Total Pageviews

Saturday 10 January 2015

हा काय तमाशा चालला आहे?-संजय दत्त-कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट

हा काय तमाशा चालला आहे? काय तमाशा चालला आहे हा? नको असताना एका कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायला निघालेल्या इथल्या अधिकार्‍यांना, भ्रष्टाचारी कलमाडीला चहा-बिस्किटं पुरवताना लाज वाटत नाही अन् आता संजय दत्तने मागितलेली रजा मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेण्याची घडीभराची फुरसत होत नाही. काय चाललंय् काय इथे? का म्हणून संजय दत्तवर दर दोन महिन्यांनी वेगवेगळ्या कारणांनी सुट्ट्यांची बरसात सुरू आहे? त्याने सुटीचा कालावधी वाढवून मागितला तर त्यावर निर्णय घ्यायला दिवस पुरत नाहीत कारागृहातल्या अधिकार्‍यांना? अन् तोही शहाणा, आपण दिलेल्या अर्जावर अद्याप निर्णयच झालेला नसल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत कारागृहाच्या दाराशी येऊन परत निघून जातो? कोण, आहे कोण हा संजय दत्त? सीमेवर युद्ध लढणारा सैनिक, की थोर समाजसेवक? एखादा विचारवंत, की देशकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेला निरपेक्ष कार्यकर्ता? एखाद्या चित्रपटातील ‘गांधीगिरी’पलीकडे योगदान काय त्याचे समाजात? शेकडो मुंबईकरांचे बळी घेणार्‍या बॉम्बस्फोटाच्या घटनेतील एका आरोपीशी सलगी करणार्‍या आणि स्वत:च्या घरात शस्त्रं बाळगणार्‍या व्यक्तीवर कशाची बक्षिसं लुटवत निघाले आहेत प्रशासनातले अधिकारी? की त्याला झालेल्या शिक्षेचा कालावधी कारागृहाच्या बाहेरच संपविता यावा यासाठी जाणीवपूर्वक तजवीज करताहेत हे लोक? सार्‍या देशासमोर कायद्याची अशा प्रकारे खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला एकदाची कायमची सुट्टी तरी देऊन टाका! उगाच नाटकं तरी कशाला करायची त्याला शिक्षा सुनावल्याची अन् त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची? तत्कालीन खासदारांचा पोरगा, मग एका खासदाराचा भाऊ म्हटल्यावर सरकारी यंत्रणेकडून एवढ्या सवलती तर मिळायलाच हव्यात नाही का संजय दत्तला? मग दहशतवाद्यांशी संबंध जोपासले काय किंवा घरात शस्त्रं बाळगली काय, काय बिघडतं कुणाचं? इथे असो वा तिथे, अमेरिकेत असो वा मग पाकिस्तानात, सामान्य लोक काय शेकड्याने, किड्या-मुंग्यांसारखे मरतच असतात दररोज. त्यांची काय तमा बाळगत बसायचे? शेवटी बड्यांची बडी बडदास्त महत्त्वाची. त्यांनी त्यांच्या कामासाठी सादर केलेले अर्जही सरकार दरबारी हवे तेव्हा सापडतात, हवे तेव्हा हरवतात, हवे तेव्हा मंजूर होतात अन् त्यांना हवे तेव्हाच नामंजूरही होतात. इतरांच्या तुलनेत संजय दत्त हा व्हीआयपी आरोपी असल्याने त्याच्याबाबतीत सवलतींचा नुसता पाऊस बरसतोय् सध्या. ना त्याच्या सुट्ट्या मंजूर होण्यात अडचण, ना त्याला कारागृहातून घरी जाण्यात कुठली आडकाठी! खरंच भाग्यवंत कैदी ठरला आहे बघा संजय दत्त! गुन्हा करून, तो सिद्ध होऊनही शिक्षेच्या नावाखाली सुट्‌ट्या एन्जॉय करतोय् गडी. आधीच चौदा दिवसांच्या फर्लो रजेवर असलेल्या संजय दत्तला म्हणे तब्येतीच्या कारणावरून या रजेत आणखी वाढ करून हवी होती. तसा रीतसर अर्ज त्याने कारागृह प्रशासनाकडे सादर केला होता. पण, प्रशासनाकडून आपल्या या अर्जावर काय कारवाई झाली हे कळायच्या आतच त्याच्या फर्लोवरील रजेचा काळ संपत आल्याने, आता नाइलाजाने कारागृहात परत जावे लागणार म्हणून संजय दत्त नावाचा हा गुन्हेगार मुंबईवरून पुण्याच्या दिशेने निघाला. अगदी कारागृहाच्या दाराशी जाऊन पोहोचला. बघतो तर काय, आपल्या अर्जावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी अद्याप निर्णयच घेतलेला नसल्याची बाब त्यांच्या कानावर पडली. मग काय, हीच संधी साधून तो माघारी फिरला. अर्ज अद्याप नामंजूर झालेला नसल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन... खरे तर सुटीच्या अर्जावर निर्णय झालेला नाही म्हणजे वाढीव सुटी अद्याप मंजूर झालेली नाही, एवढा त्याचा अर्थ स्पष्ट होता. म्हणजेच संजयची जागा आता बाहेर नाही तर जेलच्या आत आहे; निदान वाढीव सुटीचा अर्ज मंजूर होईपर्यंत तरी... ही बाब कारागृहातल्या हुशार, अनुभवी अधिकार्‍यांच्याही ध्यानात आली