हेटो’चा अधिकार मिळणार आहे. अमेरिकेने भरीव आश्‍वासन दिल्यानंतर आगामी काळात भारतही स्थायी सदस्यांच्या यादीत समाविष्ट होईल, अशी आशा बळावली आहे. दहशतवादाच्या समस्येचे निर्दालन आपण एकट्याने करू शकणार नाही, याची जाणीव अमेरिकेलाही झाली असणार. त्यात खरा आणि प्रामाणिक मित्र म्हणून भारताकडे ओबामांची नजर आहे. एका बाबीचा उल्लेख येेथे करावाच लागेल. पं. नेहरूंनी चीनला स्थायी सदस्यत्वासाठी मंजुरी दिली असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला प्रखर विरोध दर्शविला होता. चीन हा भारताचा कधीही मित्र होऊ शकत नाही, हे आंबेडकरांनी नेहरूंना ठणकावून सांगितले होते. पण, कम्युनिस्टांच्या कच्छपी लागून नेहरूंनी चीनची तळी उचलली आणि नंतर चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला, हे वास्तव सर्वज्ञात आहे. त्याच वेळी आंबेडकरांनी हेही सांगितले होते की, अमेरिकेला डावलून केवळ साम्राज्यवादी चीन व रशियाला जवळ केल्यास आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम होईल. पण, नेहरूंनी आंबेडकरांचे ऐकले नाही. त्याचा जो परिणाम व्हायचा तो झाला. अमेरिकेने पाकिस्तानला जवळ केले. आपले नाविक तळ पाकिस्तानात उभे केले. अगदी १९७१ च्या युद्धात अमेरिकन वैमानिकांनी पाकिस्तानी लढाऊ विमानचालकांना प्रशिक्षण दिले होते, हाही इतिहास फारसा जुना नाही. आज काळ बदलला आहे. अतिशय मजबूत असे परराष्ट्रसंबंध मोठ्या देशांसोबत वृद्धिंगत करण्यावर मोदींचा भर दिसत आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे. कम्युनिस्ट पक्षाचे लोक ओबामांना विरोध करण्यासाठी निदर्शने करणे, यातच या लोकांना भारताबाबत आस्था नाही, तर चीन आणि रशियाबाबत आहे, हेही उजागर झाले आहे. रशियाचे तुकडे पडले तरी कम्युनिस्टांना अजून अक्कल आलेली दिसत नाही! संयुक्त पत्रपरिषदेत बराक ओबामा यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभच ‘मेरा प्यारभरा नमस्कार’ या वाक्याने करून भारतीयांची मने जिंकून घेतली, तर शेवट ‘चलें साथ साथ’ या वाक्याने केला. उभय नेते अगदी मनमोकळेपणाने बोलले. ओबामांच्या देहबोलीवरून हे स्पष्टपणे जाणवत होते; तर मोदी भाषणाच्या प्रारंभी म्हणाले, ‘‘राष्ट्रपती ओबामाजी, आपण प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या विनंतीचा स्वीकार केला, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.’’ ओबामा म्हणाले, ‘‘अमेरिका आणि भारत मैत्रीचा नवा अध्याय घोषित करीत आहेत. अणुकरार हा दोन्ही देशांसाठी आवश्यक आहे आणि आता कोणतीही आडकाठी त्यात येणार नाही,’’ हेही ओबामांनी जाहीर केले. संरक्षण दलासाठी अनिवार्य अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रणाली संयुक्तपणे विकसित करणे, अमेरिकेसोबतच व्यापार ६० टक्क्यांनी वाढविणे, उभय देशांतील जनतेचे संबंध वृद्धिंगत होण्यासाठी संयुक्त प्रयत्न आणि उभय देशांचे परराष्ट्रसंबंध अधिकाधिक वृद्धिंगत होण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून परराष्ट्र धोरणाला सर्वोच्च प्राधान्य, अशा काही बाबी ओबामांनी स्पष्ट केल्या. मोदी माझ्यापेक्षा कमी झोप घेतात, ही बाब मी मोदींना चर्चेदरम्यान आवर्जून विचारली, असेही ओबामा म्हणाले. एकूणच उभय देशातील सामरिक, आर्थिक, तंत्रज्ञान, अणु, व्यापार, दहशतवाद, परराष्ट्र धोरण अशा महत्त्वाच्या मुद्यांवर परस्पर सहकार्याचे स्पष्ट संकेत देत असतानाच, उभय नेत्यांनी वैयक्तिक गुणांवरही आपल्या भाषणात भर देणे, ही बाबही वेगळाच संकेत देऊन गेली. अमेरिकेने खर्‍या अर्थाने भारताला मित्र मानले आणि तशी कृती केली, तर आयएसआयएस, बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांना आणि चीन, पाकिस्तानसारख्या आडमुठ्या देशांना वठणीवर आणण्यासाठी वेळ लागणार नाही

No comments:

Post a Comment