अतिरेक्यांचे लक्ष्य - शिक्षणसंस्था-VSANT KANE
पेशावरचे शालेय हत्याकांड झाले आणि केंद्र शासनाने शिक्षण संस्थांना उद्देशून एक परिपत्रक संबोधित केले आहे. खरे तर यापूर्वीही केंद्र शासनाच्या गृहखात्याने देशातील विविध शिक्षण मंडळांना, विद्यापीठांना आणि शिक्षणसंस्थांना एक परिपत्रक पाठवून सावध राहण्याचा इशारा दिल्याला आता तसा बराच काळ उलटून गेला आहे. त्यामुळे ही गोष्ट ‘आपल्या’ स्वभावानुसार आता आपण विसरूनही गेलो असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे प्रसंग अधूनमधून घडतच असतात. मोठ्या मोठ्या शहरांत अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात, असे म्हणून चालण्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही.
या लेखात ज्या परिपत्रकाचा उल्लेख केला आहे त्याच्या प्रती विद्यापीठे, शिक्षण मंडळे, नवोदय विद्यालये, राज्यांचे शिक्षण संचालक आणि महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रमुख यांना पाठविण्यात आल्या आहेत. पण अनेकदा अशी पत्रके नजरेआड होतात. अतिरेकी हल्ल्यांच्या वार्ता नेहमीच कानावर पडत असल्यामुळे अनेकदा त्याचे गांभीर्यही हळूहळू कमी होत जाते.
परंतु असे होता कामा नये. समर्थ रामदास स्वामींचे वचन प्रत्येकाने आपल्या मनावर कोरून ठेवले पाहिजे. समर्थांचे हे वचन आहे- ‘नित्य चित्ती सावधान असावे.’ ‘इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी.’ (स्वातंत्र्यासाठी सतत सावध राहण्याचे मूल्य चुकवावे लागते) असे म्हणतात, ते काही खोटे नाही. नित्यसिद्धता आणि जोडीला सावधगिरी बाळगून असलेली राष्ट्रेच आपले स्वातंत्र्य अबाधित राखू शकतात. ही बाब तरुण, उगवत्या पिढीच्या मनावर बिंबवण्याची संधी या निमित्ताने आपल्याला लाभली आहे, अशी सकारात्मक भूमिका बाळगणे आणि तसे संस्कार बाल आणि तरुण मनावर करणे, ही आजच्या युगाचीच अपरिहार्यता आहे, असे मानून आपल्याला पुढे गेले पाहिजे.
चोख उपाययोजना हवी
अतिरेक्यांच्या संभाव्य लक्ष्यांची नोंद गृहखात्याने या अगोदरच केलेली आहे. वेळोवेळी होणार्या आपल्या देशातल्या आणि इतर देशातल्या हल्ल्यांचा अभ्यास करून ही यादी अद्ययावत करण्याचा शासनाचा प्रयत्नही असतो. दरवेळी एखादे ‘अनपेक्षित आणि नवे लक्ष्य’ शोधायचे आणि बेसावध गाठून हल्ला करून पसार व्हायचे. हा अतिरेकी हल्ल्यामधला एक प्रकार मानला जातो. अतिरेक्यांच्या यादीत शिक्षण संस्थाही आहेत, हे कळून बरेच दिवस झाले आहेत, पण या ‘खबरीकडे’ आपण पुरेसे लक्ष दिलेले दिसत नाही. काही वर्षांपूर्वी
रशियामध्ये चेचन्याच्या बंडखोरांनी एका शिक्षण संस्थेवर हल्ला करून अनेक विद्यार्थ्यांची हत्या केली होती आणि इतर अनेकांना ओलिस म्हणून बंदिस्त केले होते. शेवटी त्यांना हुसकावून लावण्यासाठी सैन्याचा वापर करावा लागला. तेव्हापासून जगातले बहुतेक लोक खडबडून जागे झाले आणि त्यांनी प्रतिबंधात्मक आणि प्रशिक्षणविषयक पावले उचलण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने आपल्या येथे पुरेशी जागृती दिसत नाही. पेशावरची घटना आपले डोळे उघडे करणारी ठरो. परिपत्रक काढून जाणीव करून शासनाने आपली भूमिका पार पाडली आहे. आता जागरूकता आपण दाखविली पाहिजे.
शिक्षण संस्थांची निवड करण्यामागचा उद्देश
जनतेत दहशत निर्माण करणे, दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करणे, प्रशासन व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल असा प्रयत्न करणे, निरपराध नागरिकांची हत्या करून देशात अगतिकतेची भावना निर्माण करणे (मुंबईवरचा सव्वीस नोव्हेंबरचा हल्ला) यासारखे उद्देश समोर ठेवून अतिरेकी कारवाया आखण्यात येत असतात. यात शिक्षण संस्थांचा समावेश करून एक नवीन परिमाण जोडता येईल, असा विचार अतिरेकी करीत आहेत, अशी बित्तंबातमी केंद्र शासनाच्या गृहखात्याला समजली आहे.
असा हल्ला करून देशातील उगवत्या पिढीला आपल्या लक्ष्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा विचार ‘अतिरक्यांचे म्होरके’ करीत आहेत. अशा प्रयत्नांतून देशातील उगवत्या पिढीला भयभीत करता आले, त्यांना अगतिक करता आले, त्यांना सतत दहशतीखाली आणि दडपणाखाली ठेवता आले, तर त्या देशाची प्रतिकारक्षमता, प्रत्याघात करण्याची इच्छाशक्तीच क्षीण होईल, अशी या योजनेमागची अतिरेक्यांची रणनीती असणार, हे उघड आहे.
