Total Pageviews

Wednesday, 14 January 2015

घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी...कर्नल सुनील वासुदेवराव देशपांडे (निवृत्त)

घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी... आज १५ जानेवारी. भारतीय सेना दिवस. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या प्रत्येक युद्धात भारतीय सेनेने प्रत्येक रणांगण आपल्या अद्वितीय शौर्याने गाजविले आहे. भारतीय सेनेचा पराक्रम जगजाहीर आहे. द्वितीय महायुद्धात मराठा लाईट इंफ्रंटीचा शिपाई नामदेव यादव व नाईक यशवंत घाडगे यांना अद्वितीय शौर्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांचे सर्वोच्च शौर्यपदक ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देऊन गौरवान्वित केले होते. तसेच जनरल भगत यांनाही ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देण्यात आला होता. जनरल भगत त्यावेळी लेफ्टनंट होते व शत्रूसमोर असताना त्यांनी आपल्या सोबती इंजिनीयरिंग जवानांना घेऊन सुरुंग लावण्याचे जोखमीचे काम पार पाडले होते. १९६५ च्या युद्धात माझी बटालियन २ मराठा लाईट इंफ्रंटीला काम दिले होते की फिरोजपूरजवळ सतलज नदीवर हुसैनीवाला पुलाचे व शहीद भगतसिंह सुखदेव व राजगुरूच्या समाधीचे पाक हल्ल्यापासून रक्षण करणे. माझ्या कमांडिंग अधिकारी कर्नल नोलनने आदेश दिला की, २ मराठा शेवटल्या सैनिकापर्यंत व शेवटल्या गोळीपर्यंत हुसैनीवाला पूल व भगत सिंग, सुखदेव व राजगुरूच्या समाधीचे पाकिस्तानी हल्ल्यापासून रक्षण करेल. १९ सप्टें. १९६५ रोजी पाकिस्तानने हल्ला केला. तो हल्ला आमच्यापेक्षा तिप्पट शक्तीने व रणगाड्यांसह झाला. घमासान युद्ध झाले व हा हल्ला आम्ही परतविला. पाकिस्तानी सेनेने अखेर माघार घेतली. कितीतरी मृतदेह सोडून ते पळाले. या हल्ल्यात आम्ही पाकिस्तानी रणगाडे पकडले. युद्ध सुरूच होते. पाकिस्तानने आमच्यावर तोफांचा मारा चालूच ठेवला. दुसरे दिवशी आमचे कमांडिंग अधिकारी कर्नल नोलन मारल्या गेले. परंतु आम्ही हुसैनीवाला व समाधीचे रक्षण केले. आम्ही गड राखला पण आमचा सिंह गेला. भारतीय सेनेचं बलिदान लोकांच्या मनात घर करतं. कर्नल नोलनचा मृतदेह फिरोजपूरहून लखनऊला सेनेच्या गाडीने पाठविला. फिरोजपूरहून जेव्हा रात्रीच्या सुमारास जेव्हा ही गाडी रवाना झाली, तेव्हा त्या काळोखात संपूर्ण फिरोजपूरचे नागरिक तेथे आले होते. त्याच सुमारास पाऊस सुरू झाला, परंतु ती गाडी रवाना होईपर्यंत कुणीही तेथून हलले नाही. ‘कर्नल नोलन अमर रहे’, ‘भारतीय सेना विजयी हो’ या वाक्यांनी तो परिसर दुमदुमला होता. आम्ही सैनिक जेव्हा हे बघतो तेव्हा आमचं मनोबल उंचावतं. कारण, तेव्हा आम्हास वाटतं की संपूर्ण देश आपल्या पाठीशी आहे. कारगिल युद्धात लेफ्टनंट मनोजकुमार पांडे व कॅप्टन विक्रम बत्राने अद्वितीय शौर्य गाजविले. या युद्धात विक्रम बत्राने एक शिखर काबीज केले. त्याचे शौर्य बघून पाकिस्तानी त्याला शेरशाह म्हणू लागले. चार-पाच