Total Pageviews

Sunday, 25 January 2015

नायक नीरज कुमार, मेजर वरदराजन यांना अशोक चक्र

नायक नीरज कुमार, मेजर वरदराजन यांना अशोक चक्र तारीख: 25 Jan 2015 20:32:24 तिघांना कीर्ती, १२ जणांना शौर्य चक्र वृत्तसंस्था नवी दिल्ली, २५ जानेवारी लष्करातील नायक नीरज कुमार सिंह आणि राष्ट्रीय रायफल्सच्या ४४ व्या बटालियनचे मेजर मुकुंद वरदराजन यांना यावर्षीचा ‘अशोक चक्र’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांविरोधात लढा देताना वीरमरण पत्करणार्‍या या दोघांना देशातील या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी अशोक चक्रसोबतच तिघांना कीर्ती चक्र आणि अन्य १२ जणांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शौर्य चक्र विजेत्यांमध्ये गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर खोर्‍यातील निवडणूक सभेला संबोधित करण्याच्या एक दिवस आधी उरी येथे झालेला दहशतवादी हल्ला परतावून लावताना शहीद झालेले लेफ्टनंट जनरल संकल्प कुमार यांचा समावेश आहे. नायक नीरज सिंह यांनी गेल्या वर्षी २४ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील गुरदाजी भागात दहशतवादविरोधी मोहिमेचे नेतृत्त्व करीत असताना, अतिरेक्यांनी त्यांच्या चमूवर बेछूट गोळीबार केला होता. यात त्यांच्या पथकातील एक जवान शहीद झाला होता. यावेळी त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सहकार्‍यांना वाचविण्यास प्राधान्य दिले होते. अतिरेक्यांनी नीरज सिंह यांच्यावर गोळीबार करताना बॉम्बचा माराही केला. यात गंभीर जखमी होऊनही ते अतिरेक्याच्या पुढे गेले आणि काही अतिरेक्यांचा खात्मा केला होता. याचवेळी अन्य एका अतिरेक्याने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यांच्या हातातील रायफलही गळून पडली. या अवस्थेतही त्यांनी त्या अतिरेक्याच्या हातातील रायफल हिसकली आणि त्याला गोळ्या घालून ठार केले. बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी अतिरेक्यांशी लढा दिला होता. बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला, असे राष्ट्रपती भवनाच्या पत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे मेजर मुकुंद वरदराजन यांनी गेल्या वर्षी २५ एप्रिल रोजी काश्मीरच्या शोपियॉ जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांशी लढताना अभूतपूर्व वीरतेचे दर्शन घडविले होते. यात ते शहीद झाले. यासाठी त्यांचाही अशोक चक्रने मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे. कीर्ती चक्र पुरस्कार विजेत्यांमध्ये कॅप्टन जयदेव, सुभेदार कोश बहादूर गुरंग आणि सुभेदार अजय वर्धन (मरणोत्तर) यांचा समावेश आहे. ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ३७४ शौर्य आणि अन्य संरक्षण पुरस्कार जाहीर केले आहेत.

No comments:

Post a Comment