सावधगिरी कशी बाळगावी
भरभक्कम लोखंडी दारे, पक्क्या कुंपणासाठी कॉंक्रीटच्या भिंती, त्यांच्यावर ग्रील्स आणि त्यांच्या जोडीला उलटे वळवलेले हुक्स अशी एखाद्या किल्ल्याला असावी, अशी तटबंदी किंवा कडेकोट बंदोबस्त असलेली व्यवस्था केवळ शिक्षण मंडळे, विद्यापीठे आणि तत्सम संस्था यांच्यासाठीच असली पाहिजेत, असे नाही, तर नावाजलेल्या शिक्षण संस्था सुद्धा अशाच जागरूक असल्या पाहिजेत, असे हे परिपत्रक म्हणते. यात इतरही सूचना तपशीलवार दिल्या आहेत.
१. दारावर हत्यारबंद पहारेकरी चोवीस तास तैनात असावेत.
२. ठिकठिकाणी छुपे कॅमेरे लावलेले असावेत.
३. पहारेकर्यांजवळ ‘वॉकी-टॉकी’ (संवाद व्यवस्था) सज्ज असावी.
४. प्रत्येक इमारतीला तीन-चार दरवाजे, त्याचप्रमाणे भोवतालच्या कुंपणाला सुद्धा एकापेक्षा जास्त दारे असावीत. अशा व्यवस्थेमुळे अतिरेक्यांना आतील व्यक्तींना ओलिस म्हणून बंदिस्त ठेवणे कठीण होईल. वर्गखोलीलाही एकापेक्षा जास्त दारे असावीत.
५. सार्वजनिक दृक् आणि ध्वनी प्रक्षेपणव्यवस्थेला प्रत्येक वर्गाची खोली जोडलेली असावी. यामुळे मुख्य कक्षात (नियंत्रण कक्षात) बसलेल्याला प्रत्येक वर्गात काय चालू आहे, ते दिसू शकेल आणि ऐकू येईल, तसेच वर्गातल्या विद्यार्थ्यांशी बोलता येईल. त्यांना सूचना देता येतील. धीराचे दोन शब्द सांगता येतील.
६. प्रत्येक खोलीत जवळच्या पोलिस स्टेशनचे व इतर महत्त्वाचे टेलिफोन क्रमांक ठळक अक्षरात व सहज दिसतील अशा ठिकाणी पक्क्या शाईने लहिलेले असावेत.
७. सर्व शिक्षण संस्थांना एक प्रमाणभूत कृती आराखडा (स्टँडर्डाइज्ड ऑपरेटिंग प्रोसीजर- म्हणजेच एसओपी) माहीत असावा. म्हणजे ऐनवेळी धांदल, गडबड किंवा भगदड यांचा सामना करावा लागणार नाही.
८. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा सूचनांमुळे भीतीची भावना निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अतिरेकी हल्ला होऊच नये आणि समजा झालाच तर आपण बेसावध अवस्थेत सापडू नये. यासाठी हा सर्व खटाटोप आहे, हे सर्व संबंधितांना मोठ्या कौशल्याने पटवून सांगावे लागेल. ‘आपण पुरेशी काळजी घेतलेली आहे, आपण बेसावध नाही, अतिरेक्यांचा सामना करण्याची आपलीही तयारी आहे,’ हे पाहून त्यांच्या मनात धीराची भावना निर्माण होईल. यासाठी अतिशय काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे. तसेच घबराट निर्माण न होता हिंमत वाढेल यासाठी योग्य शब्दयोजना वापरली पाहिजे.
९. या सगळ्या गोष्टी एकदम साध्य होणार नाहीत, पण प्रयत्न या दिशेने असावेत.
यानिमित्त १९६२ सालच्या चिनी आक्रमणाच्या वेळच्या घटनेचे स्मरण होते. आसामच्या दिशेने चिनी सैन्य पुढेपुढे सरकत होते. आसाममधील एक मोठे शहर (तेजपूर) वेढले जाणार अशी चिन्हे दिसू लागली होती. देशभर काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी तिथल्या लोकांचे मनोबल वाढेल/कायम राहील अशी भाषा वापरणे आवश्यक होते. पण देशाच्या करत्याधरत्या नेत्याने, ‘आता तेजपूरचे काय होणार? मला त्यांची काळजी लागून राहिली आहे,’ असे विधान केले. परिणाम असा झाला की तेजपुरात घबराट निर्माण झाली, भगदड माजू लागली. पण चीनने वीस ऑक्टोबर १९६२ रोजी एकतर्फी युद्धविराम घोषित केला आणि त्यामुळेच पुढील अनर्थ टळला.
‘भारताला त्याची जागा दाखवून देण्याचा’ चिन्यांचा उद्देश सफल झाला होता आणि म्हणून त्यांनी आक्रमण आटोपते घेतले होते. म्हणून आपण वाचलो. पण आजचे अतिरेकी वेगळ्या जातकुळीचे आणि वेगळ्या मुशीतून घडलेले आहेत.
- वसंत गणेश काणे
No comments:
Post a Comment