Total Pageviews

Friday, 30 January 2015

ऑनलाइन जिहाद :सद्यस्थिती आणि उपाययोजना-ब्रिगेडियर हेमंत महाजन

ऑनलाइन जिहाद :सद्यस्थिती आणि उपाययोजना ब्रिगेडियर हेमंत महाजन ताज्या अंदाजाप्रमाणे हिंदुस्थानात हजारो युवक आपल्या घरातून गायब झालेले आहेत. त्यामधले दोन टक्के युवक जरी जिहादी प्रचाराला बळी पडून बाहेर गेले असतील तरीही हा धोका खूप आहे. हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या अभ्यासांतर्गत मुस्लिम युवक दहशतवादी का होतात, या पाठीमागचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि दहशतवाद पसरवणार्‍या संघटनांमध्ये भरती करण्यासाठी अनेक हिंदुस्थानी संस्था प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करतात. त्यासाठी युवकांचा बुद्धिभ्रंश केला जातो हे होय. अजून एक तरुण जो इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्याकरिता इराककडे जाण्याच्या वाटेवर होता, त्याला आपल्या गुप्तहेर संस्थांनी हैदराबाद विमानतळावर रोखले. कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये जाण्याकरिता पळून गेले होते. त्यामधल्या एका तरुणाने २६ जानेवारीला स्फोटके भरलेल्या कारने हिंदुस्थानात अमेरिकन राष्ट्रपतींवर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली. हे सगळे ऑनलाइन जिहादला बळी पडले होते. त्यामुळे इंटरनेटवर किंवा ऑनलाइन जिहादचा प्रसार कसा केला जातो, त्याला तरुण कसे बळी पडत आहेत हे शोधणे महत्त्वाचे आहे. एकदा बुद्धिभ्रंश झाला की, त्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर एका मोठ्या दहशतवादी संघटनेमध्ये ट्रेनिंगसाठी इराण, अफगाणिस्तान, सीरिया किंवा पाकिस्तानमध्ये पाठवले जाते. सुरुवातीला त्यांना प्रशासकीय कामे दिली जातात. त्यानंतर जर लक्षात आले की, तो युवक एक कट्टर दहशतवादी बनू शकतो तरच त्याला बॉम्बस्फोट करणे, आत्मघातकी हल्ला करणे अशा जबाबदार्‍यांसाठी तयार केले जाते. अनेकदा संपर्कात आलेल्या ४० ते ४५ टक्के युवकांना बळजबरीने दहशतवादी संघटनेत पाठवले जाते. ३० ते ३५ टक्के युवक आर्थिक कारणामुळे दहशतवादाचा रस्ता पकडतात. दहशतवादी संघटनेत सामील झाले की, त्यांना खूप पैसे मिळतात. नोकरी केल्यासारखा त्यांना पगार दिला जातो. एखादी मोठी दहशतवादी कारवाई केली तर जास्त पैसा मिळतो. ३० ते ३५ टक्के लोक धार्मिक कट्टरतेमुळे दहशतवादी बनतात. सध्या ऑनलाइन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये दुष्प्रचार सुरू आहे. यात त्यांच्या धर्मावर किती अन्याय, कसा हल्ला केलेला आहे हे दाखवले जाते. म्हणून अशा प्रकारच्या दुष्प्रचाराला इंटरनेटवरूनच प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. वेबसाईटस्, ब्लॉग्ज स्पॉटस्, ट्विटर अकाऊंटस्, ई मेल आणि एसएमएसने अशा प्रकारचा दुष्प्रचार केला जातो. इंटरनेटवरील अशा साधनांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गुगल व इंटरनेट कंपन्यांची मदत घेऊन त्यांना ‘ब्लॉक’ करणे आवश्यक आहे. बहुतेक दहशतवाद्यांच्या मनावर अतिरेकी विचाराचा प्रभाव तात्पुरता झालेला असतो. अनेकांना आयुष्यामध्ये फारसे यश मिळत नाही म्हणून बंदुकीच्या बळावर त्यांना समाजामध्ये मिळालेले स्थान महत्त्वाचे वाटते. बहुतेक युवक हे २० ते ३० वयोगटामधले असतात, लग्न झालेले नसते. काहीतरी कारणावरून त्यांच्या कुटुंबाशी