दिवसांत त्याच क्षेत्रात आणखी एका मोठ्या हल्ल्याची योजना झाली. दुर्दैवाने हल्ल्याच्या दिवशी विक्रमला १०३ अंश से. ताप होता. त्याच्या कमांडिंग ऑफिसरने सांगितले की या हल्ल्यात बत्रा जाणार नाही. यावर बत्रा सरळ कमांडिंग अधिकार्‍यांना भेटला व त्यांना स्पष्टपणे सांगितले की, काहीही झाले तरी हल्ल्यात विक्रम जाणारच. अखेर कमांडिंग अधिकार्‍याने हो म्हटले. त्या हल्ल्यात विक्रमने अद्वितीय शौर्य गाजविले व शत्रूचे ठाणे काबीज केले. या हल्ल्यात विक्रम धारातीर्थी झाला. त्याच्या शौर्याबद्दल त्याला मरणोपरांत परमवीर चक्र देण्यात आले. पाकिस्तानी हल्ले आपल्या सीमेवर गोळीबार करून आजकाल चालू आहेत. आपले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सडेतोड उत्तर देण्याचे सेनेला आदेश दिले आहेत. भारतीय सेना कोणताही हल्ला परतविण्यास पूर्णपणे सज्ज आहे. सध्याच्या सरकारचे सेनेविषयीचे धोरण चांगले आहे. मागील सरकारने भारतीय सेनेच्या गरजा पुरविण्यास्तव निर्णयच घेतले नाहीत. परंतु या सरकारने ताबडतोब निर्णय घेतले. ८०,००० कोटींच्या तोफासंबंधीच्या करारावर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याकरिता रक्षामंत्र्यांनी तातडीने पावले उचलली पाहिजेत. मागील दिवाळी आपल्या पंतप्रधानांनी सियाचीन येथे जवानांसोबत साजरी केली, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कृतीने मोदींनी हे दाखवून दिले की, सणावारात पूर्ण देश सैनिकाला विसरत नाही व सैनिकाच्या पाठीशी आहे. पंतप्रधानांनी हा संदेश दिला की, माझी प्राथमिकता भारतीय सेना आहे. या कृतीने सैनिकांचे मनोबल गगनात मावेनासे झाले. पंतप्रधानांची इच्छा ‘मेक इन इंडिया’ ची आहे व त्याकरिता त्यांनी बर्‍याच योजना आखल्या आहेत. याकरिता त्यांनी आपल्या डीआरडीओ व आयुध निर्माण फॅक्ट्रीजमार्फत हे मेक इन इंडियाचे काम पूर्ण केले पाहिजे. आपल्या ऑर्डनन्स फॅक्ट्रीजमध्ये बरीच क्षमता आहे. मनुष्यबळाची कमी नाही. आज भारतीय सेनेत बारा हजार अधिकार्‍यांची कमतरता आहे. सेनेविषयीचे गैरसमज दूर सारून आज तरुणांनी सेनेकडे आकर्षित व्हावयास हवे. आपली सेना ही अत्यंत प्रोफेशनल आहे व जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. युद्धात जाण्यापूर्वी आम्ही सर्व सैनिकांना त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता त्यांना प्रोत्साहित करतो. माझी बटालियन २ मराठा आहे व यात सर्व सैनिक हे महाराष्ट्राचे आहेत. युद्धात जाण्यापूर्वी आम्ही त्यांना बोलावतो व म्हणतो व्हा पुढे आम्हा धनाजी, बाजी, सांगाती, वीर हो उठा कडाडतात नौबती विजयघोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी पूर्वजा परी आम्ही अजिंक्य सत्वरी घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी मृत्यू आम्हापुढे घाबरे मर्द आम्ही मराठे खरे भारतीय सेनेला आज सेना दिवशी त्रिवार वंदन. - कर्नल सुनील वासुदेवराव देशपांडे (निवृत्त)

No comments:

Post a Comment