Total Pageviews

Saturday, 24 January 2015

भारताची गुप्तचर यंत्रणा 'रॉ'ने राजपक्षे पराभूत व्हावेत, यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

८ जानेवारी या दिवशी श्रीलंकेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि गेली दहा वर्षे तेथे सत्ता गाजवणारे महिंदा राजपक्षे पराभूत झाल्याचे वृत्त समोर आले. भारतियांसाठी ही एक सामान्य बातमी होती; मात्र त्यानंतर थडकलेले वृत्त लोकांच्या भुवया उंचावणारे होते. भारताची गुप्तचर यंत्रणा 'रॉ'ने राजपक्षे पराभूत व्हावेत, यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, अशा बातम्या वृत्तसंकेतस्थळांवर येऊ लागल्या. हे वृत्त चुकीचे असल्याचे भारत शासनाने तत्परतेने सांगितले असले, तरी भारतातील आणि श्रीलंकेतील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'रॉ' ही भारताची विदेशात कार्यरत असणारी गुप्तचर यंत्रणा. ही नेमकी कशी कार्य करते, कुठे कुठे कार्य करते, याविषयी लोकांना अधिक ठाऊक नाही; मात्र श्रीलंकेत 'रॉ'ने जे केले, ते कुठल्याही भारतियाला अभिमान वाटावा, असेच आहे. एका गुप्तचर यंत्रणेने एका देशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करून स्वतःचा हेतू साध्य करून घेणे, हे तसे मोठे यश मानायला हवे. राजपक्षे यांना हरवून राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झालेले मैत्रीपाल सिरिसेना यांना भारताशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध दृढ करायचे आहेत, असे त्यांनी घोषित केलेले आहे. ते सत्तेवर येणे, हा भारतासाठी सुखद पालट आहे. चीनधार्जिणे महिंदा राजपक्षे ! राजपक्षे वर्ष २००५ मध्ये सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी चीनशी सलगी वाढवण्यास आरंभ केला. दहा वर्षांच्या त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी ७ वेळा चीनचा दौरा केला. यावरून त्यांचे चीनशी असलेले घनिष्ठ संबंध दिसून येतात. ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर भारताशी असलेल्या कराराचे उल्लंघन करून त्यांनी चिनी पाणबुड्यांना श्रीलंकेच्या बंदरावर थांबण्याची अनुमती दिली. असे एकदा नव्हे, तर दोनदा घडले. श्रीलंकेला हाताशी धरून चीनने दक्षिण आशियामध्ये हातपाय पसरणे चालू केले होते. हिंदी महासागरात स्वतःचे बस्तान मांडून भारताला घेरण्याचा त्याचा डाव होता. श्रीलंकेला स्वतःच्या कह्यात ठेवण्यासाठी चीनने कोट्यवधी डॉलर्स तेथील विकासकामांमध्ये गुंतवले आहेत. यामुळे राजपक्षे भारताऐवजी चीनकडे झुकले होते. भारतासाठी ही मोठी डोकेदुखी होती; कारण भारतासाठी संरक्षणदृष्ट्या श्रीलंकेला महत्त्वाचे स्थान आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनधार्जिणे राजपक्षे यांचा सत्तेतून पायउतार होणे आवश्यक होते. राजपक्षेंना हटवण्यासाठी रचलेले जाळे ! सलग दोन वेळा निवडून आलेले राजपक्षे तिसर्‍या वेळीही निवडून येणार, असे राजकीय तज्ञांचे मत होते. राजपक्षेंची एकाधिकारशाही आणि भ्रष्टाचार याला जनता कंटाळली होती; मात्र त्यांना पर्यायी असा दुसरा सक्षम नेता लोकांसमोर नव्हता. श्रीलंकेतील भारताच्या परराष्ट्र कार्यालयात कार्यरत असणार्‍या 'रॉ'च्या प्रतिनिधीने सर्व विरोधी पक्षांना संघटित केले. विरोधी पक्षांनी राजपक्षे यांच्या विरोधात रानिल विक्रमसिंघे यांना उभे केले होते; मात्र ते निवडून येणार नाहीत, असे चित्र होते. हे जाणून 'रॉ'च्या सदस्याने सिरिसेना यांचे नाव सुचवले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मन वळवले आणि सिरिसेना यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडणुकीच्या एक महिना आधी राजपक्षे यांना या 'रॉ'च्या प्रतिनिधीविषयी माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याविषयी भारताच्या दूतावासाकडे तक्रार केली. त्यामुळे त्या प्रतिनिधीला भारतात पाठवण्यात आले. असे असले, तरी जाण्याआधी त्या प्रतिनिधीने आपले काम केले होते ! कठोर परराष्ट्र धोरण राबवणे आवश्यक ! सिरिसेना निवडणूक जिंकल्यानंतर श्रीलंकेतील भारतीय दूतावासातील राजदूतांनी त्यांची त्वरित भेट घेऊन त्यांना मोठा पुष्पगुच्छ भेट दिला; मात्र चिनी राजदूतांना त्यांची भेट घेण्यास सहा दिवसांचा अवधी लागला. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच सिरिसेना यांनी श्रीलंकेत अटकेत असलेल्या ४५ मच्छीमारांची सुटका केली, तसेच पहिल्या विदेश दौर्‍याच्या निमित्ताने भारताचा दौरा करणार असल्याचे घोषित केले. यावरून सिरिसेना हे चीनशी नव्हे, तर भारताशी जवळीक करू इच्छितात, हे स्पष्ट आहे. काँग्रेस शासनाच्या काळात भारताच्या परराष्ट्रनीतीचे तीन तेरा वाजले होते. त्यामुळे श्रीलंकेसारखी छोटी राष्ट्रेही भारताला दरडावू लागली होती. वारंवार भारतीय मच्छीमारांना अटक करून श्रीलंका भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे नवनिर्वाचित भाजप शासनाला परराष्ट्र नीतीमध्ये धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी नेपाळ, भूतान आदी शेजारी राष्ट्रांचा दौरा करून त्यांच्याशी मैत्रीचे आणि विश्‍वासाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष चीनधार्जिणे असल्यामुळे भारत-श्रीलंका यांच्या नात्यात आलेला कोरडेपणा जात नव्हता. राजपक्षे यांच्या जाण्यामुळे दोन्ही देशांमधील हा कोरडेपणा जाऊन चांगले संबंध प्रस्थापित होतील, अशी आशा आहे. शत्रू बधत नसेल, तर साम, दाम, दंड आणि भेद नीती वापरणे आवश्यक आहे. 'रॉ'ने जे केले, ते याच नीतीच्या आधारावर केले; मात्र यामुळे 'रॉ'कडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्याच्यासमोरील आव्हानेही मोठी आहेत. भविष्यात 'रॉ'ने अशा सुरस कारवाया कराव्यात आणि त्या लोकांना ऐकण्यास मिळाव्यात, अशी अपेक्षा करूया !

No comments:

Post a Comment