फारकत झालेली असते. आपण जर अशा युवकांकडे लक्ष ठेवले, आर्थिक सहाय्य आणि मानसिक बळ दिले, त्यांच्या विचारसरणीमध्ये सुधारणा केली तर दहशतवादाकडे झुकणार्‍या युवकांवर प्रभाव टाकणारे घटक आपण नक्कीच कमी करू शकतो. अर्थात त्यासाठी गरज आहे ती आर्थिक आणि मानसिक लढाई जिंकण्याची. दहशतवादाचे स्वरूप हे कायम बदलत असते. त्यामुळे त्यावरील उपाययोजना सक्षम, तत्पर आणि परिस्थितीनुरूप बदलणार्‍या पाहिजेत. आपल्याला दहशतवादाचा प्रसार करणार्‍या यंत्रणांच्या एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे. डिसेंबरमध्ये विविध राज्यांच्या डीजीपींची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात ऑनलाइन जिहादवर विचार करण्यात आला आणि दुष्प्रचार थांबवण्याकरिता एक ऍक्शन प्लॅन करण्याकरिता सांगण्यात आले. इंटरनेटची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे एखाद् दुसरी संस्था त्यावर लक्ष ठेवू शकत नाही. गरज आहे ती या सगळ्या संस्थांसह इतर देशभक्त नागरिकांचासुद्धा आपण लक्ष ठेवण्याकरिता वापर केला पाहिजे. आज एकट्या हिंदुस्थानमध्येच जवळजवळ २० कोटींहून जास्त नागरिक इंटरनेटचा वापर करत आहेत. फेसबुक आणि इतर सोशल मीडियामध्ये असलेल्या युवकांची संख्यासुद्धा प्रचंड आहे. म्हणून अशा प्रकारे जे चॅटिंग इंटरनेटवर चालते त्याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज ‘यू ट्यूब’वर अनेक प्रक्षोभक व्हिडीओज् अपलोड केले जातात. अशा प्रकारचे इंटरनेटवरील व्हिडीओज्, चुकीची आणि भडक माहिती देणारे लेख लगेच ब्लॉक करायला हवेत. इतर देशांमध्ये एखादा युवक जर ऑनलाइन जिहादमध्ये पकडला गेला तर लगेच त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येते. दुर्दैवाने त्यांची संख्या हजारो असल्यामुळे त्यातील प्रत्येकावर लक्ष ठेवणे कठीण आहे. मात्र अशा वेळी गरज असते ती त्याच्या कुटुंबाने, त्याच्या नातेवाईकांनी त्याच्यावर नजर ठेवण्याची. कारण २४ तास कुठल्याही युवकावर गुप्तहेर संस्थाही लक्ष ठेवू शकत नाही हेही आपण विचारात घेतले पाहिजे. ‘ऑपरेशन चक्रव्यूह’! आज अनेक संस्था ऑनलाइन रिक्रूट झालेल्या युवकांना हिंदुस्थानातच अतिरेकी बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही धार्मिक संस्था आणि तेथील धार्मिक नेते अशा प्रकारचे प्रशिक्षण या युवकांना हिंदुस्थानमध्येच देतात. परदेशातून, विशेषत: सौदी अरेबियामधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दहशतवाद पसरवण्याकरिता हिंदुस्थानमध्ये येत आहे. तो थांबवला पाहिजे. हिंदुस्थानमधील काही धार्मिक स्थळेदेखील इस्लामी दहशतवाद वाढविण्याकरिता पैसे खर्च करतात. म्हणून प्रचंड उत्पन्न असलेल्या अशा धार्मिक स्थळांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. सोशल मीडियामध्ये ऑनलाइन चॅट करण्याकरिता वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. गरज आहे ती अशा प्रचारावर लक्ष ठेवण्याची. गृहमंत्रालयाने ‘ऑपरेशन चक्रव्यूह’ नावाचे एक नवीन ऑपरेशन सध्या इंटरनेटवर सुरू केलेले आहे. याचा उद्देश आहे की, अशा प्रकारच्या युवकांवर लक्ष ठेवणे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या युवकांवर लक्ष ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या अनुभवाचा वापर करून आपण सुधारणा करायला हवी.

No comments:

Post a Comment