सिनेमा घडताना – लोकमान्य
सध्या अनेक विषयांवर सिनेमे बनत आहेत. मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. येत्या वर्षात अशाच काही वेगळ्या धाटणीच्या सिनेमांविषयी आणि तो सिनेमा घडताना आलेल्या अनुभवांविषयी या स्तंभातून धांडोळा घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
लोकमान्य – एक युगपुरूष हा सिनेमा या वर्षाच्या सुरुवातीलाच 2 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. या सिनेमाचे प्रोमोज टीव्हीवर दिसायला लागल्यापासून खरे तर या सिनेमाविषयीचे कुतुहूल मराठी प्रेक्षकांच्याच मनात निर्माण झालं होतं. यामागचे कारण म्हणजे स्वातंत्—य लढय़ात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या लोकमान्यांवर आतापर्यंत एकही चित्रपट निर्माण झाला नव्हता. त्यामुळे या चित्रपटाविषयी विशेष कुतुहूल होतेच. या कुतुहूलापोटीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावरील लोकमान्य – एक युगपुरुष हा सिनेमा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी संपर्क केला या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, निर्माती नीना राऊत आणि अभिनेता सुबोध भावे यांच्याशी…
ओम राऊत या चित्रपटाबद्दल सांगतात की, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करुन ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला हादरवून सोडणारे आणि जनसामान्यांचा जहाल नेता अशी लोकमान्य टिकळांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. लोकमान्यांनी त्या काळात मांडलेले विचार आजही आपल्याला प्रेरणा देणारे आणि दिशा देणारे ठरतात. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी तरुणांना संघटित होऊन एकत्र काम करण्याचे आवाहन केले होते. लोकमान्यांचे हे आवाहन आजच्या काळाचीही गरज बनली आहे. कारण भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या ही तरुणांची आहेअसे ओम आर्वजून सांगतात.
ओम यांच्या मते लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्वराज्य तर मिळवून दिले पण अजूनही आपण हवे तसे सुराज्य आणू शकलेलो नाही. म्हणूनच लोकमान्य टिळकांचे विचार आजच्या काळातही आपल्याला दिशादर्शक आहेत. या सिनेमाविषयी बोलताना ओम सांगतात की, हा सिनेमा बनविण्याची प्रोसेस गेल्या 3 वर्षांपासून सुरू होती. लोकमान्यांवरील हा सेनेमा जेव्हा आम्ही करायचा ठरवलं, तेव्हा मी आणि माझ्या टीमने सुमारे दीड वर्ष या विषयावर संशोधन केलं. त्यानंतर माझ्यासमोर मोठा प्रश्न होता की लोकमान्य टिळकांची भूमिका कोण साकारणार.. यासाठीही आम्ही खूप विचार केल्यानंतर सुबोध भावे यांचे नाव आमच्यासमोर आले. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आमची ही निवड योग्यच असल्याचे जाणवते आहे.या चित्रपटाची कथा जेवढी टिळकांच्या आयुष्याची आहे, तेवढीच ती त्यांच्यॉ विचारांची आहे, असे मला वाटते. म्हणूनच त्यांचे विचार हाच या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. लोकमान्यांचे विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहचणं खूप गरजेचं आहे, तेच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट बनवल्याची भावना दिग्दर्शक ओम राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकमान्यांची वैचारिक जडण-घडण, त्यांचा राजकीय आणि सामाजिक जीवन प्रवास त्यांचं शैक्षणिक धोरण, ब्रिटीशांविरूद्ध पुकारलेला स्वराज्यासाठीचा लढा, असहकार आंदोलन, चाफेकर बंधूंची शौर्यगाथा या आणि अशा किती तरी ऐतिहासिक घटनांचा पट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. शाळेतील पाठय़पुस्तके आणि इतिहासातील धडे यापुरतेच लोकमान्यांचं कार्य मर्यादित न राहता त्यांची देशभक्तीची जाज्वल्य भावना प्रेक्षकांपर्यंत विशेषतः तरूणांपर्यंत त्यांना आवडेल अशा माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न आम्ही लोकमान्य मधून केल्याचं ओम राऊत सांगतात. या सिनेमाचे चित्रिकरण आम्ही एकूण 7 महिन्यातील 50 दिवसात पूर्ण केले असले तरी या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन करण्यासाठी मला जवळपास एक वर्ष लागले. गेल्या वर्षी म्हणजे 13 डिसेंबर 2013 ला मी या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरु केले आणि टेक्नीकली हा सिनेमा अधिकाधिक कसा चांगला होईल यासाठी भरपूर वर्कशॉप्स केले. या सिनेमातील प्रत्येक पात्राच्या मेकअपसाठी मेकअपमन विक्रम गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली आहे. हा सिनेमा केवळ लोकमान्यांच्या आयुष्याचा पट नसून तो त्यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी विचारांचा वारसा आहे. हे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा हा सिनेमा माध्यम असल्याचे मला वाटते. गेले तीन वर्ष मी केवळ या एका सिनेमावर काम करीत असून माझे लोकमान्य टिळकांवर चित्रपट काढण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे.