नाही. परिणामी त्यांनी दारात आलेल्या संजयला त्याच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार घरी परत जाऊ दिले आणि मग अर्जावरील निर्णयाच्या विलंबासाठी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत आपसात शिमगा सुरू केला. आता संबंधित अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत निघाले आहेत. ज्या तब्येतीच्या कारणावरून संजय दत्तने सुटीचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती, त्याची म्हणे पडताळणी करण्याची जबाबदारी पुण्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी मुंबईतील अधिकार्‍यांवर टाकली होती. पण झालं काय की, मुंबईतल्या अधिकार्‍यांना ती सूचनाच मिळाली नाही. आता कितीही हुशार अन् कर्तव्यदक्ष असले, तरी मुंबईचे पोलिस स्वत:हून कशाला संजयच्या तब्येतीची शहानिशा करतील? त्यामुळे आता, ‘आम्ही सूचना दिली होती’ - ‘आम्हाला सूचना मिळाली नाही’ अशा आरोप-प्रत्यारोपांची टोलवाटोलवी पुणे आणि मुंबईतील पोलिस अधिकार्‍यांनी एकमेकांवर आरंभली आहे. या भांडणाचा ‘लाभ’ संजय दत्तला मिळाला आहेच. पण, त्यातून पोलिस विभागाच्या कामाच्या पद्धतीची लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहे. गुन्हा सिद्ध झाला म्हणून कारागृहात शिक्षा भोगत असलेला एक संजय दत्त कायद्याची खिल्ली उडवत, प्रशासनाला खिशात ठेवून, वकिली डावपेच लढवत, न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या आदेशाची पाऽऽर ऐसीतैशी करतो आणि हवालदिल झालेली सारी यंत्रणा मख्खपणे पाहत राहते? मोठ्या घरच्या लोकांकडून प्रशासनाची हेळसांड आणि कायदा पायदळी तुडविला जाणेच अपेक्षित असल्यागत कुठल्याही प्रत्युत्तराविना सारी यंत्रणा निपचित पडून राहते. या राज्यातल्या वेगवेगळ्या कारागृहांत तब्बल २७,७४० कैदी शिक्षा भोगताहेत. त्यांच्यापैकी ७५१ कैद्यांनी फर्लो वा पॅरोलवर रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे आपापले अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जावर निर्णय न घेणारे अधिकारी, सुटी मंजूर करण्याबाबत संजय दत्तवर मात्र मेहरबान होतात. किमान बावीस महिन्यांची शिक्षा भोगून झाली असेल, तरच संचित रजा मंजूर होण्याचा नियम आहे. पण, बहुधा याहीबाबतीत संजय दत्त कमालीचा भाग्यवंत ठरला आहे. कारण त्याच्या अर्जापुढे जेल मॅन्युअल आणि कायद्यातील तरतुदीही कस्पटासमान लेखण्याची भूमिका अधिकारी घेऊ लागले आहेत. त्याला मिळणार्‍या अफलातून सोयी, सुविधांबाबत सरकारदरबारी तक्रारी दाखल झाल्या तरी अन् न्यायालयात याचिका दाखल झाली, तरी संजयचे सुट्या घेण्याचे प्रमाण कमी झाल्याचे ऐकिवात नाही की, त्यानंतर त्याला सुट्या मंजूर करणार्‍या जबाबदार अधिकार्‍यांच्या वर्तणुकीत आमूलाग्र बदल घडून आल्याचीही वार्ता नाही. सर्वदूर सारे काही ‘जैसे थे’ आहे. तोच गलथान कारभार, व्यवस्थेच्या पेकाटात लाथ मारण्याची तीच बेपर्वा वृत्ती... मुळात सुटीच्या कालावधीत वाढ करण्याच्या एका कैद्याच्या अर्जाची झालेली हेळसांड आणि त्यातून निर्माण झालेला घोळ आपल्या इथल्या कामाच्या ‘सरकारी‘ बाजाला साजेसा आहे. किती लीलया इथल्या फायली टेबलावरून हरवतात, अधिकार्‍यांनी एकमेकांना दिलेल्या सूचनांचा कसा बोजवारा उडतो अन् त्यातून व्यवस्थेचा कसा सत्यानाश होतो, हे या निमित्ताने दिसून आले आहे. एकीकडे निर्णय घेणारे अधिकारी ‘असे’, तर त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे त्याहून दीडशहाणे. सुटीचा अर्ज अद्याप मंजूर झालेला नाही म्हणजे सद्य:स्थितीत तो नामंजूर आहे, म्हणजेच या घडीला या आरोपीला बखुटं धरून आत टाकलं पाहिजे, एवढी साधी बाब त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या बड्या बड्या अधिकार्‍यांच्या लक्षात येत नाही आणि कारागृहाच्या दाराशी येऊन अधिकार्‍यांना वाकुल्या दाखवत एक आरोपी सहज माघारी निघून जातो, याला तमाशा नाही तर काय म्हणायचे? आता येरवडा कारागृहाचा धामणे नावाचा कुणी बडा अधिकारी यात दोषी दिसून आला आहे. त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश नुकतेच गृहराज्यमंत्र्यांनी दिले आहेत. आता या धामणेवर किती कडक कारवाई होते, हेच पहायचे

No comments:

Post a Comment