या चित्रपटातील लोकमान्यांची भूमिका साकारणारे सुबोध भावे म्हणतात की, ओम आणि नीना ताई यांना वाटत होते की ही भूमिका मी करु शकेन. त्यानंतर जवळपास सहा महिने मी मनाची तयारी करत होतो. मी लोकमान्य साकारू शकेन हा विश्वास ओमच्या मनात होता आणि मी लोकमान्यांसारखा दिसू शकेन याबद्दलचा विश्वास विक्रम गायकवाड बाळगून होते. खरं तर मी विक्रमजींना जादूगार मानतोकारण त्यांच्या बोटात अशी काही जादू आहे की ते तुमचं रूप पूर्णपणे पालटवून टाकतात. विक्रमजीं जेव्हा माझा लोकमान्य या भूमिकेसाठीचा मेकअप ते मला करीत होते, तेव्हा मी डोळे मिटून घेतले होते. पूर्ण मेकअप झाल्यानंतरच मी आरशात बघण्याचे ठरविले होते. आणि जर आपला लुक लोकमान्यांशी जुळला तरच आपण ही भूमिका करायची हेही मनाशी ठरवलं होतं. मेकअप पूर्ण झाला आणि मी जेव्हा मी स्वतःला आरशात बघितलं तेव्हा क्षणभर माझाच माझ्यावर विश्वास बसला नाही आणि मी हा सिनेमा स्वीकारला. ही भूमिका स्वीकारल्यानंतर लोकमान्यसारखे दिसण्यासाठी शैलेश परूळेकर सर यांची मदत घेतली.व्यायाम आणि माझ्या आहाराचं वेळापत्रक बनवलं त्याचा मला खूपच उपयोग झाला आणि मी भूमिकेलासाजेशी शरीरयष्टी कमवू शकलो.
या चित्रपटातील पार्श्वसंगीताविषयी सांगताना समीर म्हात्रे सांगतात की, या सिनेमात एकूण पाच गाणी आहेत. सिनेमासाठी जे पार्श्वसंगीत आहे ते ऑर्केस्ट्रल संगीत वापरण्यात आले असून सिंफनीच्या माध्यमातून पार्श्वसंगीत देण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ हे करण्यासाठी आम्हाला सहा महिन्यांहून अधिक काळ गेला.
या सिनेमाच्या निर्मात्या नीना राऊत सांगतात की, मी गेली 30 वर्ष टीव्हीसाठी काम केलं आहे. पण लोकमान्य टिळकांवरील चित्रपट बनवून आम्ही पहिल्यांदाच चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरलो आहोत. लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपट बनवायचा आहे, असे जेव्हा ओमने मला पहिल्यांदा सांगितले, तेव्हा खरे तर मी खूप दचकले होते. कारण एवढय़ा मोठय़ा व्यक्तीमत्त्वावर सिनेमा बनवणं तसं सोपं नव्हतं. पण ओम याबाबत ठाम होता. हा विषय घेऊन आम्ही अनेक निर्मात्यांना भेटलो. पण कोणीही हा सिनेमा करण्याची तयारी दाखविली नाही. शेवटी मीच निर्माती म्हणून हा चित्रपट करायचं ठरविलं. हा सिनेमा लोकमान्य टिळकांची केवळ बायोग्राफी नाही तर आजच्या काळातही त्यांचे किती निगडीत आणि सुसंगत आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून केला असल्याचे नीना राऊत सांगतात..
आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या आणि कार्याच्या जोरावर भारतीय स्वातंत्र्यलढय़ाला एक वेगळा आयाम मिळवून देणारे लोकमान्य हे खर्या अर्थाने युगपुरूष होते. भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील धगधगतं पर्व असणार्या लोकमान्यांची जीवनगाथा ही असामान्य अशीच आहे. त्यांच्या कार्यावर आणि देशभक्तीच्या जाज्वल्य विचारांवर आधारित हा सिनेमा आहे असेच म्हणावे लागेल. लोकमान्य हे एक सच्चे देशभक्त होते. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने त्यांनी तरुणांच्या मनात स्फुलिंग चेतवले होते. आता ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला लोकमान्य-एक युगपुरुष आणि अभिनेते सुबोध भावे यांनी साकारलेले लोकमान्य आपल्या मनात सुराज्य आणण्याचे काम करेल अशी अपेक्षा बाळगूया…
No comments:
Post a Comment